Join us  

#Breakthebias : 'तुमची मुलगी एवढा वेळ बाहेर काय करते?' चाळीतल्या बायका वनिता खरातला टोमणे मारत..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 7:26 PM

#Breakthebias : कुठलीही गोष्ट करण्यासाठी वेळ निघून गेली, आता नकोच करायला, असा विचार करू नये. आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही वयात करू शकतो आणि स्वत:ला सशक्त बनवू शकतो.

मनाली बागुल

कबिर सिंग या हिंदी चित्रपटानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात घराघरात पोहोचलेली वनिता खरात. निखळ विनोदाचं जबरदस्त टायमिंग, कमालीचा उत्तम अभिनय ही तिची ताकद. 2021 च्या सुरुवातीलाच न्यूड फोटोशूटमूळे चर्चेत आलेल्या तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांची तोंड बंद केली आहे. यामागची भूमिका मांडतांना तिनं लिहिलं होतं, की मला माझ्या प्रतिभेचा आणि कौशल्याचा अभिमान आहे. माझं शरीर जसं आहे तसा मला त्याचा अभिमान आहे. लोकमत सखीनं या लाडक्या अभिनेत्रीशी गप्पा मारल्या.

अभिनयाची सुरूवात....

वनिताचं बालपण वरळीत गेलं. महाविद्यालयात असताना एकांकीका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली आणि ॲक्टिंगची गोडी निर्माण झाली. वनिता सांगते की, ''मला लहानपणापासूनच टीव्ही पाहण्याची खूप आवड होती. कुठेही, कोणाच्याही घरी बसून मी टीव्ही बघत बसायचे. सिनेमा पाहायला मला खूप आवडायचं. लहानपणापासूनच मी खूप बिंधास्त होते. स्वत:च्या दिसण्यावरून कधीच कॉप्लेक्स जाणवलाच नाही. कॉलेजमध्ये आल्यानंतर थोडी फार याची जाणीव झाली की समाजाच्या दृष्टीकोनातील सौंदर्यात आपण बसत नाही. पण तेव्हाही मी बिंधास्तपणे वागायचे. 

मला एखादी गोष्ट जमणार नाही, असं कधीच घरच्यांनी ट्रिट केलं नाही. मी ज्या गोष्टी करते त्या मला जमतात म्हणूनच करायचे. आमच्या घरात या क्षेत्रातलं कोणी नाहीये त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया अशी होती,की हे जरा वेगळं क्षेत्र आहे. सुरूवातीला पचायला जड झालं. नंतर माझी काम दिसायला लागली. त्यावेळी कळलं की आपली मुलगी काहीतरी चांगलं करतेय.

मी चाळीत राहते त्यामुळे लहानपणापासूनच मुलींनी सातच्या आत घरी यायला हवं, मुलींनी असंच राहायला हवं. असं वातावरण होतं. पण तालमीच्यावेळी मला घरी यायला फार उशीर व्हायचा. त्यावेळी, चाळीतल्या बायकांकडून तुमची मुलगी एव्हढा वेळ काय करते? अशा प्रकारचे प्रश्न विचारले जायचे. त्यानंतर जेव्हा मी टीव्हीवर दिसायला लागले त्यावेळी तो विषयच क्लिअर झाला.''

करिअरची सुरूवात

कॉलेजमध्ये एकांकीका करत असताना अनेक दीर्घांकही केले. नंतर कॉमेडीच्या बुलेट ट्रेनंच ऑडीशन दिलं आणि मी सिलेक्ट झाले. टिव्ही दिसणारं ते माझं पहिलं काम होतं. त्यानंतर काही सिरियल्समध्ये लहान लहान मॉबमधील एट्रीज केल्या होत्या. कॉमेडीची बुलेट ट्रेनचे १०० एपिसोड केल्यानंतर मी ब्रेक घेतला आणि नाटकाकडे वळाले.

त्यावेळी मी श्री बाई समर्थ या नाटकाचे अडीचशे प्रयोग केले.  यादरम्यान बरीच बक्षिसं मिळाली. मग महाराष्ट्राची हास्यजत्रासाठी कॉल आला आणि आतापर्यंत ते काम सुरू आहे. कबिर सिंग करताना मला बरेच अनुभव आले. कबिर सिंग केला आणि तो खूप हीट झाला. हे इतकं व्हायरल होईल असा कधी विचारच केला नव्हता. त्यातून इतकी प्रसिद्धी मिळेल याची कल्पना नव्हती. हा अविस्मरणीय अनुभव होता.''

ट्रोलिंगकडे कसं पाहते

''ट्रोलर्सना ट्रोलिंग करणं एव्हढंच काम असतं. त्यांना वेगळं काही चांगलं दिसतच नाही त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करत राहावं. मी त्यांना रोखू शकत नाही पण नेहमीच माझ्या कामातून ट्रोलर्सना उत्तर देत राहीन. कुठलीही गोष्ट करण्यासाठी वेळ निघून गेली, आता नकोच करायला, असा विचार करू नये. आपण कुठलीही गोष्ट कुठल्याही वयात करू शकतो आणि स्वत:ला सशक्त बनवू शकतो. कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. कुठलीही चांगली गोष्ट करायला बंधनं आड येता कामा नयेत. आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारतो त्यावेळी जगात कोणीच आपल्याला बोलू शकत नाही, की ही कशी दिसते. आपण आधी स्वत:ला स्वीकारायला हवं आणि छान जगायला हवं.'' वनिता तिच्या छान सुंदर स्माईलसह सांगते.

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रिटी