उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील रघुनाथपूर या छोट्याशा गावात आयएएस अधिकारी पवन कुमार यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट होती. पवन कुमार यांचे वडील मुकेश कुमार हे एक शेतकरी आणि मनरेगा मजूर होते. कुटुंबाकडे उत्पन्नाचा कोणताही स्थिर सोर्स नव्हता. बऱ्याचदा दोन वेळचे जेवणही मिळणं देखील कठीण होतं.
पवन यांनी लहानपणापासूनच गरिबी पाहिली आणि अनुभवली. घरात वीज नव्हती, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला. शिक्षणाद्वारे आपल्या कुटुंबाची गरिबी कायमची नष्ट करण्याचा त्यांचा निर्धार होता. पवन यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून त्याचे वडील आणि तीन बहिणी इतरांच्या शेतात काम करत होते. त्यांच्या आईने मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दागिने विकले. कुटुंबाने पवन यांना कधीही हार मानू दिली नाही.
सेल्फ स्टडी करण्यास सुरुवात
जेव्हा पवन यांना यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीला जावे लागले तेव्हा घरातील आर्थिक अडचणींमुळे नवीन मोबाईल खरेदी करणंही अशक्य होतं. त्यानंतर वडिलांनी मोठ्या कष्टाने ३,२०० रुपयांचा जुना, सेकंड-हँड मोबाईल खरेदी केला. पवन यांनी त्याचा वापर करून ऑनलाईन अभ्यास करून तयारी केली. दिल्लीत दोन वर्षे कोचिंग केल्यानंतर सेल्फ स्टडी करण्यास सुरुवात केली.
दोन प्रयत्नांमध्ये अपयशी
यूपीएससी परीक्षेचा मार्ग पवन कुमार यांच्यासाठी सोपा नव्हता. ते त्यांच्या पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरले. २०२२ च्या प्रयत्नात ते फक्त एका गुणाने गेले. अथक प्रयत्न, कुटुंबाचा त्याग आणि त्याच्या समर्पणाचं त्यांना फळ मिळालं. पवन यांनी २०२३ च्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत २३९ वा रँक मिळवून यश मिळवलं. आयएएस अधिकारी झाल्यावर सर्वांनाच मोठा आनंद झाला. त्यांच्यापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.