आसामच्या जोरहाट जिल्ह्यातील जोरहाट सेंट्रल स्कूलची विद्यार्थिनी ऐशी प्रिशा बोरा हिने आपल्या कल्पक संशोधनाद्वारे राज्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावलं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तिच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तिला ' राष्ट्रीय बाल पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिला या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
ऐशीने शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधले आहेत. तिने नैसर्गिक शेतीसाठी एक विशेष 'मल्चिंग' तंत्र विकसित केलं आहे. यामध्ये तिने प्लास्टिकऐवजी गवत आणि जुन्या वर्तमानपत्रांचा वापर केला आहे. या पद्धतीमुळे मातीचा पोत सुधारतो, रासायनिक खतांवरील अवलंबून राहणं कमी होतं आणि शेतकऱ्यांना स्वस्त दरात कीड नियंत्रणाचे उपाय मिळतात.
"शेतीमध्ये माझं योगदान असावं"
"माझे हे काम शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरावं आणि शाश्वत शेतीमध्ये माझं योगदान असावं, अशी माझी इच्छा आहे" असे ऐशीने पुरस्कार स्वीकारल्यानंतर आनंदाने सांगितलं. ऐशीचे वडील उज्ज्वल बोराह यांनी सांगितलं की, ऐशीची विज्ञानातील ओढ कोरोना लॉकडाऊन दरम्यान सुरू झाली. तिने त्यावेळी इस्रोच्या (ISRO) एका स्पर्धेत भाग घेतला होता. जरी ती तिथे जिंकली नाही, तरी त्या अनुभवातून तिला संशोधनाची आवड लागली.
#WATCH | Delhi: Awardee Aishi Borah says, "I have got this prize for making a machine that converts newspapers into pencils... Apart from this, I have done many other innovations... I started my journey in class 4th when I participated in the model-making competition organised by… https://t.co/KWaRnYgLMSpic.twitter.com/3ySVmb4U6t
— ANI (@ANI) December 26, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद
या गौरव सोहळ्यानंतर ऐशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची मोठी संधी मिळाली. हा अनुभव तिच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी होता. "पंतप्रधान मोदींना भेटणं हा माझ्यासाठी एक स्वप्नवत अनुभव होता. त्यांनी माझ्या कामाचं खूप कौतुक केलं, यामुळे मला भविष्यात देशासाठी अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे" अशा शब्दांत ऐशीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र
जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारे यंत्र आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या प्रणालीसाठी ऐशीला २०२५ चा दीनानाथ पांडे स्मार्ट आयडिया इन्व्हेन्शन अवॉर्ड मिळाला. अहमदाबाद, ओडिशा आणि दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात तिने आपल्या प्रकल्पांचं सादरीकरण केलं आहे. २०२२ मध्ये तिला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
देशभरात भरभरून कौतुक
आपल्या यशाचं श्रेय ऐशी प्रिशा बोरा हिने आपले शिक्षक, वर्गातील मित्र-मैत्रिणी आणि पालकांना दिलं आहे. भविष्यात आपल्या गावच्या, जिल्ह्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी विज्ञानाच्या माध्यमातून कार्य करत राहण्याचा ऐशीचा संकल्प आहे. ऐशीच्या या संशोधनाचं देशभरात भरभरून कौतुक केलं जात आहे. तिच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
