राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील जालीपा गावच्या रहिवासी दीपू कंवर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं यश संपादन केलं आहे. त्यांनी गुजरात स्टेट ज्युडिशियल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण करून 'सिव्हिल जज' (दिवाणी न्यायाधीश) बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या परीक्षेत त्यांनी ७९ वा रँक मिळवला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सुनेने मोठी झेप घेतली आहे.
दीपू कंवर सांगतात की, त्यांच्या लग्नाला आता सात वर्षे झाली आहेत. या काळात त्यांच्या सासरच्या मंडळींनी कधीही त्यांच्यावर शिक्षण सोडण्यासाठी दबाव टाकला नाही. उलट "आधी तुझं ध्येय गाठ" असं सांगून त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं. जेव्हा कधी दीपू घरच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करायच्या, तेव्हा त्यांचे सासरे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगायचे.
दीपू यांनी सासरीच एका खोलीत राहून आपला अभ्यास पूर्ण केला. ती खोली त्यांच्यासाठी एखाद्या हॉस्टेलसारखीच होती. तिथेच बसून त्यांनी कायद्याच्या पुस्तकांचा सखोल अभ्यास केला. अभ्यासासोबतच त्या घरकामातही थोडीफार मदत करत असत.
दीपू यांच्या यशाचा मार्ग सोपा नव्हता. त्यांनी २०२२ मध्ये पहिल्यांदा 'ज्युडिशियल सर्व्हिस' परीक्षा दिली होती. त्यावेळी त्यांनी प्रीलियम्स आणि मेन्स या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या, पण मुलाखतीत त्यांना यश मिळालं नाही.
२०२३ मध्ये दीपू यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण यावेळी त्या मुख्य परीक्षेतच अपयशी ठरल्या. सलग दोनदा अपयश येऊनही त्यांनी हार मानली नाही आणि आपली तयारी सुरूच ठेवली. अखेर यावेळी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि त्यांनी गुजरात स्टेट ज्युडिशियल सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत त्यांनी संपूर्ण राज्यात ७९ वा रँक पटकावला आहे
