कधीकधी आयुष्याची दिशा एका छोट्याशा निर्णयाने बदलून जाते. ओडिशाच्या १५ वर्षीय अंजली मुंडा हिची गोष्ट याचंच एक उत्तम उदाहरण आहे. २०२२ मध्ये शाळेत असताना खेळांच्या निवडीवेळी तिने 'पोहण्याची' (Swimming) निवड केली. त्यावेळी तिच्यासाठी हा खेळ फक्त मनोरंजनाचं साधन होतं, मात्र आज याच निर्णयाने तिला राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश मिळवून दिलं आहे. अंजली मुंडा 'खेलो इंडिया ट्रायबल गेम्स २०२६' ची पहिली महिला सुवर्णपदक विजेती ठरली आहे.
ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील गहिरागडिया गावची रहिवासी असलेल्या अंजलीने रायपूर येथे आयोजित पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्समध्ये २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात २:३९.०२ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलं. यासह या स्पर्धेच्या इतिहासात पहिली महिला सुवर्णपदक विजेती म्हणून तिने आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे.
चार भावंडांमध्ये सर्वात लहान असलेली अंजली एका अत्यंत सामान्य कुटुंबातून येते. तिचे वडील स्थानिक कारखान्यात व्हॅन चालक म्हणून काम करतात. वयाच्या १० व्या वर्षी अंजली 'कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' (KISS) मध्ये दाखल झाली, जिथे तिला मोफत शिक्षणासोबतच क्रीडा प्रशिक्षणाची संधी मिळाली. येथूनच तिच्या क्रीडा कारकिर्दीचा भक्कम पाया रचला गेला.
कठोर सराव आणि सातत्यपूर्ण मेहनतीचा परिणाम असा झाला की, पोहायला सुरुवात केल्याच्या अवघ्या एका वर्षातच तिने स्थानिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली. अंजली आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक आणि क्रीडा मंत्रालयाच्या 'अस्मिता लीग' या उपक्रमाला देते. २०२४ मध्ये संबलपूर येथे झालेल्या अस्मिता लीगमध्ये तिने दोन रौप्य पदकं जिंकली, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास उंचावला. त्यानंतर गुवाहाटी येथील अस्मिता स्विमिंग लीगमध्येही (ईस्ट झोन) तिने दोन रौप्य पदकं आपल्या नावावर केली.
सुवर्णपदक जिंकूनही अंजली समाधानी नाही. तिचे वैयक्तिक सर्वोत्तम टायमिंग २:२५ मिनिटं असून त्यात अधिक सुधारणा करण्याचं तिचं ध्येय आहे. प्रवासाचा थकवा आणि आव्हानात्मक परिस्थिती असूनही तिने आपल्या कामगिरीने सर्वांना थक्क केले. अंजली आता आगामी ५० मीटर बॅकस्ट्रोक, १०० मीटर बॅकस्ट्रोक आणि २०० मीटर इंडिव्हिज्युअल मेडले या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या तयारीत आहे.
स्वतःला सातत्याने सिद्ध करणे हेच अंजलीचं उद्दिष्ट आहे. अंजली मुंडाचं हे यश केवळ एका पदकापुरतं मर्यादित नाही, तर योग्य संधी, मार्गदर्शन आणि मेहनत मिळाल्यास कोणतीही प्रतिभा शिखरावर पोहोचू शकते, हे तिने दाखवून दिलं आहे. तिची ही गोष्ट देशातील हजारो तरुण खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
Web Summary : Anjali Munda, daughter of a van driver, won gold at the Khelo India Tribal Games in swimming. Representing Odisha, she overcame challenges to achieve this historic feat, inspiring many. She aims to improve her timing in future events.
Web Summary : वैन ड्राइवर की बेटी अंजलि मुंडा ने खेलो इंडिया ट्राइबल गेम्स में तैराकी में स्वर्ण पदक जीता। ओडिशा का प्रतिनिधित्व करते हुए, उन्होंने इस ऐतिहासिक उपलब्धि को प्राप्त करने के लिए चुनौतियों का सामना किया, जो कई लोगों के लिए प्रेरणादायक है। वह भविष्य के आयोजनों में अपने समय को बेहतर बनाने का लक्ष्य रखती है।