प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. राजस्थानच्या 'लेडी सिंघम'ची अशीच प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. डॉ. अदिती उपाध्याय यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्यापासून तरुणांना प्रेरणा मिळत आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील असलेल्या अदिती यांनी सर्वात आधी बीडीएसचे शिक्षण घेतलं आणि डॉक्टर झाल्या, परंतु UPSC पास होणं हे त्यांचं स्वप्न होतं.
डॉक्टर असतानाही त्यांचं ध्येय हे नागरी सेवेत सामील होण्याचं होतं. दिवसा रुग्णांवर उपचार करायच्या आणि रात्री यूपीएससीची तयारी करायच्या. असं रुटीन त्यांनी सेट केलं होतं. विशेष म्हणजे अदिती यांनी या तयारीसाठी कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही. फक्त ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा रेफरन्स घेतला, त्यांनी त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात १२७ वा रँक मिळवला.
डॉ. अदिती उपाध्याय यांनी सांगितलं की, यूपीएससी मुलाखतीच्या अगदी आधी त्यांनी हनुमान चालीसाचं पठण केलं आणि त्याच आत्मविश्वासाने त्यांची निवड झाली. मुलाखतीपूर्वीच त्यांनी डॉक्टरची नोकरी सोडली होती जेणेकरून त्यांचं संपूर्ण लक्ष मुलाखतीवर केंद्रित करता येईल.
अदिती सध्या राजस्थान केडरमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून सेवा देत आहेत. त्यांचा प्रवास फक्त करिअर बदलणाऱ्यांसाठीच नाही तर तरुणांसाठी एक संदेश आहे की स्वप्नं कधीही बदलू शकतात, फक्त कठोर परिश्रम करण्याची तयारी आणि हेतू खरा असला पाहिजे. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं.