Join us

कष्टाचं फळ! दिवसा काम, रात्री अभ्यास... स्वप्नांचा केला पाठलाग, झाली IAS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:03 IST

IAS Shweta Bharti : बिहार केडरमध्ये तैनात असलेल्या आयएएस श्वेता भारती यांची

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांच्या यादीत समाविष्ट आहे. बहुतेक उमेदवार यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी कोचिंगची मदत घेतात. पण काही लोकांनी कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्याच्या कौतुकास्पद घटनाही समोर आल्या आहेत. बिहारच्या रहिवासी असलेल्या आणि बिहार केडरमध्ये तैनात असलेल्या आयएएस श्वेता भारती यांची यशोगाथा सर्व तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

श्वेता भारती यांनी यूपीएससी परीक्षेपूर्वी बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. पण त्यांचं स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचं होतं आणि म्हणूनच नोकरी मिळूनही त्यांनी कठोर परिश्रम सुरू ठेवले. ९ तास काम करून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि नंतर मोठं यश मिळवलं.

श्वेता भारती यांचा जन्म बिहारमधील नालंदा जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच त्या अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी पटना येथील इशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर भागलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांना देशातील टॉप कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोमध्ये नोकरी मिळाली.

श्वेता यांना अधिकारी व्हायचं होतं. म्हणूनच त्यांनी खासगी नोकरीसोबतच सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, त्या नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ शकत नव्हत्या. श्वेता भारती दिवसा काम करायच्या आणि रात्री अभ्यास करायच्या. अशाप्रकारे काम करताना त्यांनी आपलं ध्येय साध्य करण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

२०२० मध्ये झालेल्या बीपीएससीच्या ६५ व्या परीक्षेत श्वेता भारती यांनी ६५ वा रँक मिळवला होता. यानंतर त्यांना प्रोग्राम ऑफिसर (डीपीओ) म्हणून सरकारी नोकरी मिळाली. बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. अखेर त्यांच्या मेहनतीचं चीज झालं आणि त्या २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. श्वेता भारती या सध्या बिहारमधील भागलपूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी