Join us

Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:04 IST

Aastha Poonia : सब लेफ्टनंट आस्था पूनिया यांना नौदलात फायटर पायलट करण्यात आलं आहे आणि यासोबतच त्या नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या सहज शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. सैन्यामध्ये महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. सब लेफ्टनंट आस्था पूनिया यांना नौदलात फायटर पायलट करण्यात आलं आहे आणि यासोबतच त्या नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत. विशाखापट्टणममध्ये त्यांना 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मानित करण्यात आलं. पूनिया देशातील सर्व मुली आणि महिलांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

आस्था या मूळच्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील हिसावदा गावच्या आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब मेरठमध्ये राहतं. आस्था यांचे वडील जवाहर नवोदय विद्यालयात गणिताचे शिक्षक आहेत आणि आई प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत. आस्था बाघरा आणि मुझफ्फरनगरच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकल्या. सुरुवातीचं शिक्षण गिरधारी लाल पब्लिक स्कूलमधून झाले आणि आस्था बारावीपर्यंत एसडी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षणासाठी गेल्या. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची नौदलात निवड झाली.

देशाची सेवा करण्याचा निश्चय

राजस्थानच्या जयपूर येथील वनस्थली विद्यापीठातून कॉम्पूटर सायन्समध्ये बीटेकचं शिक्षण घेतलं. बीटेकच्या अभ्यासादरम्यान त्यांनी खासगी कंपनीत काम करण्याऐवजी देशाची सेवा करण्याचे ठरवलं होतं. या उद्देशाने आस्था पुनिया यांनी संरक्षण क्षेत्र निवडलं. बीटेक केल्यानंतर एसएसबी (सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आणि इंटरव्ह्यू क्रॅक केला. त्यानंतर सर्व मेडिकल आणि ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्या नौदलात अधिकारी झाल्या.

लहानपणापासूनच पायलट होण्याचं स्वप्न 

आस्था यांना विंग्स ऑफ गोल्ड सन्मान देण्यात आला. असं म्हटलं जातं की, या सन्मानाने सन्मानित होणं हे नौदलातील फायटर पायलट होण्याच्या पात्रतेचं प्रतीक आहे. आस्था यांचे पालक या कामगिरीवर खूप आनंदी आहेत. वडिलांनी एका मुलाखतीत माध्यमांना सांगितलं की, "आस्था लहानपणापासूनच पायलट होण्याचं स्वप्न पाहत होती. घराच्या छतावरून जेव्हा जेव्हा विमान उडताना दिसायचं तेव्हा ती मोठ्या उत्सुकतेने त्याकडे पाहायची. अखेर आस्थाने तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे." संपूर्ण पुनिया कुटुंब आणि देशाला आस्था यांच्या यशाचा अभिमान आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीभारतीय नौदलभारतीय हवाई दल