लोकप्रिय भारतीय शेफ विकास खन्ना यांनी त्यांच्या न्यूयॉर्क रेस्टॉरंटच्या यशाबद्दल सांगितलं आहे. विकास यांची बहीण राधिका खन्ना यांनी हे रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी खूप मदत केली. रेस्टॉरंट सुरू करणं हे त्यांच्या दिवंगत बहिणीचं स्वप्न होतं. 'बंगला' असं त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव असून त्याला मिशेलिन २०२४ बिब गौरमांड पुरस्कार मिळाला आहे.
CNN ला दिलेल्या मुलाखतीत, विकास खन्ना यांनी आपल्या बहिणीने आपल्या स्वप्नांना कशा प्रकारे प्रेरित केलं याबद्दल सांगितलं. रेस्टॉरंटचं बहुतेक इंटेरियर हे बहिणीने दिलेल्या सल्ल्यानुसार करण्यात आलं होतं. फॅशन डिझायनर, लेखिका आणि उद्योजिका, राधिका यांचं अनेक वर्षे ल्युपसशी लढा दिल्यानंतर २०२२ मध्ये निधन झालं.
"मला खात्री नव्हती की, बंगला एक यशस्वी रेस्टॉरंट किंवा एखादं मोठं रेस्टॉरंट असेल. पण तिला ते रेस्टॉरंट सुरू करायचं होतं" असं खन्ना यांनी म्हटलं आहे. बहिणीच्या रेस्टॉरंटबद्दलचं स्वप्न सांगताना विकास यांना २००३ मधला वाढदिवसाचा एक किस्सा आठवला. त्यांची बहीण त्यांना एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली होती, तिथला शेफ भेटेल अशी त्यांना आशा वाटत होती. पण शेफ फक्त टेस्टींग मेनू ऑर्डर करणाऱ्यांनाच भेटतो असं सांगण्यात आलं.
राधिका जेव्हा मृत्यूशी झुंज देत होत्या. तेव्हा त्यांना तो किस्सा आठवला आणि त्यांनी विकास यांच्याकडून या शेफसारखं न वागण्याचं वचन घेतलं. त्या रेस्टॉरंटमध्ये छान जेवण होतं, पण तरीही आम्हाला काहीतरी कमतरता भासली. जर एखाद्या व्यक्तीने स्वयंपाकाबद्दल काही सांगितलं तर त्या व्यक्तीचं स्वागत करावं. शेफने कधीही गर्विष्ठ होऊ देऊ नये अशी बहिणीची इच्छा असल्याचं विकास यांनी म्हटलं आहे.
"तिने मला शिकवलं... माझी डिग्री आणि मिशेलिन स्टार्सने नाही किंवा मी माझ्या डोक्यावर काय परिधान केलं आहे याने नाही... तिने मला रेस्टॉरंटबद्दल संपूर्ण नवीन दृष्टीकोन शिकवला. तिने मला शिकवलं की, खाद्यपदार्थ हा व्यवसाय नाही. तुम्ही लोकांच्या वेदना आणि एकटेपणा दूर करू शकता. अन्नाला हेच करायचं असतं. अशा क्षणांच्या वेळी बहिणीची सर्वात जास्त आठवण येते" असं विकास खन्ना यांनी म्हटलं आहे.