Join us
Daily Top 2Weekly Top 5

Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:59 IST

Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची राज्याच्या राज्यपालांचे 'एड-डी-कँप' (ADC) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून हा मान मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात एका महत्त्वपूर्ण टप्प्याची नोंद झाली आहे. स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची राज्यपालांचे 'एड-डी-कँप' (ADC) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून हा मान मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये साध्य झालेला हा ऐतिहासिक पराक्रम त्यांच्या उत्कृष्ट सेवेचा आणि देशाच्या संरक्षण क्षेत्रात महिलांच्या वाढत्या नेतृत्वाचा मोठा पुरावा आहे.

स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी या मूळच्या ओडिशातील गंजम जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथील आहेत. त्यांना लष्करी सेवेचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांचे वडील मनोरंजन पाढी हे भारतीय हवाई दलातून 'ऑनररी फ्लाईंग ऑफिसर' म्हणून २०२० मध्ये निवृत्त झाले. वडिलांच्या प्रेरणेतूनच त्यांच्यात शिस्त, देशभक्ती आणि देशसेवेची ओढ निर्माण झाली. मनीषा यांनी भुवनेश्वर येथील 'सी.व्ही. रमण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून पदवी पूर्ण केली. त्यानंतर 'एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट' (AFCAT) उत्तीर्ण होऊन त्या हवाई दलात सामील झाल्या.

मनीषा पाढी १९ डिसेंबर २०१५ रोजी भारतीय हवाई दलात 'ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रँच' मध्ये रुजू झाल्या. त्यांनी 'एअर ट्रॅफिक कंट्रोलर' (ATC) म्हणून विशेष प्राविण्य मिळवलं, जेथे अचूक निर्णयक्षमता आणि कार्यात्मक कौशल्याची गरज असते. १९ डिसेंबर २०१७ रोजी फ्लाईट लेफ्टनंट आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी स्क्वॉड्रन लीडर झाल्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्यांची या प्रतिष्ठित 'एडीसी' पदासाठी निवड झाली.

ऐतिहासिक नियुक्ती

२९ नोव्हेंबर २०२३ रोजी मिझोरमचे तत्कालीन राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपाटी यांनी मनीषा पाढी यांची 'एडीसी' म्हणून नियुक्ती केली. आयझॉल येथील राजभवनात हा सोहळा पार पडला. संरक्षण मंत्रालयाने पाठवलेल्या तीन नावांच्या यादीत दोन पुरुष अधिकारी असतानाही, राज्यपालांनी मनीषा पाढी यांची निवड केली. यामुळे भारतीय सशस्त्र दलातील कोणत्याही शाखेतील पहिल्या महिला एडीसी होण्याचा मान त्यांना मिळाला.

एडीसी (ADC) पदाची जबाबदारी

एखाद्या राज्यपालांच्या 'एडीसी'चे मुख्य काम म्हणजे राज्यपालांना त्यांच्या अधिकृत कर्तव्यात साहाय्य करणं, शासकीय समारंभ आणि दौऱ्यांमध्ये त्यांच्यासोबत राहणं आणि लष्करी शिष्टाचार व प्रशासकीय कामांची चोख अंमलबजावणी करणं होय. जेव्हा राज्यपाल कंभमपाटी यांची ओडिशाच्या राज्यपालपदी बदली झाली, तेव्हा मनीषा पाढी यांनीही ही जबाबदारी सुरू ठेवली. ३ जानेवारी २०२५ रोजी ओडिशात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यातही त्यांनी आपला सहभाग नोंदवला.

English
हिंदी सारांश
Web Title : Squadron Leader Manisha: First Woman ADC to Governor Makes History.

Web Summary : Squadron Leader Manisha Padhi becomes India's first female ADC to a Governor. This milestone highlights her outstanding service and increasing leadership roles for women in the defense sector. Her journey from Odisha to this prestigious position reflects dedication and excellence.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीभारतीय जवान