Join us  

फुलपाखरांवर संशोधन करणारी संशोधक गायत्री पवार, वडिलांचा अपघात-अफाट कष्ट पण तिने जिद्द सोडली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 4:34 PM

Navratri Special नवरात्र विशेष: फुलपाखरं, सपूष्ट वनस्पती आणि खेकड्यांचा अभ्यास करणारी आरफळच्या गायत्री पवारचे खास संशोधन

प्रगती जाधव- पाटील

करिअरसाठी असलेल्या वेगवेगळ्या वाटा सोडून आडवाटेने जात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे कमीच असतात. सातारा तालुक्यातील आरफळ येथील गायत्री पवार यांनीही अशाच पद्धतीने स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी मार्गक्रमण करीत असताना त्या जीवसृष्टीच्या अभ्यासात रमल्या. फुलपाखरू, किटक, खेकड्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींचा अभ्यास करीत त्यांनी संशोधन केले. तसेच रेशीम आणि पक्षी समुह प्रकल्पातही त्यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे.

आरफळ येथील गायत्री पवार यांना कृतिशील शिक्षणाचा वारसा कुटूंबातूनच मिळाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण साताऱ्यात पूर्ण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी राज्यसेवा स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्या माध्यमातून करिअरची वाट चोखाळण्याचा त्यांचा मानस होता. त्यातच व्हॉलीबॉलसारख्या खेळाचा करिअर म्हणूनही त्यांनी विचार केला होता. मात्र, आगामी आयुष्यात हे सर्व पर्याय मागे पडले. गायत्री या पहिल्यापासूनच निग्रही. एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय त्या स्वस्थ बसत नाहीत. त्यामुळेच प्रत्येक संकटावर त्यांनी जिद्दीने आणि हिंमतीने मात केली. त्या शाळेत होत्या त्याचकाळात

एका अपघातात वडिलांना अपंगत्व आले. पवार कुटूंबासह गायत्री यांच्यासाठी हा मोठा आघात होता. मात्र, तरीही खचून न जाता गायत्री व त्यांच्या आईने सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. याच कालावधीत वेगळ्या क्षेत्रात काहीतरी करुन दाखविण्याची आणि स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जिद्द गायत्री यांनी ठेवली. त्यातूनच संशोधन क्षेत्रात त्यांचे पदार्पण झाले. महादरे इकॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (मेरी) मुक्त संशोधक घडविण्याच्या उपक्रमात त्या सहभागी झाल्या. प्रत्यक्ष जंगल कार्यक्षेत्रावर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली.

खेकड्यांवर संशोधन करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र, संशोधन करत असताना त्यांनी पतंगांवर जास्त भर दिला. पतंग परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, शेतकऱ्यांकडून कीटकनाशक फवारणी केली जात असल्यामुळे अनेक कीटक तसेच पतंग मरतात, ही गोष्ट गायत्री यांना खटकते. गत चार ते पाच वर्षांपासून त्यासाठीचा त्यांचा अभ्यास सुरू आहे.

दरम्यानच्या काळात त्यांनी राज्य, राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे शोधनिबंध सादर केले आहेत. महादरेला पहिल्या फुलपाखरू संवर्धन राखीवचा प्रस्ताव ते दर्जा मिळण्यामध्येही गायत्री यांचा मोलाचा वाटा आहे. मेरी संस्थेसह त्या सध्या कीटकशास्त्राच्या अमेरिका, कॅनडा, सॅन फ्रान्सिस्को, कोलोर आदी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सदस्या आहेत.

रेशीम उद्योगावर केला शोधप्रकल्प

पतंगांवरील अभ्यासादरम्यान गायत्री यांच्या लक्षात आले की, रेशीम उद्योग करणाºया शेतकºयांकरवी रेशीम अळ्यांनी टाकलेली संपूर्ण विष्ठा कोणत्याही उपयोगाशिवाय वाया जाते. त्यामुळे त्यांनी संशोधन करून विष्ठेवर सहज सुलभ व शेतकºयांना जमतील अशा प्रक्रिया करून ती विष्ठा खत म्हणून वापरण्यासाठीचा प्रकल्प पूर्ण केला. हा शोधप्रकल्प रेड डॉट फाउंडेशन, बजाज, युनिसेफ आणि सेफ सिटी युथस्् इनोवेशन चॅलेंजच्या व्यासपीठावर सादर केला.

गायत्री यांनी भारतीय प्राणी सर्वेक्षण विभाग पुणे येथे कीटशास्त्राची प्रशिक्षणे पूर्ण केली आहेत. त्याबरोबरच गोवा राज्याच्या पक्षी समूहाच्या प्रकल्पासाठी सहाय्यकाची भूमिका बजावली आहे. वेगळ्या आणि अनोख्या क्षेत्रात कार्यरत असणाºया गायत्री यांना आजपर्यंत वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पीएचडीसाठी निवडला ‘हा’ आव्हानात्मक विषय

साताऱ्याजवळचे कास पठार पुष्प सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील सपुष्प वनस्पतींना परागीभवनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कीटकांबद्दल फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे गायत्री यांनी त्यांच्या पीएचडीसाठी हाच आव्हानात्मक विषय निवडला आहे. त्यावर त्यांचे सध्या जोमाने काम सुरू आहे.

खेकड्यांच्या प्रजातींचे संशोधन सुरूच

मेरी संस्थेत सहभागी होताना गायत्री यांना ज्या खेकड्यांवर संशोधन करायचे होते, तो प्रकल्प सध्या सुरूच आहे. जिल्ह्याच्या पश्चिम घाट क्षेत्रात आढळणाºया काही वैशिष्ट्यपूर्ण खेकड्यांच्या प्रजातींच्या स्थलांतर व वर्तनाचा अभ्यास त्यांच्याकडून सुरू आहे. ‘वर्ल्ड वाईड फंड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने त्यांचे हे संशोधन सुरू आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीनवरात्रीशारदीय नवरात्रोत्सव 2023