जर एखाद्याला लहानपणापासूनच माहित असेल की मोठं झाल्यावर काय व्हायचं तर ते मोठ्या अडचणींना तोंड देऊनही आपलं ध्येय साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. मुझफ्फरपूरची रहिवासी असलेल्या १९ वर्षीय मरियम फातिमाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. मरियम बिहारची पहिली महिला FIDE मास्टर बनली आहे, यासोबतच तिचं रेटिंग २१०० पर्यंत पोहोचलं आहे. मरियमला वयाच्या १० व्या वर्षी बुद्धिबळ खेळण्याचं वेड लागलं होतं. तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की, ही आवड तिला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाईल.
भारतीय बुद्धिबळाच्या इतिहासात मरियमने आपलं नाव कोरलं आहे. तिच्या प्रवासाची सुरुवात तिसरीमध्ये झाली, जेव्हा तिने एका मित्राकडून बुद्धिबळाचा पट घेतला आणि पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेऊन तिसरं स्थान पटकावलं. जी गोष्ट केवळ उत्सुकता म्हणून सुरू झाली, ती लवकरच तिची आवड बनली आणि प्रत्येक खेळाबरोबर ती अधिक मजबूत होत गेली. यामध्ये तिच्या वडिलांनी दिला खूप साथ दिली.
मुलीच्या स्वप्नासाठी वडिलांनी केला त्याग
प्रत्येक रविवारी पहाटेच मरियम फातिमा आणि तिचे वडील त्यांच्या बिहारमधील घरातून पाटण्याला जाण्यासाठी १५० किमीचा प्रवास सुरू करायचे. मरिअम बुद्धिबळाचा तासन्तास सराव करायची. तिच्या वडिलांनी मुलीच्या स्वप्नासाठी अनेक त्याग केले. त्यांनी कष्ट करून पैसे जमवले. ५० पेक्षा जास्त बुद्धिबळाची पुस्तकं, सॉफ्टवेअर विकत घेतले आणि प्रत्येक रुपया तिच्या स्वप्नासाठी खर्च केला. "बाबा, एवढा खर्च करू नका" असं मरियम नेहमीच तिच्या वडिलांना सांगियची.
स्वतःला पुन्हा नव्याने उभं केलं
मरियमचा हा प्रवास सोपा नव्हता. २०२० मध्ये तिच्या आईच्या आजारपणामुळे आणि साथीच्या रोगामुळे तिच्या प्रगतीला जवळपास खीळ बसली होती. पण बुद्धिबळ हे तिचं सुरक्षित स्थान बनलं होतं. एका-एका मोहऱ्याप्रमाणे तिने स्वतःला पुन्हा नव्याने उभं केलं आणि ती अधिक एकाग्रतेने परतली. आज मरिअमची ही कामगिरी केवळ वैयक्तिक नाही, तर बिहारसाठी देखील महत्त्वाची आहे. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.