जिद्द असली की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. चंदीगडमधील १६ वर्षांच्या विद्यार्थिनीने अनेक अडचणींवर मात करून घवघवीत यश संपादन केलं आहे. 'काफी'असं विद्यार्थिनीचं नाव आहे. काफीने चंदीगड येथील इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड येथे बारावीच्या परीक्षेत ९५.२% गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक पटकावला. लहानपणी अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेल्या काफीचं हे यश प्रेरणादायी आहे.
काफी अवघ्या ३ वर्षांची असताना होळी खेळत होती. त्यावेळी हिसार गावातील तीन पुरुषांनी तिच्यावर अॅसिड फेकलं. या हल्ल्यात तिने कायमची दृष्टी गमावली. पालकांनी दिल्लीतील एम्ससह अनेक रुग्णालयात तिच्यावर उपचार केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या काळात कुटुंबाने आपली सर्व सेव्हिंग ही उपचारांवर खर्च केली. काफीला चंदीगडमधील इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंडमध्ये प्रवेश मिळाला.
आयएएस अधिकारी होण्याचं मोठं स्वप्न
काफीने ब्रेल, ऑडिओ बुक्स आणि इतर सहाय्यक उपकरणांच्या मदतीने खूप अभ्यास केला. तिला दहावीच्या परीक्षेतही चांगले गुण मिळाले होते. आता तिने बारावीतही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचं काफीचं मोठं स्वप्न आहे.
कुटुंबाचा पाठिंबा आणि संघर्ष
काफीचे वडील पवन कुमार चंदीगड सचिवालयात काम करतात. त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी अनेक त्याग केले आहेत. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, काफीच्या उपचारावर आतापर्यंत खूप पैसे खर्च झाले आहेत. हल्लेखोरांना फक्त दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे कुटुंबाला योग्य न्याय मिळाला नाही असं वाटत आहे.