५० वर्षांची चिनी महिला सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून अनेकांना तिच्यापासून प्रेरणा मिळत आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) च्या रिपोर्टनुसार, यांग नावाच्या या महिलेने तिच्या मुलासाठी आणलेल्या परीक्षेच्या पुस्तकांमधून अभ्यास करून लॉ स्कूलमध्ये प्रवेश मिळवला. लॉ स्कूल प्रवेश परीक्षेत मुलगा नापास झाल्यानंतर यांगने मुलाच्याच अभ्यास साहित्याचा वापर परीक्षेची तयारी करण्यासाठी केला.
सुरुवातीला अपयशी ठरल्यानंतरही चीनच्या शेडोंग प्रांतातील जिनिंग येथील ही महिला प्रयत्न करत राहिली आणि अखेर युनान प्रांतातील कुनमिंग येथील साउथवेस्ट फॉरेस्ट्री युनिव्हर्सिटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट लॉ स्कूलमध्ये प्रवेश मिळवला. या महिलेने १९९० च्या दशकात शांघायच्या प्रतिष्ठित टोंगजी विद्यापीठातून केमिकल सायन्समध्ये पदवी प्राप्त केली होती.
रिपोर्टनुसार, २०१३ मध्ये ही महिला आगीत गंभीरपणे भाजली गेली होती, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आणि हातांना गंभीर दुखापत झाली होती. तिचा डावा हात पूर्णपणे काम करत नव्हता, तर उजवा हात अर्धा काम करत होता. खोल जखमांमुळे ती सार्वजनिक ठिकाणी मास्क घालायची. या घटनेनंतर ती निराश झाली आणि तिने नोकरी सोडली.
"माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन प्रवास"
यांगने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, "एकदा माझा अपघात झाला आणि मी अपंग झाले. मी माझी नोकरी गमावली. मी नैराश्यात गेले. आता मी ५० वर्षांची आहे आणि लॉमध्ये मास्टर डिग्रीचं माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक नवीन प्रवास सुरू करेन. माझ्या डाव्या हाताने काम करणं थांबवलं होतं, तर सुदैवाने माझ्या उजव्या हाताचा अर्धा भाग अजूनही काम करत होता, ज्यामुळे मला अभ्यास करता आला."
"परीक्षा खूपच आव्हानात्मक"
महिलेने सांगितलं की, तिचा मुलगा त्याच परीक्षेत नापास झाल्यानंतर तिने दोन वर्षांपूर्वी प्रवेश परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. "परीक्षा संपल्यानंतर, मी त्याला त्याचे अभ्यास साहित्य जुळवण्यास मदत करत होते. मला वाटलं की जर आपण ही पुस्तके इतक्या कमी किमतीत विकली तर किती वाईट होईल. जेव्हा मी काही पानं पाहिली तेव्हा मला जाणवलं की त्यातील मजकूर माझ्यासाठी कठीण नाही. परीक्षा खूपच आव्हानात्मक होती. माझ्या पती आणि मुलाच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने मी ती पास होऊ शकले" असं यांगने म्हटलं आहे.