Lokmat Sakhi >Inspirational > वयाच्या ७५व्या वर्षी सायकलवर भारतभर फिरणाऱ्या निरुपमा भावे, पुण्याच्या आजींची सायकल आता नर्मदा परिक्रमेच्या तयारीत!

वयाच्या ७५व्या वर्षी सायकलवर भारतभर फिरणाऱ्या निरुपमा भावे, पुण्याच्या आजींची सायकल आता नर्मदा परिक्रमेच्या तयारीत!

women's day 2025 : ७० व्या वाढदिवसाला सायकलने पुणे ते कन्याकुमारी, वय ७३ आणि प्रवास पुणे ते जम्मू, वय ७५ प्रवास पुणे ते कलकत्ता आणि आता ७७ व्या वाढदिवशी सायकलने नर्मदा परिक्रमा करण्याचा बेत आखणाऱ्या पुण्याच्या निरुपमा भावेंची कमाल. 

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: March 7, 2025 19:12 IST2025-03-07T19:05:21+5:302025-03-07T19:12:32+5:30

women's day 2025 : ७० व्या वाढदिवसाला सायकलने पुणे ते कन्याकुमारी, वय ७३ आणि प्रवास पुणे ते जम्मू, वय ७५ प्रवास पुणे ते कलकत्ता आणि आता ७७ व्या वाढदिवशी सायकलने नर्मदा परिक्रमा करण्याचा बेत आखणाऱ्या पुण्याच्या निरुपमा भावेंची कमाल. 

75 year old cyclist nirupama bhave from pune, story of her nationwide cycling, inspirational story | वयाच्या ७५व्या वर्षी सायकलवर भारतभर फिरणाऱ्या निरुपमा भावे, पुण्याच्या आजींची सायकल आता नर्मदा परिक्रमेच्या तयारीत!

वयाच्या ७५व्या वर्षी सायकलवर भारतभर फिरणाऱ्या निरुपमा भावे, पुण्याच्या आजींची सायकल आता नर्मदा परिक्रमेच्या तयारीत!

Highlightsनिरुपमा भावेंची गोष्ट ऐकून आपलं मन आनंदाच्या सायकलवर बसलेलं असतं..पुढच्या आनंदाचा गिअर दिसू लागतो..

-ज्योत्स्ना गाडगीळ पंचमुखी

‘सायकल आणि माझा दूरवर संबंध नव्हता. घरात कोणी खेळाडू नव्हतं, की बालपणी कधी क्रीडास्पर्धेत भागही घेतला नव्हता. व्यायामाचीही विशेष गोडी नव्हती, फक्त अभ्यास एके अभ्यास करत, गणितात एम.एस.सी, पीएच.डी केलं. चाळीस वर्षं पुणे विद्यापीठात गणिताची प्रोफेसर म्हणून नोकरी केली. संसार केला आणि निवृत्तीच्या वाटेवर असताना वयाच्या ५४ व्या वर्षी हिची माझी गाठ पडली. आता आमची मैत्री २३ वर्षांची झाली आहे. अजून ना मी थकले, ना ती!’

निरुपमा भावे सांगत असतात. त्यांना भावे आजी म्हणावं का असा प्रश्न पडतो असा त्यांचा उत्साही झपाटा. काटक बांधा, सडेतोड बोलणं, कुणाची भीडभाड न बाळगता आयुष्याला सकारात्मकतेने सामोरं जाणं! पुण्याच्या ७७ वर्षांच्या सायकलस्वार निरुपमा भावे यांची ही गोष्ट. सात-आठ वर्षांपूर्वी त्यांचा सिंहगडावर सायकल चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तेव्हापासून मुलाखती देण्याचं सत्रच सुरु झालं. आता तर त्या अतिशय प्रेमानं आपला सायकल प्रवास सांगतात.  त्यांचा उत्साह, फिटनेस, अनुभव पाहता अनेक प्रश्नांची ट्रिंग ट्रिंग डोक्यात वाजते, त्यावर त्या गिअर मागे पुढे करत आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं त्या आनंदानं मनापासून उत्तर देतात.

भावे आजी सांगतात, 'मी ५४ वर्षांची होते तेव्हा माझ्या यजमानांचे मित्र एस.बी. जोशी सायकलने घरी आले. ते साठ वर्षांचे होते. औंधवरून वाडिया कॉलेजला ते सायकलने जात असत. त्यांचा फिटनेस पाहता मी विचार केला, निवृत्तीनंतर गुडघेदुखी ओढवून घेण्यापेक्षा आतापासून आपणही सायकल चालवायला सुरुवात केली तर? विरंगुळा आणि व्यायाम दोन्ही साध्य होईल. पुतणीची सायकल दुरुस्त करून घेतली आणि हळूहळू चालवायला सुरुवात केली. सुरुवातीला घराजवळचा परिसर, नंतर मंडई आणि थेट एअरपोर्ट पर्यंत २८ किलोमीटर सायकल चालवली. जिथे तिथे सायकलने प्रवास सुरु केला. पूर्वी साडी नेसून सायकल चालवली, नंतर टी-शर्ट, ट्रॅकपॅन्ट, शूज हा माझा गणवेश झाला.'

सायकल आयुष्यात आली आणि..

