Join us

Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:51 IST

Khushbu Saroj : अहमदाबादची रहिवासी असलेली खुशबू भारतीय संघात सामील झाली आहे. तिच्यासाठी फुटबॉल हे तिचं आयुष्य आहे. खुशबूचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. 

१८ वर्षीय खुशबू सरोज एएफसी अंडर-२० महिला आशियाई कप पात्रता स्पर्धेत इंडोनेशियाशी सामना करणार आहे. तिने यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्या मेहनतीचं आता तिला फळ मिळालं आहे. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी ती लढत आहे. अहमदाबादची रहिवासी असलेली खुशबू भारतीय संघात सामील झाली आहे. तिच्यासाठी फुटबॉल हे तिचं आयुष्य आहे. खुशबूचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. 

"माझे वडील लोकांच्या घरात माळी म्हणून काम करतात. मी फुटबॉल खेळण्यासाठी शॉर्ट्स घालून घराबाहेर पडायची तेव्हा वडिलांचे मित्र त्यांची खूप खिल्ली उडवायचे, यामुळे पुढे काहीच होणार नाही असं म्हणायचे.  पण माझी आई आणि बहिणींनी कधीही हार मानली नाही. त्या माझी ताकद होत्या" असं खुशबू सरोजने म्हटलं आहे. 

अहमदाबादच्या अरुंद गल्लीतून खूशबूचा प्रवास सुरू झाला, जिथे तिने तिच्या शाळेतील वरिष्ठ खेळाडूंना खेळताना पाहिल्यानंतर पहिल्यांदा फुटबॉलला लाथ मारली. सुरुवातीला मुलीने फुटबॉल खेळावं असं तिच्या वडिलांना वाटत नव्हतं.  गुजरात राज्य संघात स्थान मिळवल्यानंतर तिच्या वडिलांचा दृष्टिकोन बदलू लागला. “जेव्हा मी भारताची जर्सी घातली आणि माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर थायलंडहून परतले तेव्हा माझे पालक माझं स्वागत करण्यासाठी आले. त्यांना माझा अभिमान वाटत होता" असं खुशबूने म्हटलं आहे. 

खुशबूच्या प्रशिक्षक ललिता सैनी यांनी या सर्व कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली. "ललिता मॅडम मला माझ्या दुसऱ्या आईसारख्या होत्या. त्यांनी मला आहार, शिस्त, मेंटल स्ट्रेंथ या सर्व गोष्टींमध्ये मार्गदर्शन केलं. २०२२ मध्ये जेव्हा मी दुखापतग्रस्त झाले आणि माझ्या पालकांनी मी खेळ सोडावा का असं विचारलं, तेव्हा ललिता मॅडमने मला सांगितलं की दुखापती खेळाडूच्या आयुष्याचा एक भाग आहेत.  मी कमबॅक केलं" असं खुशबूने म्हटलं आहे. 

खुशबूच्या वडिलांनी "मी तिला प्रशिक्षणासाठी जाताना थांबवायचो. आज मला तिचा अभिमान वाटत आहे" असं म्हटलं आहे. तर आईने "लोक आमची थट्टा करायचे. पण आज स्वप्नासारखं वाटत आहे. आमची मुलगी भारतासाठी खेळेल याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती" असं सांगितलं. खुशबूपासून अनेक जणांना प्रेरणा मिळत आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी