चंदीगडमधील ५२ वर्षीय वीणा देवीचा एक व्हिडीओ अचानक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे त्यांची हिंमत, त्यांनी दाखवलेलं धाडस आणि आपल्या कामाबद्दल असलेलं समर्पण होतं. फिटनेस एंथुजियास्ट मलिका अरोरा यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जिथे ती वीणा देवी यांच्याशी बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वीणा देवी स्पष्ट करतात की, त्या झेप्टोसाठी डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतात.
जेव्हा मलिका यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली तेव्हा वीणा देवी यांनी शांतपणे सांगितलं की, त्या ५०% पॅरालाइझ आहेत, तरीही गेल्या वर्षी जूनपासून त्या सतत काम करत आहे. इतक्या गंभीर स्थितीतही त्यांनी त्यांचं आयुष्य थांबू दिलं नाही, याउलट पूर्ण आत्मविश्वासाने आपलं कर्तव्य बजावतात. हे समजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
जेव्हा त्यांनी वीणा यांना विचारलं की त्या त्यांना कशी मदत करू शकतात, तेव्हा वीणा देवी यांनी "फक्त पाठिंबा देत राहा" असं उत्तर दिलं. या उत्तराने लोकांची मनं जिंकली आहेत. संभाषणाच्या शेवटी मलिका अरोराने म्हटलं की, "मला तुमचा खूप अभिमान वाटत आहे. अशाच पुढे जात राहा." वीणा यांच्यापासून आता अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झेप्टोनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “प्राउड ऑफ हर” असं इन्स्टाग्रामवर म्हटलं आहे. मलिकाने कंपनीचे आभार मानले आणि म्हटलं की असा प्लॅटफॉर्म कष्टाळू लोकांना ओळख मिळवून देत आहे. ही घटना लोकांच्या मनाला स्पर्शून गेली कारण हे फक्त एका कर्मचाऱ्याबद्दल नाही, तर संघर्ष आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
