ऑलिंपिकमध्ये भाग घेणाऱ्या अनेक खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केल्याच्या अनेक घटना सतत समोर येत असतात. आता अशाच एका महिलेची जोरदार चर्चा रंगली आहे. तिचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. साडेसहा महिन्यांची गर्भवती असलेल्या अझरबैजानच्या तिरंदाजाने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. यायलागुल रमाझानोव्हा असं या महिला तिरंदाजाचं नाव आहे.
यायलागुल रमाझानोव्हाने शिन्हुआ न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, शॉट घेण्यापूर्वी बाळाने पोटात लाथ मारली आणि नंतर तिचा अचूक नेम लागला. तिने १० गुण मिळवून कमाल केली आहे. गर्भवती महिलांनी यापूर्वीही ऑलिंपिकमध्ये भाग घेतला आहे. ऑलिंपिक व्यतिरिक्त दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने गर्भवती असताना २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेतला आणि विजेतेपद जिंकण्यात ती यशस्वी झाली.
इजिप्तच्या नादा हाफिजने देखील ऑलिंपिकमध्ये लक्ष वेधून घेतलं. तिने एक गोष्ट शेअर केली. तिने खुलासा केला की, ती एकटी तलवारबाजी करत नव्हती, तर तिच्यासोबत दुसरं कोणीतरी होतं. हाफिज सात महिन्यांची गर्भवती होती. सामन्यादरम्यानचा फोटो शेअर करताना हाफिजने "तुम्ही स्टेजवर दोन खेळाडू पाहू शकता, पण प्रत्यक्षात तीन आहेत. मी, माझा प्रतिस्पर्धी आणि माझं होणारं बाळ" असं म्हटलं होतं.