कल्याणच्या मराठमोठ्या वैष्णवी पाटीलने दमदार कामगिरी केली आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचण्यांमध्ये वैष्णवीने तिचा जबरदस्त वेग आणि मॅटवरील वर्चस्वाने आपली वेगळी छाप पाडली आहे. महिलांच्या ६५ किलो वजनी गटात राष्ट्रीय संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे. फक्त चार वर्षांच्या मॅट कुस्तीचा अनुभव असताना वैष्णवीने उल्लेखनीय कामगिरी करत प्रतिस्पर्धकांना चितपट केलं.
२२ वर्षीय वैष्णवीच्या वडिलांचा कल्याणमध्ये ढाबा आहे. "मी २०२० च्या अखेरीस मॅट कुस्ती खेळायला सुरुवात केली. त्याआधी मी फक्त मातीत कुस्ती खेळत होते. २०१६ च्या रिओमध्ये साक्षी मलिकला पदक जिंकताना पाहिलं तेव्हा मी मला नेमकं काय करायचं आहे ते ठरवलं, मला फक्त या खेळात पुढे यायचं होतं" फायनलमध्ये मुस्कानला ७-२ असं हरवल्यानंतर वैष्णवीने पीटीआयला ही माहिती दिली होती.
"माझे वडील ढाबा चालवतात आणि आई गृहिणी"
"माझे वडील ढाबा चालवतात आणि माझी आई गृहिणी आहे. माझे आईवडील माझ्यासाठी सर्व काही करत आहेत. महाराष्ट्रात फारशा चांगल्या अकादमी नव्हत्या, म्हणून मी हिसारला स्थलांतरित झाले" असंही तिने म्हटलं. वैष्णवी अमेरिकन कुस्ती आयकॉन हेलेन मारौलिसला तिचा आदर्श मानते. जिच्या नावावर ऑलिम्पिक सुवर्ण, टोकियो आणि पॅरिसमधून कांस्यपदक आणि सात जागतिक चँपियनशिप आहेत.
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
"मला देशासाठी चांगलं खेळायचंय"
"हेलेन एक अद्भुत कुस्तीपटू आहे. मी YouTube वर तिचे सामने पाहते. मला स्वतःसाठी आणि देशासाठी चांगलं खेळायचं आहे. मला जागतिक स्पर्धेत पदक जिंकण्याचा विश्वास आहे आणि शेवटी मला ऑलिंपिक पदक जिंकायचं आहे. मी हिसारमध्ये दोन-तीन महिने राहायची आणि दोन महिने मूळ गावी परत जायची. मी माझ्या पालकांना सांगितलं की मला एक वर्ष प्रशिक्षण केंद्रात राहण्याची आवश्यकता आहे आणि त्याचा परिणाम दिसून आला आहे."
वैष्णवी आधी होती स्विमर
"मी खूप शिस्तप्रिय आहे, मी खूप मेहनत करते. आमच्या केंद्रात चांगले कुस्तीपटू आहेत आणि त्यांच्यासोबत सराव केल्याने मला मदत झाली आहे" असंही वैष्णवीने सांगितलं. विशेष म्हणजे वैष्णवी एक स्विमर होती, तिने स्टेट लेव्हलवर दोन पदकं जिंकली होती. कुस्तीपटूच्या सत्कार कार्यक्रमात सहभागी झाल्यावर आणि त्यांचं झालेलं कौतुक पाहून तिला कुस्तीची आवड निर्माण झाली. इकोनॉमिक टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
"माझा बँक बॅलन्स शून्य”
वैष्णवीच्या वडिलांनी लेकीच्या यशावर प्रतिक्रिया दिली आहे. "मी आमच्या गावातील बस स्टॉपजवळ एक ढाबा चालवतो आणि आमची सर्व कमाई तिच्या ट्रेनिंगसाठी जाते. माझा बँक बॅलन्स शून्य आहे. मी शेतीतून मिळणाऱ्या काही उत्पन्नातून माझं घर सांभाळतो पण ढाब्यातून मिळणारं सर्व उत्पन्न वैष्णवीला ट्रान्सफर केलं जातं. पहिल्याच स्पर्धेत जास्त प्रशिक्षण न घेता वैष्णवीने ज्युनियर राज्य स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं आणि नंतर सलग दोन सुवर्णपदके जिंकली" असं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलं आहे.