भारताची बुद्धिबळपटू अन्वी दीपक हिंगे हिने २० ते २९ एप्रिल दरम्यान झालेल्या वेस्टर्न एशियन युथ चेस चॅम्पियनशिप २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. महाराष्ट्राच्या या लेकीने कमाल केली आहे. ८ वर्षांच्या मराठमोळ्या लेकीचा जगभरात डंका पाहायला मिळत आहे. अन्वीने ८ वर्षांखालील मुलांच्या गटात भाग घेतला आणि एकूण सहा मेडल जिंकले, ज्यामध्ये २ गोल्ड आणि ४ सिल्व्हर मेडल आहेत.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक देशांचे खेळाडू होते. पण अन्वीने उत्तुंग भरारी घेतली. तिच्या यशाचा भारताला अभिमान आहे. या चिमुकलीचं विमानातही जंगी स्वागत करण्यात आलं. टाळ्यांच्या कडकडाट विमानातील लोकांनी तिचं भरभरुन कौतुक करत अभिनंदन केलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पुणे जिल्ह्यातील चिमुकल्या अन्वीने याआधी देखील अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. लहानपणापासूनच तिला बुद्धिबळाची खूप आवड होती. तिच्या पालकांनी तिची ही आवड जोपासली. पालकांचा पाठिंबा आणि टॅक्टिकल मूव्हज चेस एकॅडमीच्या मार्गदर्शनाने तिच्या कौशल्यांचा विकास करण्यात आला. आतापर्यंतच्या प्रत्येक स्पर्धेत अन्वीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
खेळताना प्रेशर असतानाही लक्ष केंद्रित करण्याची आणि विचारपूर्वक चाली करण्याची तिची क्षमता तिला इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरवते. प्रत्येक सामन्यात तिचा दृढनिश्चय आणि चिकाटी स्पष्ट दिसून आली आहे, तिने कधीही हार मानली नाही आणि नेहमीच खेळ तिच्या बाजूने वळवण्याचा मार्ग शोधत राहते.
अन्वीच्या यशात योगदान देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे तिचा कठोर प्रशिक्षण दिनक्रम. ती वेगवेगळ्या बुद्धिबळ रणनीतींचा अभ्यास करण्यात, मागील खेळांचे विश्लेषण करण्यात आणि तिचे प्रशिक्षक FIDE प्रशिक्षक प्रतीक मुळे यांच्यासोबत सराव करण्यात तासनतास घालवते. या समर्पण आणि कठोर परिश्रमाचे तिला नेहमीच फळ मिळतं.
बुद्धिबळाच्या पटावरील तिच्या उल्लेखनीय कौशल्यांव्यतिरिक्त अन्वी ही एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमधील अनेक मुलांना प्रेरणा देत आहे. तिच्या कामगिरीमुळे इतरांना आपलं ध्येय साध्य करण्याची उर्जा मिळत आहे. बुद्धिबळ स्पर्धेतील यशाबद्दल सर्वांनीच अन्वी दीपक हिंगे हिच भरभरून कौतुक केलं आहे.