Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारी! लग्नानंतर १७ वर्षांनी ३ मुलांची आई झाली BPSC टॉपर; टोमणे मारणारेही करताहेत अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:36 IST

ज्योत्स्ना प्रिया यांनी लग्नाच्या १७ वर्षांनंतर ६९ व्या बिहार लोकसेवा आयोगाची टॉपर बनून अधिकारी होण्याचं यश मिळवलं आहे.

लग्नानंतर मुलींचं आयुष्य अनेकदा स्वयंपाकघरापुरतंच मर्यादित असतं असं काही जण म्हणतात. संपूर्ण दिवस मुलांची काळजी घेण्यात जातो, परंतु बिहारमधील ज्योत्स्ना प्रिया यांची यशोगाथा सर्वच महिलांसाठी प्रेरणादायी आहे. ज्योत्स्ना प्रिया यांनी लग्नाच्या १७ वर्षांनंतर ६९ व्या बिहार लोकसेवा आयोगाची टॉपर बनून अधिकारी होण्याचं यश मिळवलं आहे.

ज्योत्स्ना प्रिया म्हणतात, "मी ज्या कुटुंबाशी संबंधित आहे तिथून शिकले की, तुमचं आयुष्य कोणी बदलू शकत असेल असं जर वाटत असेल तर आरशासमोर उभं राहून पाहा. तुमच्या समोर दिसणारी व्यक्तीच तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकते. माझ्या गोष्टीत माझा आणि माझ्या कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा होता."

लग्नानंतर १७ वर्षांनी BPSC मध्ये २६२ वा रँक मिळवणाऱ्या ज्योत्स्ना प्रिया बिहारच्या सीतामढीची रहिवासी आहेत. ज्योत्स्ना यांनी २००७ मध्ये प्रवीण सिंह यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना तीन मुलं आहेत. लग्नानंतर त्यांनी काहीतरी मोठं करायचं ठरवलं. त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे हे माहीत होते. म्हणूनच पुस्तकांशी पुन्हा मैत्री केली. 

सासरच्या घरी राहत असताना २०१४ मध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. बी.कॉम पदवी मिळवली. २०१८ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर बिहार लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. त्या चार वेळा अयशस्वी झाल्या, पण तरीही जिद्द सोडली नाही किंवा मेहनत करणं थांबवलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की २०२४ मध्ये त्या यशस्वी झाल्या.

ज्योत्स्ना प्रिया सांगतात की, सकाळी मुलांसाठी जेवण बनवताना त्या YouTube व्हिडीओ पाहून चालू घडामोडींची तयारी करत असे. मुलं शाळेत गेल्यावर आणि नवरा दुकानात गेल्यावर त्या अभ्यास करायला बसायच्या. रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करायच्या आणि पहाटे चार वाजता उठून पुन्हा अभ्यास करायच्या. रोज सहा तास अभ्यास करायच्या. 

सात वर्षानंतर जेव्हा मी पुन्हा पुस्तकं घेतली, तेव्हा लोक मला टोमणे मारायचे. मुलांना शाळेत पाठवण्याच्या वयात मी स्वतः वाचायला सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये माझ्या वयाचा एकही विद्यार्थी नव्हता. पाच वर्षे कोणत्याही लग्न समारंभाला जाऊ शकले नाही. मला फक्त BPSC पास करून DSP व्हायचं होतं पण मी अधिकारी झाले. आता ते टोमणे मारणारे लोक माझं यश पाहून अभिनंदन करत आहेत असं ज्योत्स्ना प्रिया यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी