१७ वर्षीय कोयल बारने कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन गोल्ड मेडल जिंकले. मुलीचं घवघवीत यश पाहून कोयलचे पालक खूप आनंदी आहेत. कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव कोयल घरी परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोयलचे वडील मिथुन संकरैलमधील धुलोगडच्या बॅनर्जी पाडा येथील रहिवासी असून त्याचं एक छोटं दुकान आहे. ते पूर्वी वेटलिफ्टर देखील होते, परंतु या खेळात त्यांना फारसं यश मिळू शकलं नाही.
लेकीच्या माध्यमातून त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा मोठा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थिती अडथळा ठरत असतानाही, वडिलांनी आपल्या मुलांना वेटलिफ्टिंगचं ट्रेनिंग देणं सुरू ठेवलं. त्यांच्यासाठी डाएटची व्यवस्था केली. कोयलने २०१८ मध्ये कोच अष्टम दास यांच्याकडून त्याच्या युक्त्या शिकण्यास सुरुवात केली. देउलपूर, येथे वेटलिफ्टिंग केलं. त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला.
दोन गोल्ड मेडल जिंकले
फेब्रुवारी २०२३ मध्ये कोयलची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली. कोयलने अभ्यासासोबतच सरावही सुरू ठेवला. सध्या कोयल दहावीत शिकत आहे. मंगळवारी झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कोयलने ५३ किलो गटात दोन गोल्ड मेडल जिंकले. जेव्हा कोयल वेटलिफ्टिंग करत होती, तेव्हा तिचे पालक आणि शेजारी टीव्हीवर तिला पाहत होते.
मागचा रेकॉर्ड मोडला
कोयलने १९२ किलो वजन उचललं, ५३ किलो वजनी गटात १८८ किलो वजन उचलण्याचा मागचा रेकॉर्ड मोडला. तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १०७ किलो वजन उचललं. कोयलने युवा आणि ज्युनिअर दोन्ही गटात गोल्ड मेडल जिंकलं. ही बातमी समजताच शेजारी आणि नातेवाईक तिचं अभिनंदन करण्यासाठी तिच्या घरी पोहोचले.
"माझ्या मुलीच्या यशाने मी खूप आनंदी"
कोयलचे वडील मिथुन बार यांनी दिलेल्या माहितीनुसार "मी वेटलिफ्टिंग करायचो, पण मला फारसं यश मिळू शकलं नाही. म्हणूनच मी माझ्या मुलीला आणि मुलाला या खेळात आणलं. गोल्ड मेडल जिंकल्यानंतर मी माझ्या मुलीशी फोनवरही बोललो. माझ्या मुलीच्या यशाने मी खूप आनंदी आहे. कोयलने आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे."
"मुलीने खेळात अधिक यश मिळवावं ही इच्छा "
कोयलची आई श्रावंती यांनी "माझ्या मुलीने खेळात अधिक यश मिळवावं अशी माझी इच्छा आहे. कॅम्पमध्ये कोयलला तिच्या आवडीचे पदार्थ मिळत नाही. ती घरी आल्यावर मी तिच्यासाठी आवडीचे पदार्थ बनवेन" असं म्हटलं आहे. कोयलने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी मेडल जिंकावेत अशी शेजाऱ्यांची इच्छा आहे. मंत्री अरुप रॉय यांनी सांगितलं की, कोयल घरी परतल्यावर तिचं भव्य स्वागत केलं जाईल, ज्याची तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.