IAS, IPS किंवा IFS होणं अनेकांचं स्वप्न असतं. आपल्या स्वप्नांसाठी बरेच लोक स्वेच्छेने मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडतात. तृप्ती भट यांची अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. त्यांनी UPSC परीक्षा यशस्वीपणे पास होण्यापूर्वी १६ सरकारी नोकरीच्या ऑफर नाकारल्या. उत्तराखंड येथील आयपीएस अधिकारी तृप्ती भट या चार भावंडांमध्ये सर्वात मोठ्या होत्या.
अल्मोडामध्ये तृप्ती यांनी बारावीपर्यंतच शिक्षण घेतलं. पंतनगर विद्यापीठातून इंजिनिअरिंगच डिग्री घेतल्यानंतर, त्यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी, त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सह विविध सरकारी संस्थांकडून १६ नोकरीच्या ऑफर नाकारण्याचा धाडसी निर्णय घेतला.
नववीत असताना त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्याची मोठी संधी मिळाली. भेटीदरम्यान, त्यांनी त्यांना एक हस्तलिखित पत्र भेट दिलं. ज्यामध्ये त्यांना राष्ट्रसेवेच्या त्यांच्या वचनबद्धतेने प्रेरित केलं होतं. २०१३ मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तृप्ती यांनी १६५ वा रँक मिळवला आणि IPS सेवेची झाल्या.
तृप्ती यांची डेहराडूनमध्ये पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर, त्यांनी चमोलीत एसपी म्हणून काम केलं आणि नंतर टिहरी गढवालमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) च्या कमांडरची भूमिका स्वीकारली. सध्या त्या डेहराडूनमध्ये इंटेलिजन्स आणि सिक्युरिटीसाठी एसपी म्हणून तैनात आहेत. तृप्ती यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.