केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तरुणांच्या गोष्टी या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस आणि आयपीएस अधिकारी होता येतं.
संसाधनांच्या कमतरतेमुळे अनेकदा मागे हटणाऱ्या, खचून जाणाऱ्यांसाठी एस. अश्वथी या एक मोठं उदाहरण आहेत. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत तीन वेळा नापास झाल्यानंतरही एस. अश्वथी यांनी हार मानली नाही आणि चौथ्या प्रयत्नात ४८१ रँक मिळवून आपलं स्वप्न साकार केलं.
केरळमधील तिरुअनंतपुरम येथे राहणाऱ्या अश्वथी यांनी आठवीत असतानाच ठरवलं होतं की, त्या एक दिवस मोठ्या आयएएस अधिकारी होतील. त्यांचे वडील मजूर म्हणून काम करायचे आणि आई गृहिणी होती.
तिरुअनंतपुरम येथील सरकारी बार्टन हिल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना, त्यांना टीसीएसकडून नोकरीची ऑफर मिळाली. २०१७ मध्ये अश्वथी यांनी टीसीएसमधील नोकरी सोडली आणि स्वतःला पूर्णपणे यूपीएससीच्या तयारीसाठी झोकून दिलं.
२०१७ मध्ये त्यांनी परीक्षा दिली पण त्यांना यश आलं नाही. २०१८ मध्येही तिला अपयशाचा सामना करावा लागला. २०१९ मध्ये ती पुन्हा परीक्षेला बसला. पण, यावेळीही तिची निवड झाली नाही. तीन वेळा अपयशी ठरल्यानंतर, अश्वथी यांची अखेर २०२० मध्ये यूपीएससीमध्ये निवड झाली. त्यांना ४८१ वा रँक मिळाला. त्यांच्यापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.