कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माध्यमांना माहिती दिली तेव्हा त्यांची बहीण शायना सुनसारा या भावुक झाल्या. सोफिया यांचा अभिमान वाटला. शायना यांनी सांगितलं की, “आम्ही काल बोललो आणि एक आर्मी ऑफिसर असल्यामुळे तिने घडलेल्या घटनेबद्दल एकही शब्द सांगितला नाही. हे आमच्या सर्वांसाठी आश्चर्यकारक होतं, पण सोफियाला या पदावर पाहणं अभिमानाची गोष्ट होती.
“देशासाठी काहीतरी करण्याची तिचं नेहमीच ध्येय होतं. तिला डीआरडीओमध्ये सामील व्हायचं होतं, शास्त्रज्ञ व्हायचं होतं आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करायचे होतं. तिला अमेरिकेतूनही अनेक ऑफर आल्या होत्या, पण तिला भारतात राहून सैन्यात भरती व्हायचं होतं. ती पहिल्याच प्रयत्नात सैन्यात सामील झाली. सुरुवातीला माझं स्वप्न सैन्यात भरती होण्याचं होतं, पण एनसीसीमध्ये असूनही आणि सर्व प्रयत्न करूनही माझी निवड झाली नाही. मला अजूनही वाईट वाटतं, पण जेव्हा मी सोफियाला वर्दीत पाहते तेव्हा असं वाटतं की मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगत आहे” असं शायना यांनी म्हटलं आहे.
“आजीकडून राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यकथा ऐकत होतो”
“आम्ही एकत्र वाढलो, सुरुवातीला आमच्या आजीकडून राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यकथा ऐकत होतो. माझ्या वडिलांच्या निवृत्तीनंतर आम्ही वडोदरा येथे स्थलांतरित झालो तेव्हा लष्कराची शिस्त आणि देशप्रेम हे आमच्या कौटुंबिक मूल्यांचा पाया राहिले. सोफिया तिच्या कर्तव्यासाठी समर्पित आहे आणि तिच्यासारखी दुसरी कोणी नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा ती सतत महिला अधिकाऱ्यांसाठी सैन्यात काय करू शकते किंवा काही नवीन किंवा वेगळी कल्पना आणू शकते याबद्दल बोलत असते. ती एक मेहनती व्यक्ती आहे.”
भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
“शायना, तुला हे आवाज ऐकू येत आहेत का?”
“२००६ मध्ये जेव्हा कर्नल सोफियाला संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेचा भाग म्हणून काँगोला पाठवण्यात आले तेव्हा तिने युद्धक्षेत्रातून मला फोन केला आणि गोळीबार आणि बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकवले आणि विचारले, ‘शायना, तुला हे आवाज ऐकू येत आहेत का? हे गोळीबाराचे आवाज आहेत. ती अनेकदा कुटुंबाला भेटण्यासाठी वडोदरा येथे येते. पण तिला अलिकडेच पदोन्नती मिळाल्याने आणि अधिक जबाबदारी देण्यात आल्याने, ती पूर्वीसारखी वारंवार येत नाही.”
“मला देशाचा अभिमान आहे”
“सोशल मीडियावर आम्ही तिच्याबद्दल काय शेअर करतो याबद्दल ती खूप जागरूक आहे. ती मला फोन करते आणि तिचं लोकेशन उघड करणाऱ्या कोणत्याही पोस्ट किंवा फोटो काढून टाकण्यास सांगते. दहशतवादाला धर्माचा रंग देऊ नये. दहशतवाद सहन केला जाऊ शकत नाही कारण तो मानवता आणि अर्थव्यवस्था नष्ट करतो. अशा कृत्यांमुळे लोकांचे बुद्धी भ्रष्ट होते. मला देशाचा अभिमान आहे आणि दहशतवादी कृत्याला प्रत्युत्तर देण्याचा निर्णय योग्य होता” असं शायना यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं आहे.