Join us

मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 18:37 IST

प्रेरणा सिंह यांनी लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिलं होतं आणि पुढे आपल्या अथक परिश्रमांनी ते साकार केलं आहे.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. प्रेरणा सिंह यांनी लहानपणापासूनच सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिलं होतं आणि पुढे आपल्या अथक परिश्रमांनी ते साकार केलं आहे. मेजर प्रेरणा सिंह खिंची या भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत पोहोचल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचीच  जोरदार चर्चा रंगली आहे.

लहानपणी आजोबा आणि पणजोबा यांना गणवेशात पाहून त्यांच्या मनात देशसेवेची आवड निर्माण झाली. त्यांनी मोठं स्वप्न पाहिलं. प्रेरणा यांचे वडील भारतीय सैन्यात  होते आणि काका बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट होते. कुटुंबीयांना पाहूनच त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला. २०११ मध्ये त्या पहिल्याच प्रयत्नात सैन्यात भरती झाल्या.

प्रेरणा यांचं ५ वर्षांपूर्वी लग्न झालं. त्यांचे पती मंधाता सिंह हे एक वकील आहेत. त्यांना प्रतिष्ठा नावाची मुलगी आहे. त्या धम्मोरा गावातील पहिली सून आहे जी भारतीय सैन्यात कार्यरत आहे. प्रेरणा यांना घरी असताना पारंपारिक राजपूत पोशाख घालायला आवडतं. कर्तव्यावर असतानाही त्या लष्कराच्या गणवेशातच असतात.

मेरठ आणि जयपूरनंतर  प्रेरणा सिंह खिंची  यांचं सध्या पुण्यात पोस्टिंग आहे.  प्रेरणा यांचे आजोबा आणि पणजोबा, वडील, काका हे सैन्यात होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर तसेच संस्कार झाले. घरच्या जबाबदाऱ्यांसोबत एक महिला देशसेवा देखील करू शकते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे.  त्यांच्यापासून अनेक महिलांना प्रेरणा मिळत आहे.

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीभारतीय जवान