३४ वर्षीय गुरदीप कौर वासूला ऐकता, बोलता, पाहता येत नाही. पण तिने कठोर परिश्रमाने सरकारी नोकरी मिळवून इतिहास रचला आहे. कर्मशियल टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तिची नियुक्ती झाली आहे. अशा प्रकारची महिला सरकारी सेवेत रुजू होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचं म्हटलं जात आहे. गुरदीपच्या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष आहे. तिच्या कामगिरीमुळे सर्वांना तिचा अभिमान वाटत आहे.
गुरदीप कौर वासूला 'इंदूरची हेलन केलर' असंही म्हणतात. हेलन केलर एक प्रसिद्ध अमेरिकन लेखिका होती. ती पाहू, ऐकू आणि बोलू शकत नव्हती. तरीही तिने अनेक पुस्तकं लिहिली. १९९९ मध्ये टाइम मॅगझिनने तिला २० व्या शतकातील १०० सर्वात महत्त्वाच्या लोकांमध्ये समाविष्ट केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरदीपने १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे.
विभागाच्या अतिरिक्त आयुक्त सपना पंकज सोलंकी म्हणाल्या की, गुरदीपची निवड दिव्यांगासाठीच्या विशेष भरती मोहिमेअंतर्गत झाली आहे. तिची निवड तिच्या गुणवत्तेच्या आधारे झाली आहे. गुरदीप मन लावून तिचं काम शिकत आहे. ती वेळेवर कार्यालयात येते आणि जाते. तिला फाईलचं पंचिंग आणि लिफाफ्यांमध्ये कागदपत्रं ठेवण्याचं काम देण्यात आलं आहे. ती सध्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम शिकत आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचा गुरदीपचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
गुरदीपची आई मनजीत कौर वासू आपल्या मुलीच्या यशाने खूप आनंदी आहे. त्या म्हणाल्या की, गुरदीप आमच्या कुटुंबातील पहिली सदस्य आहे जिला सरकारी नोकरी मिळाली आहे. ती कधी या पदावर पोहोचेल याची मी कल्पनाही केली नव्हती. आजकाल लोक मला माझ्या नावाने कमी आणि गुरदीपच्या आईच्या नावाने जास्त ओळखतात. गुरदीप पाच महिन्यांची असताना ती बोलू, ऐकू, पाहू शकत नाही हे आईला समजलं.
दिव्यांगांसाठी काम करणारे लोक गुरदीपच्या यशाने खूप आनंदी आहेत. सामाजिक न्याय कार्यकर्ते ज्ञानेंद्र पुरोहित म्हणाले की, देशात पहिल्यांदाच बोलू, ऐकू आणि पाहू शकत नसलेली महिला सरकारी सेवेत रुजू झाली आहे. हा संपूर्ण दिव्यांगांसाठी एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी क्षण आहे. यानंतर गुरदीपने देखील ती खूप आनंदी असल्याचं म्हटलं आहे.