Join us

प्राजक्ता देसाईंची 'गगनभरारी'! 'अशी' कामगिरी करणाऱ्या सैन्यदलातील पहिल्या महिला अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:23 IST

भारतीय सैन्यात सामील होण्याचं स्वप्न आठ वर्षांच्या असतानाच पाहिलं आणि ते स्वप्न साकारही केलं.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. मेजर प्राजक्ता देसाई २०२० मध्ये अनमॅन्ड एरियल व्हेईकल ऑब्झर्व्हर बनणाऱ्या भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत. भारतीय सैन्यात सामील होण्याचं स्वप्न त्यांनी आठ वर्षांच्या असतानाच पाहिलं आणि ते स्वप्न साकारही केलं.

प्राजक्ता देसाई म्हणाल्या की, "जेव्हा मी आठ वर्षांची होती, तेव्हा मी ‘बॉर्डर’ हा चित्रपट पाहिला आणि माझ्या वडिलांना सांगितलं की, मला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे. माझे वडील म्हणाले, एक दिवस, तू हे नक्की करशील. आर्मी ऑफिसर बनण्याचं ध्येय कायम माझ्यासोबत होतं. माझी आई तिच्या काळात एनसीसी कॅडेट होती. मी २००७ ते २००९ या कालावधीत एअर-विंग NCC मध्ये देखील सामील झाले. मला मायक्रोलाइट एअरक्राफ्ट आणि सेल-प्लेन (ग्लाइडर्स) उडवण्याची संधीही मिळाली."

"मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि NCC मध्ये माझी तीन वर्षे पूर्ण केली तेव्हा मला अनेक समविचारी लोक भेटले होते. माझ्यासारखेच ध्येय असल्याने, मला माझ्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करण्यात मदत झाली. मी २००९ मध्ये माझी CDS परीक्षा दिली. वर्षाच्या अखेरीस मी SSB मुलाखत आणि मेडिकलसाठी गेले. पण बाहेर पडले कारण तेव्हा माझी रँक २१ होती आणि सीट्स फक्त १० होत्या. पण नंतर सीट्स वाढवल्या." 

"मी भाग्यवान होते, सीट्स वाढवल्या. दोन आठवड्यांनंतर मी एकॅडमी जॉईन केली. ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये तुम्ही फक्त कॅडेट असता. तुम्ही स्त्री आहात की पुरुष याने काही फरक पडत नाही. OTA चेन्नई हे असं ठिकाण आहे जिथे शारीरिक पेक्षा जास्त मानसिकरित्या तग धरण्याची गरज आहे. एक वर्षाच्या कठोर ट्रेनिंगनंतर, शेवटी माझ्या पासिंग आऊट परेडला उपस्थित राहण्यासाठी मी माझ्या पालकांचं तिकीट बुक केलं."

"मी आर्मी एअर डिफेन्समध्ये एक वर्ष सेवा केली आणि त्यानंतर माझं आर्मी एव्हिएशन कॉर्प्समध्ये पोस्टिंग करण्यात आलं, जिथे मी पुढील नऊ वर्षे काम केलं. माझ्या दहा वर्षांच्या कामात मी देशाच्या उत्तर, पूर्व आणि पश्चिम भागात सेवा केली आहे. भारतीय सैन्य हे केवळ काम नसून जीवनाचा एक मार्ग आहे. तरुण मुली जेव्हा आर्मी ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहतात तेव्हा मला खूप आनंद होतो कारण मी हे करू शकले तर कोणीही ते करू शकतं" असं प्राजक्ता देसाई यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीभारतीय जवान