श्रीनिवास विद्यापीठातील भौतिक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख संशोधन शास्त्रज्ञ डॉ. संध्या शेणॉय यांनी पुन्हा एकदा देशाचं नाव उंचावलं आहे. जगभरातील अव्वल दोन टक्के शास्त्रज्ञांच्या प्रतिष्ठित यादीत संध्या यांनी सलग तिसऱ्या वर्षी आपलं स्थान निश्चित केलं आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या 'अपडेटेड सायन्स-वाईड ऑथर डेटाबेसेस ऑफ स्टँडर्डाईज्ड सायटेशन इंडिकेटर्स' या क्रमवारीतून डॉ. शेणॉय यांच्या संशोधनाच्या जागतिक प्रभावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
डॉ. संध्या शेणॉय यांचे मुख्य संशोधन क्षेत्र थर्मोइलेक्ट्रिक मटेरियल्सवर आधारित आहे. त्यांच्या या अत्याधुनिक कार्यामुळे टाकाऊ उष्णतेचे विजेमध्ये रूपांतर करणं शक्य होतं, ज्यामुळे उद्योगांमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा होऊन शाश्वत ऊर्जा उपायांना मोठी चालना मिळेल.
संशोधन क्षेत्रात मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल श्रीनिवास विद्यापीठाने डॉ. संध्या शेणॉय यांचं अभिनंदन केलं आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सी.ए.ए. राघवेंद्र राव आणि डॉ. ए. श्रीनिवास राव यांनी त्यांचं आंतरराष्ट्रीय यश व साहित्य विज्ञानातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कौतुक केलं. या आंतरराष्ट्रीय मान्यतेमुळे विद्यापीठालाही मोठा लौकिक प्राप्त झाला आहे.