Join us

व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:20 IST

हे गाव दुर्गम असलं तरीही येथील साक्षरता दर ९०% आहे, जो अनेक मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात पडियाल नावाचं एक छोटेसं गाव आहे, ज्याला 'अधिकाऱ्यांचं गाव' असं म्हणतात. या गावाने १०० हून अधिक आयएएस आणि आयपीएस अधिकारी दिले आहेत. येथील मुलं UPSC, NEET आणि JEE सारख्या कठीण परीक्षा सहज उत्तीर्ण करतात. एवढंच नाही तर गावातील लोक न्यायाधीश, इंजिनिअर, डॉक्टर आणि इतर सरकारी नोकऱ्यांमध्येही मोठ्या पदांवर आहेत.

छोट्या गावाची मोठी कमाल

पडियाल गावात फक्त ५००० लोक राहतात. हा एक आदिवासी भाग आहे, जिथे बहुतेक लोक भिल्ल जमातीचे आहेत. हे गाव दुर्गम असलं तरीही येथील साक्षरता दर ९०% आहे, जो अनेक मोठ्या शहरांपेक्षा जास्त आहे. गावात फक्त एकच उच्च माध्यमिक शाळा आहे, पण मुलं शहरासारख्या सुविधांशिवाय नीट आणि जेईई सारख्या परीक्षा उत्तीर्ण होतात. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं.

लहानपणापासूनच कठीण परीक्षांची तयारी

पडियाल गावात शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. मुलं अगदी लहानपणापासूनच कठीण परीक्षांची तयारी करायला सुरुवात करतात. त्यांना आयएएस, आयपीएस किंवा इतर मोठ्या पदांवर असलेल्या त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळते. अनेक मुलांना परदेशात चांगल्या नोकऱ्याही मिळतात. गावात कोचिंग सेंटर किंवा आधुनिक तंत्रज्ञान नाही, तरीही कठोर परिश्रमामुळे मुलं यशस्वी होतात. गावातील लोक मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करतात.

स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र अभ्यास

वडीलधारी त्यांच्या यशोगाथा सांगतात, ज्या मुलांना प्रेरणा देतात. मर्यादित साधनसंपत्ती असूनही येथील मुलं कठोर परिश्रम करतात. ते त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र अभ्यास करतात. जर इच्छाशक्ती असेल तर कोणतंही कठीण काम सोपं होऊ शकतं हे या गावाने सिद्ध केलं आहे.

देशासाठी एक आदर्श उदाहरण

पडियाल गावाचे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सुविधांचा अभाव स्वप्नांना थांबवू शकत नाही हे गाव सिद्ध करतं. कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाने कोणीही आपलं ध्येय साध्य करू शकतं. पडियाल आज देशासाठी एक आदर्श उदाहरण बनलं आहेत. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी