Join us

वय हरलं अन् स्वप्नं जिंकली! ३ गिर्यारोहकांचा अनोखा आदर्श, एव्हरेस्टवर फडकावला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 11:52 IST

भगवान सिंह, ज्योती रात्रे आणि सुनीता सिंह यांनी अशा वेळी गिर्यारोहणाचा एक असाधारण प्रवास सुरू केला आहे जेव्हा बहुतेक लोक निवृत्तीचा विचार करत असतात.

वय हा फक्त एक आकडा आहे हे भोपाळच्या तीन जणांनी सिद्ध केलं आहे. आपल्या आवडीला, जिद्दीला आणि कठोर परिश्रमाला वय नसतं हे त्यांनी दाखवून दिलं. भगवान सिंह, ज्योती रात्रे आणि सुनीता सिंह यांनी अशा वेळी गिर्यारोहणाचा एक असाधारण प्रवास सुरू केला आहे जेव्हा बहुतेक लोक निवृत्तीचा विचार करत असतात. इच्छा तिथे मार्ग हेच या तिघांमुळे समोर आलं आहे. 

ज्योती रात्रे यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावला. त्यांनी ४९ व्या वर्षी गिर्यारोहणाला सुरुवात केली आणि २०२४ मध्ये एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचल्या. ज्योती यांची गोष्ट हिंमत आणि आवडीचं उत्तम उदाहरण आहे. मी एव्हरेस्टवर उचललेलं प्रत्येक पाऊल वयाशी संबंधित पूर्वग्रह तोडण्याच्या दिशेने होतं असं त्यांनी म्हटलं आहे. ज्योती यांचा भोपाळमध्ये बिझनेस आहे.

काही दिवसांपूर्वी सुनीता सिंह यांनी युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस यशस्वीरित्या चढाई केली. ज्या वयात बहुतेक लोक आरामशीर जीवन जगणं पसंत करतात, त्या वयात सुनीता यांनी हे आव्हान स्वीकारलं. ५६ वर्षीय सुनीता म्हणतात की, गिर्यारोहणाने मला शिकवलं की खऱ्या सीमा त्या आहेत ज्या आपण स्वतःसाठी ठरवतो. सुनीता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भोपाळ मुख्य कार्यालयात असिस्टंट जनरल मॅनेजर आहेत. त्या २०२७ मध्ये माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करत आहेत.

भगवान सिंह यांनी २०१६ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करून इतिहास रचला. एव्हरेस्ट चढणं हे जगासाठी एक स्वप्न आहे, परंतु भगवान सिंह यांनी ते प्रत्यक्षात आणलं. आपल्या आवडीसमोर वय अडथळा निर्माण करू शकत नाही. भगवान सिंह म्हणतात की, एव्हरेस्ट सर करणं ही साधी गोष्ट नव्हती. तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधीही उशीर होत नाही हे सिद्ध केलं आहे. भगवान यांनी आतापर्यंत १२० हून अधिक फुल आणि हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत.

या तिन्ही गिर्यारोहकांचा विजय केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा आहे. वाढतं वय अनेकदा अडथळा मानलं जातं पण अशा समाजात भगवान, ज्योती आणि सुनीता हे ही विचारसरणी पूर्णपणे बदलत आहेत. ते हे सिद्ध करत आहेत की, जीवन आपण जितकं रोमांचक आणि आनंदी बनवू इच्छितो तितकंच ते रोमांचक आणि आनंदी असू शकतं. फिटनेस आणि दृढनिश्चय अत्यंत महत्त्वाचा आहे. एव्हरेस्ट सर करणं ही केवळ शारीरिक ताकदीची परीक्षा नाही तर मानसिक ताकदीची देखील परीक्षा आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी