मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरच्या मुक्ता सिंहने सैन्यात लेफ्टनंट बनून इतिहास रचला आहे. बिहारच्या गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अकादमी (ओटीए) येथे झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये तिने ओव्हरऑल ऑर्डर ऑफ मेरिटमध्ये तिसरं स्थान आणि कांस्यपदक मिळवलं.
मुक्ता सिंह ही मूळची ग्वाल्हेरची आहे आणि तिचा जन्म भिंड येथे झाला. मुक्ताने ग्वाल्हेरमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली आणि काही काळ मालनपूर येथील एका फॅक्ट्रीमध्ये काम केलं. मुक्ताला लहानपणापासूनच संरक्षण क्षेत्रात सामील होण्याची इच्छा होती.
मुक्ताचे आजोबा हरबीर सिंह यादव यांचंही स्वप्न होतं की, आपल्या कुटुंबातील कोणीतरी सैन्यात भरती व्हावं, हे स्वप्न आता मुक्ताने पूर्ण केलं आहे. मुक्ता दोन प्रयत्नांमध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकली नाही, परंतु तिच्या तिसऱ्या प्रयत्नात तिने शॉर्ट सर्व्हिस कमिशन टेक्निकल वुमन-३२ कोर्समध्ये ऑल इंडिया रँक १ मिळवून यश मिळवलं.
सुरुवातीला मुक्ताचं प्रशिक्षण चेन्नई ओटीए येथे झालं, परंतु नंतर हा अभ्यासक्रम बिहारमधील गया ओटीए येथे ट्रान्सफर करण्यात आला. तिचे वडील राजबीर सिंह भारतीय हवाई दलात अधिकारी होते, तर आई ब्रिजमोहिनी यादव क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. इंजिनिअरिंगनंतर तिने देशसेवा करण्याचं मोठं स्वप्न पाहिलं आणि कष्टाने ते साकार केलं. तिच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे.