Join us
Daily Top 2Weekly Top 5

Laibi Phanjoubam : मैदानावरची क्रांती! मणिपूरच्या 'आजींनी' फुटबॉलच्या जोरावर बदललं मुलींचं नशीब; केलं स्वावलंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:08 IST

Laibi Phanjoubam : घरकाम आणि कमी वयात होणाऱ्या लग्नाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलींना फुटबॉलच्या मैदानात आणलं आणि त्यांना मोठं स्वप्न पाहण्याचं बळ दिलं.

मणिपूरमध्ये फुटबॉल हा केवळ खेळ नसून तो जगण्याचा एक अविभाज्य भाग मानला जातो. मात्र अनेक दशकांपासून या खेळाच्या मैदानावर केवळ मुलांचीच मक्तेदारी होती. सामाजिक बंधनं आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मुलींसाठी हे मैदान बंद होतं. पण लायबी फंजौबम या जिद्दी महिलेने हे चित्र बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी आपल्या छोट्याशा घराचं रूपांतर एका सेफ हाऊसमध्ये केलं. घरकाम आणि कमी वयात होणाऱ्या लग्नाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलींना त्यांनी फुटबॉलच्या मैदानात आणलं आणि त्यांना मोठं स्वप्न पाहण्याचं बळ दिलं.

सुरुवातीला लायबी यांना गावातील लोकांच्या प्रचंड टीकेचे सामना करावा लागला. एका वृद्ध महिलेने आपले उर्वरित आयुष्य खेळाच्या मैदानावर का वाया घालवावं, असे प्रश्न विचारून लोक त्यांची खिल्ली उडवत होते. मात्र लायबी यांचा निश्चय ढळला नाही. त्या केवळ प्रशिक्षक नव्हत्या, तर त्या मुलींच्या लाडक्या इंदू आजी बनल्या. सराव संपल्यानंतर आपल्या थकलेल्या खेळाडूंसाठी त्या स्वतः स्वयंपाकघरात जेवण बनवत असत. त्यांच्या या मायेनेच अनेक मुलींना मैदानात पाय रोवून उभं राहण्याचं मानसिक सामर्थ्य दिलं.

खेळासोबतच स्वावलंबनाचे धडे

लायबी फंजौबम यांचं कार्य केवळ खेळापुरतं मर्यादित राहिल नाही. मुलींना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांनी खेळाडू मुलींना हातमागावर कापड विणण्याचं कौशल्य शिकवलं. यामुळे या मुली केवळ मैदानातच नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातही 'फायटर' बनल्या. स्वतःचे पैसे स्वतः कमवून सन्मानाने कसं जगावं हे शिकवलं. आज या मुली केवळ उत्तम खेळाडूच नाहीत, तर त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी महिला म्हणून समाजात वावरत आहेत.

'अँड्रो ड्रीम्स'ची जागतिक दखल

लायबी फंजौबम यांच्या या संघर्षाची आणि यशाची गाथा आता 'अँड्रो ड्रीम्स' (Andro Dreams) या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून जगासमोर आली आहे. ही डॉक्युमेंट्री हेच सिद्ध करते की, मोठी क्रांती घडवण्यासाठी नेहमीच आलिशान स्टेडियम किंवा अवाढव्य निधीची गरज नसते. कधीकधी एका धाडसी महिलेची दूरदृष्टी आणि तिच्या हातातील विणकामाच्या सुया देखील सामाजिक बदलाची मोठी लाट आणू शकतात. मणिपूरच्या मातीत लायबी यांनी एक मोठी क्रांती केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Manipur's 'Grandma' revolutionizes girls' lives through football, fostering independence.

Web Summary : Laibi Phanjoubam empowered Manipur girls through football, defying social norms. Facing criticism, she trained girls, providing food and weaving skills. The 'Andro Dreams' documentary showcases her impact, proving a single woman can spark social change.
टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीफुटबॉल