Join us

सब इन्स्पेक्टर पदासाठी माय - लेकीत स्पर्धा, कुणाला मिळणार पद? तेलंगणातली अनोखी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2022 13:39 IST

Mother Daughter Sub-Inspector Competition : फिजिकल टेस्टनंतर या दोघींनी लेखी परीक्षाही एकत्रितपणे दिली असून पद नेमके कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ठळक मुद्देमाय-लेकींमध्ये प्रत्यक्षात कोणाला हे पद मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.    अशाप्रकारे आई आणि मुलीत एकाच पदासाठी चुरस असल्याचे पहिल्यांदाच समोर आले आहे

आपली आई किंवा वडील हेच आपल्यासाठी आव्हान असल्याचे फारच कमी वेळा घडले असेल. एखाद्या स्पर्धेत किंवा एखाद्या पदासाठी आई आणि मुलगी समोरासमोर ठाकल्याचे आपण क्वचितच पाहिले असेल. पण तेलंगणामधील २१ वर्षाच्या तरुणीसोबत हे घडले आहे. या तरुणीचे नाव त्रिलोकीनी असून सब-इन्स्पेक्टर पदासाठी तिच्यासमोर तिच्या आईचे आव्हान आहे. तिच्या आईचे नाव दरेली नागमणी असून त्यांचे वय ३७ वर्षे आहे. सब-इनस्पेक्टर पदासाठी नुकत्याच या दोघी एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या आहेत. फिजिकल टेस्टनंतर या दोघींनी लेखी परीक्षाही एकत्रितपणे दिली असून यात दोघीही पास होतील असे आईचे म्हणणे आहे (Mother Daughter Sub-Inspector Competition). 

बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या दरेली यांनी १९९९ मध्ये शेतात काम करणाऱ्या एका मजूराशी लग्न केले. त्यांच्यापासून त्यांना ही मुलगी झाली. दरेली यांनी अंगणवाडी शिक्षिका आणि इतरही काही नोकऱ्या केल्या. पण त्यांच्यामध्ये असणारी खेळाची आवड त्यांना शांत बसू देत नव्हती. मैदानात काहीतरी करावे यासाठी दरेली यांच्या पतीनेही त्यांना कायम प्रोत्साहन दिले. खो-खो, व्हॉलिबॉल, हॅंडबॉल, कबड्डी यांसारख्या खेळांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले. शहर आणि राज्य स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत दरेली यांनी बरीच पदके आणि पुरस्कार जिंकले. 

(Image : Google)

२००७ मध्ये त्या पोलिस विभागात होमगार्ड पदासाठी नियुक्त झाल्या. त्यानंतर आपल्या कामाच्या बळावर त्यांना कॉन्स्टेबल पदापर्यंत प्रमोशन मिळाले. आपल्या आईचे करियर पाहून त्यांची मुलगी त्रिलोकीनी हीनेही याच क्षेत्रात करीयर करायचे ठरवले. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्रिलोकीनी हिने सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी तिची आईही प्रमोशनमध्ये या पदासाठी तिच्यासोबत असल्याचे तिला समजले. आता माय-लेकींमध्ये प्रत्यक्षात कोणाला हे पद मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.    

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीपोलिसपरीक्षा