मणिपूर राज्यातील दुर्गम तामेंगलाँग जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी एका आशा वर्करने केलेली प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. आपल्या जीवाची अजिबात पर्वा न करता त्यांनी चिमुकल्यांसाठी धडपड केली. गावातील लहान मुलांना पोलिओची लस मिळावी यासाठी आशा वर्कर असलेल्या मीदीनलिऊ न्यूमाई (Meidinliu Newmai) यांनी तब्बल २८ किलोमीटर पायी प्रवास केला.
मीदीनलिऊ न्यूमाई गेली अनेक वर्षे निरपेक्ष वृत्तीने आरोग्य सेवा करत आहेत. नुकत्याच राज्यव्यापी 'पल्स पोलिओ लसीकरण मोहिम' अंतर्गत त्यांनी हे अत्यंत महत्त्वाचं काम केलं. तामेंगलाँग जिल्ह्यातील नेंलाँग अटंगखुल्लेन या गावातील १७ लहान मुलांना लस देण्यासाठी त्या स्वतः पोलिओ लस घेऊन चालत गेल्या. ५० वर्षीय मीदीनलिऊ यांच्या कर्तव्यनिष्ठेला खरोखरच सलाम आहे.
घनदाट जंगलातून प्रवास
मीदीनलिऊ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या गावामध्ये सोयी-सुविधा नाहीत. योग्य रस्ते आणि वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे प्रत्येकाचं जीवन खडतर झालं आहे. सरकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला पाच नद्या पार कराव्या लागतात आणि घनदाट जंगलातून प्रवास करावा लागतो. रस्ता नसल्याने अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं, विविध समस्यांचा सामना करावा लागतो."
कर्तव्यनिष्ठा पाहून राज्यपालांनी केलं विशेष कौतुक
२००७ पासून तामेई प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या मीदीनलिऊ यांनी या सर्व अडथळ्यांवर मात करत, १० लहान मुलांना (०-३ वर्ष) आणि सात मुलांना (३-५ वर्ष) अशा १७ मुलांना पोलिओचा डोस दिला. त्यांचे हे समर्पण आणि कर्तव्यनिष्ठा पाहून मणिपूरच्या राज्यपालांनीही त्यांचं विशेष कौतुक केलं आहे. आरोग्य आणि सार्वजनिक सेवांच्या क्षेत्रात अत्यंत मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या प्रदेशातील 'आशा वर्कर' ची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