'आपल्याला ज्या गोष्टींची आवड असते, त्याला अनुकूल गोष्टी आपोआप आपल्या आयुष्यात घडू लागतात, फक्त आपण डोळसपणे संधी ओळखायला हवी. माझी सायकलस्वारी सुरु झाली आणि काही दिवसांतच 'पुणे सायकल प्रतिष्ठान'ची माहिती मिळाली. ती मंडळी दर वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जायचे. त्यावर्षी त्यांचा वाघा बॉर्डर ते आग्रा सायकलने जाण्याचा प्लॅन होता, त्यासाठी त्यांनी महाबळेश्वरपर्यंत सायकलने जाण्याचा सराव सुरु केला. एवढ्या दूर जायचं म्हटल्यावर आपली शारीरिक क्षमता तपासून बघण्यासाठी मी एकटी सातारा, वाई करत भोरला आमच्या गावी गेले. तिथून परत आल्यावर मीही महाबळेश्वरचा सराव सुरु केला. त्यांच्याबरोबर वाघा बॉर्डर ते आग्रा, भुवनेश्वर ते कलकत्ता, चेन्नई ते कन्याकुमारी, गोवा ते कोचीन सायकल प्रवासाचा अनुभव घेतला. आसेतुहिमाचल सायकलने पालथा घातल्यावर एकेक विक्रम करत गेले. सत्तरावा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी १६ दिवसांत १६०० किलोमीटरचा प्रवास केला. ७२ व्या वर्षी पुणे ते जम्मू प्रवास केला आणि ७५ व्या वर्षी पुणे ते कलकत्ता प्रवास केला आणि आता ७७ व्या वाढदिवशी नर्मदा परिक्रमा सायकलने पूर्ण करण्याचा मैत्रिणीबरोबर बेत आखतेय. या वयातही रोज २६ किलोमीटर सायकल मी सहज चालवते, ऍब्स वर्कआउट करते. साठी पार केलेली आमची मित्र-मैत्रिणींची टीम आहे. त्यांच्यात मी रमते, फिरते, एन्जॉय करते. याही वयात रॉक क्लायंबिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग करते.' भावे आजी सांगत असतात आपले पुढचेही प्लान्स!


 

सायकलने काय दिलं?

निरुपमा भावे सांगतात, सायकलने त्यांना काय दिलं याची उत्साह वाढवणारी गोष्ट.
त्या म्हणतात, ‘सायकाच्या याच प्रवासात एक छान संधी मिळाली. शिरिन व्यंकट नावाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ गंगा सागर ते गोमुख पदयात्रा काढणार असल्याची बातमी वाचली. त्यादरम्यान माझा पाय एका सायकललिंग शर्यतीमध्ये फ्रॅक्चर झाला होता. तरी त्या उपक्रमात मी सहभागी झाले आणि डॉ. शिरीन यांच्याबरोबर शंभर दिवस गंगेच्या काठाने तेथील गर्भवती मातांची देखभाल करत, त्यांना हिमोग्लोबिनचे महत्त्व सांगत त्यांचं प्रबोधन केलं. पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, झारखंड अशा पाच राज्यांतून गंगेच्या काठावरून नियमित वीस किलोमीटर पदयात्रा करत हा प्रवास केला. यादरम्यान तब्बल शंभर-दोनशे महिलांचं प्रबोधन करता आलं.
सायकलने माझ्या आयुष्याला गती दिली. एका मोठ्या आजारातून उठण्याचं बळ दिलं, जगण्याला, नवनवीन ठिकाणं बघायला, लोकांना भेटायला ऊर्जा दिली. अनेकांनी मला या अनुभवांचं पुस्तक करण्याचा सल्लाही दिला. पण लेखन हा माझा प्रांत नाही. माझे यजमान गणिताचे प्रोफेसर आणि उत्तम साहित्यिक होते. आज ते असते तर कदाचित त्यांच्या मदतीने हेही साध्य केलं असतं. तूर्तास जे आहे त्यात मी संतुष्ट आहे.
घरच्यांचा पाठिंबा तेव्हाही होता आणि आजही आहे. वयोमानानुसार आता थांबावं का, असं मुलाला विचारलं तर म्हणाला, जोवर शरीर साथ देतंय तोवर अजिबात थांबू नकोस. मलाही ते पटलं. इंजिनिअर व्हायचं होतं, पण झाले प्रोफेसर. तिथून रिटायर्ड झाले ती आता झाले सायकल रायडर. ठरवून काहीच केलं नाही, जे जसं येत गेलं ते स्वीकारत आत्मविश्वासाने पुढे गेले. मला वाटतं सगळ्या बायकांनीही असंच करावं. सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळताना आपले छंद, आवड सोडून न देता ते पूर्ण करावेत. त्यात रमावं. स्वतःचं आरोग्य जपावं. कोणताही छंद जोपासायला वयाचं बंधन नसतं. उलट पन्नाशीनंतर जबाबदारीतून मुक्त व्हावं आणि राहून गेलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत शेवटच्या श्वासापर्यंत भरभरून जगावं!’
निरुपमा भावेंची गोष्ट ऐकून आपलं मन आनंदाच्या सायकलवर बसलेलं असतं..पुढच्या आनंदाचा गिअर दिसू लागतो..

Web Title: 75 year old cyclist nirupama bhave from pune, story of her nationwide cycling, inspirational story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.