दिल्लीची रहिवासी असलेल्या हिमांशी टोकसने जगभरात भारताचं नाव उंचावलं आहे. इतिहास रचत हिमांशी जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू बनली आहे. २० वर्षीय हिमांशीच्या यशात तिच्या आजीने महत्त्वाची भूमिका बजावली. आजीने तिला ज्युडो सोडू नकोस असा सल्ला दिला. दिल्लीतील मुनिरका गावची रहिवासी असलेली ही खेळाडू ज्युनियर महिला वर्गात ज्युडो रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. ही कामगिरी करणारी ती भारतातील पहिली ज्युडोका आहे.
हिमांशीने सांगितलं की, लहान असताना घरी ज्युडोचा सराव करताना तिला दुखापत झाली होती. डोळ्याला सूज आली आणि जखमा झाल्या. यामुळे तिच्या आईला काळजी वाटत होती. आईने तिला ज्युडो सोडण्यास सांगितलं. पण तिने नकार दिला आणि तिच्या परिसरातील मार्शल आर्ट्स एकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. जर हिमांशीने तिच्या आईचा सल्ला ऐकला असता तर आज तिने इतिहास घडवला नसता.
आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
हिमांशी महिलांच्या ६३ किलो वजनी गटात जगातील नंबर १ खेळाडू बनली आहे. शिवाय तिने गेल्या आठवड्यात इंडोनेशियात झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आणि आशियातील नंबर १ ज्युडोका बनली. हिमांशीच्या आजीने तिला पाठिंबा दिला आणि ज्युडो सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिलं. तिची आजी हातात झाडू घेऊन तिच्या मागे लागली आणि हे सोडू नकोस असा सल्ला दिला. त्यामुळेच ती आता चॅम्पियन झाली आहे.
"भारतासाठी भरपूर मेडल्स जिंकायची आहेत"
हिमांशीने आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्युडोमध्ये देशासाठी प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे खूप छान वाटतं. "मला नेहमीच चांगलं खेळत राहायचं आहे आणि भारतासाठी भरपूर मेडल्स जिंकायची आहेत" असं म्हटलं. हिमांशीचे प्रशिक्षक यशपाल सोलंकी यांनी सांगितलं की, "हिमांशीचे वडील रवी टोकस यांनी २०२० मध्ये हिमांशीला द्वारका येथील सोलंकी एकॅडमी ऑफ फिटनेस अँड कॉम्बॅट स्पोर्ट्स (AFACS) मध्ये पाठवलं."
हिमांशी टोकसपासून अनेकांना प्रेरणा
"हिमांशीचे वडील आणि मी चांगले मित्र आहोत. ते ज्युडो खेळाडू होते आणि त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. हिमांशी मुनिरका येथील स्थानिक क्लबमध्ये सराव करत असे, परंतु हवा तसा रिझल्ट मिळत नव्हता. म्हणून तिचे वडील तिला माझ्या एकॅडमीत घेऊन आले. तेव्हापासून, हिमांशी माझ्याकडून ट्रेनिंग घेत आहे." हिमांशी टोकसपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.