चीनच्या हुनान प्रांतातील रहिवासी ३० वर्षीय ली झियांगयांग याने आपल्या हिमतीसमोर प्रत्येक अडचण छोटी असते हे सिद्ध केलं आहे. लहानपणी एका घटनेमुळे त्याने दोन्ही हात गमावले असले तरी आज तो युनिसायकलवर बसून फूड डिलिव्हरीचं काम करत आहे. तसेच रात्रीच्या वेळी आपल्या पायाने सुंदर कॅलिग्राफी करून आपल्या कुटुंबाचं पोट भरतो. त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
ली झियांगयांग चार वर्षांचा असताना विजेच्या धक्क्यामुळे त्याने दोन्ही हात गमावले. त्यानंतर त्याचं कुटुंब कर्जात बुडालं. पण लीने कधीही हार मानली नाही. वयाच्या आठव्या वर्षी त्याने पायाने लिहायला आणि कॅलिग्राफी करायला सुरुवात केली. हळूहळू त्याने ते उत्पन्नाचं साधन बनलं. मुलांचं शिक्षण आणि खर्च वाढले तेव्हा लीने पार्ट टाईम डिलिव्हरी जॉब सुरू केला. तो युनिसायकलवरून ऑर्डर पोहोचवतो. पहिल्या महिन्यातच त्याने सुमारे २०० ऑर्डर पूर्ण केल्या आणि १३०० युआन (अंदाजे ₹१५,०००) मिळवले.
पायात ब्रश धरून कॅलिग्राफी
रेस्टॉरंट कर्मचारी अनेकदा त्याला त्याची ऑर्डर पॅक करण्यास मदत करतात. बरेच ग्राहक स्वतः येऊन ऑर्डर घेतात. नूडल शॉपचा मालक त्याला मोफत पाणी आणि अन्न देतो. सहकारी डिलिव्हरी बॉय त्याला वेळ वाचवण्यासाठी युक्त्या देखील शिकवतात. रात्री ली पर्यटन स्थळांवर स्टॉल लावतो आणि पायात ब्रश धरून कॅलिग्राफी करतो. सरकारने त्याला स्वस्त घर आणि मोफत स्टॉल देखील दिला आहे, जेणेकरून तो अधिक चांगलं काम करू शकेल.
अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी
ली म्हणतो की, "जे घडलं ते बदलता येत नाही. आता आपल्याला फक्त पुढे जायचं आहे. तक्रार करून काही फायदा नाही." तो मुलांना प्रेरणादायी भाषणं देण्यासाठी शाळा आणि गावांमध्ये देखील जातो आणि स्वतः अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. सोशल मीडियावर लोक लीला खरा हिरो म्हणत आहेत. लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.