Ileana asks, who decide who is beautiful? | इलियाना विचारते, कोण कुणाला सुंदर ठरवणार?

इलियाना विचारते, कोण कुणाला सुंदर ठरवणार?

-प्रतिनिधी

आपण आरशासमोर उभं राहातो तेव्हा आपल्याला आपल्यातलं सौंदर्य दिसतं की फक्त दोष? अमुक गोष्ट आपल्यात कमी आहे असा घरातला आरसा, समाजातला सौंदर्याच्या व्याख्येतला चौकटीचा आरसा आपल्याला सांगतो. आणि आपण या आरशाचं मत फारच मनावर घेतो. सौंदर्याच्या विशिष्ट चौकटीत फिट बसण्यासाठी, आपल्यातले दोष? घालवण्यासाठी जिवापाड प्रयत्न करू लागतो. पण चौकटीतल्या सौंदर्याच्या आरशात काही आपण बसत नाही. मग समाजासोबतच आपणही आपल्याला दोष? देऊ लागतो, दोष? शोधू लागतो.

आपल्या स्वत:वर प्रेम करण्यात हे दोष खूप अडथळे आणतात. बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझच्या बाबतीतही हेच झालं. आपलं पोट सपाट नाही, आपली कंबर मोठी आहे, आपला बांधा कमनीय नाही, आपले दंड जाड आहे. असे एक ना अनेक दोष तिला स्वत:मध्ये दिसू लागले. या दोषांमुळे ती स्वत:चा राग करू लागली. ते दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागली. पण प्रयत्न करता करता थकली आणि एक दिवस तिला प्रश्न पडला की कशासाठी करतो आहोत आपण हा अट्टाहास?

ज्या गोष्टींना आपण आपले दोष मानतो खरं तर ते आपल्या सौंदर्याचे विशेष आहेत. या गोष्टींमुळेच तर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत. मग का समाजानं ठरवलेल्या सौंदर्याच्या एका विशिष्ट चौकटीत आपण स्वत:ला बसवण्यासाठी धडपडतोय? आपण जसे आहोत तसं स्वीकारायला आपल्याला जमलं तर चौकटीतल्या सौंदर्याच्या मागे निरर्थक धावण्यातली आपली ऊर्जा वाचेल अन‌् स्वत:वर प्रेम करण्याची दिशा सापडेल. ही जाणीव काही वर्षांपूर्वी इलियानाला झाली. जे आपल्याला जाणवलं ते इतरांना सांगण्यासाठी ‘स्वत:वर प्रेम करा !’ असा संदेश आपल्या प्रत्येक मुलाखतीत, समाजमाध्यमांवरील आपल्या पोस्टमधून देण्यास सुरुवात केली.

इलियाना सध्या सर्व मुली आणि महिलांना पोटतिडकीनं सांगते आहे की, आपल्याला आपल्या दिसण्यात जे दोष दिसतात ते आपले सौंदर्याचे, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष आहेत. त्यांना झाकू नका, नाकारू नका. उलट त्यांना स्वीकारा म्हणजे आपल्याला आपल्यावर प्रेम करण्याचा मार्ग सहज सापडेल!

Web Title: Ileana asks, who decide who is beautiful?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.