आईपण आणि करिअरमध्ये आलेले अडथळे पार करत एका महिलेने सुरू केलेला प्रवास सध्या इन्स्टाग्रामवर अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. उच्चशिक्षित असलेल्या प्रिया पोरवाल यांनी त्यांच्या शैक्षणिक यशानंतरही आयुष्यात आलेल्या संघर्षांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. ३९ वर्षीय पोरवाल यांनी सांगितलं की, वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांनी पहिल्या मुलाला जन्म दिला. तो क्षण त्यांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आला, पण त्याच वेळी त्यांची प्रोफेशनल जर्नी थांबली. "आणि अचानक, १२ वर्षांच्या करिअरला पूर्णविराम मिळाला" असं म्हटलं आहे.
पोरवाल एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. हे पद त्यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मिळवलं होतं. मात्र, पाच वर्षांच्या सेवेनंतर जेव्हा त्यांना कामावरून कमी करण्यात आलं (ले-ऑफ), तेव्हा त्यांचं आयुष्य हादरून गेलं. "त्या धक्क्यातून सावरण्यासाठी मला अनेक महिने लागले - जणू पायाखालची जमीनच सरकली होती" असं त्यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितलं.
"कोरोना आणि आईपण यामुळे सर्वकाही बदललं"
जिद्दीने पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये 'व्हिजिटिंग फॅकल्टी' म्हणून काम शोधलं आणि नंतर त्यांना दुसरी शैक्षणिक नोकरी मिळाली. पण परिस्थिती अपेक्षेप्रमाणे सुधारली नाही. "तिथली कामाची संस्कृती मिळती-जुळती नव्हती. पुन्हा एकदा एका संधीचं दार बंद झालं" असं त्या म्हणाल्या. एम.टेक, एमबीए आणि डॉक्टरेट (पीएचडी) अशा अनेक पदव्या असूनही, करिअरची पुन्हा सुरुवात करणं सोपं नव्हतं. कोरोना आणि मातृत्वाची जबाबदारी यामुळे ही आव्हानं अधिकच वाढली होती. "कोरोना आणि आईपण यामुळे सर्वकाही बदललं" असं त्यांनी नमूद केले.
"मी पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला"
वयाच्या ३७ व्या वर्षी, दोन वर्षांचं बाळ असताना आणि दोनवेळा नोकरी गमावल्यानंतर त्यांनी आपल्या करिअरची सूत्रं स्वत:च्या हातात घेण्याचं ठरवलं. त्या लिहितात, "मी पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. ते ही माझ्या अटींवर... कारण माझे आर्थिक स्वातंत्र्य कुठेतरी अडकल्यासारखं वाटत होतं आणि मला ते तसं राहू द्यायचं नव्हतं."
"हे फक्त पैशांसाठी नव्हते, तर माझ्या स्वतःसाठी होते"
या नवीन टप्प्यात पाऊल ठेवताना आपल्या पर्सनल भीतीवर मात करण्याबद्दलही पोरवाल यांनी सांगितलं. "मी घाबरले होते. मला कॅमेऱ्यासमोर यायची भीती वाटत होती. ऑनलाइन येण्यापूर्वी मी माझे मित्र आणि नातेवाईकांना ब्लॉक केलं होतं" असं त्यांनी मान्य केलं. केवळ गुंतवणुकीचे पैसे वसूल व्हावेत, हीच त्यांची सुरुवातीची आशा होती. त्या म्हणतात, "हे फक्त पैशांसाठी नव्हते, तर माझ्या स्वतःसाठी होते."
"आज मी स्वतःची बॉस आहे"
"आज मी स्वतःची बॉस आहे. मी माझ्या मुलासोबत वेळ घालवत माझं काम करते. गेल्या वर्षी मी माझ्या डिजिटल व्यवसायातून कमाई केली. मी स्वतःसाठी हा निर्णय घेतला, याचा मला खूप आनंद आहे" असं त्या अभिमानाने सांगतात. त्यांच्या या गोष्टींवर सोशल मीडिया युजर्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिलं, "हे अत्यंत प्रेरणादायी आहे." तर दुसऱ्याने म्हटलं, "हा संदेश खूप शक्तिशाली आहे. एकदा प्रबळ इच्छाशक्ती आणि लक्ष केंद्रित केले की काहीही अशक्य नाही."
