If the patient suffers unbearable medical expenditure... only patient himself is responsibel.... How? the patient himself is responsible .. How is he? | रूग्णाला नाहक वैद्यकीय भुर्दंड पडत असेल तर त्याला जबाबदार स्वत: रूग्णच.. तो कसा?      

रूग्णाला नाहक वैद्यकीय भुर्दंड पडत असेल तर त्याला जबाबदार स्वत: रूग्णच.. तो कसा?      

- वैद्य सुविनय दामले

छोटय़ाशा आजारावरची भली मोठी तपासण्यांची आणि औषधांची यादी बघितली की, घरातली वयोवृद्ध मंडळी नाकं मुरडतात. एवढुशासाठी एवढं कशाला म्हणून प्रश्न विचारतात. पण या प्रश्नाला उत्तर नसतंच. यासाठी फक्त कारणं असू शकतात. जी आताच्या परिस्थितीत निर्माण झालेली आहेत.

अनावश्यक तपासण्या
पूर्वी बरं होतं. फॅमिली डॉक्टरकडे जायचं. आपल्याला काय होतंय हे दोन-चार वाक्यात सांगायचं. त्यावर आमचे डॉक्टर षटकोनी आकाराच्या पटय़ा असलेला कागद बाटलीवर चिकटवून लाल रंगाचं औषध ओतून द्यायचे. दोन प्रकारच्या गोळ्या, एक औषधाचा डोस समोरच प्यायचा. एखाद्याला सणसणीत उकळत्या पाण्यातील एखाद्या जाड स्टीलच्या सुईचं इंजेक्शन मिळायचं की तपासणी पूर्ण व्हायची. पॅथॉलॉजिकल लॅब हा प्रकारच नव्हता. पण आता मात्र साधी सर्दी झाली तर आधी हातभर यादी मिळते, रक्ताच्या सर्व तपासणीपासून नाकाच्या भोकांच्या एक्सरेर्पयत करून आलं की औषधं तीच असतात.
ए बी सी डी. ए अँण्टिबायोटिक, बी बी कॉम्लेक्स, सी सीपीएम, व्हिटामिन सी वा सिम्टोमॅटिक किंवा डी डेक्सा. कंपनी बदलेलं, जेनेरीकचं कुठेतरी ब्रॅण्डेड होईल, इतकंच. पण तपासण्या काही सुटत नाहीत. याचं गौडबंगाल डॉक्टरना विचारले तर ते म्हणतात की, या तपासण्या करणं आता कायदेशीर झालं आहे.
ग्राहक मंचात एखादी केस गेली तर ‘तपासण्या करण्यात हेळसांड केली’ या नावाखाली पुन: शिक्षा डॉक्टरलाच. म्हणून डॉक्टर शेवटी नाइलाजास्तव तपासण्यांच्या कागदाला हात लावतोच. नाहीतर हातात बेडय़ा नक्की. त्यापेक्षा ‘तूच तुझ्या पैशानं  तुझ्याच तपासण्या करून येरे बाबा !’ असं म्हणत चिठी फाडतो.
काय चुकलं डॉक्टरांचं? 
पण यात फावतं कुणाचं? 
- तर बोगस डॉक्टरांचं.
ते कसं? 
कारण यांच्याकडे तपासण्यांच्या भानगडीच नाहीत, म्हणजे तेवढे पैसे आपले वाचले, असा विचार डॉक्टर करतो आणि तपासण्याऐवजी वाचवलेले पैसे औषधाच्या बाटलीतून मला घेता येतील, हा बोगसांचा हेतू. दोन्ही साध्य होतं. म्हणून सामान्य माणसाला बोगस डॉक्टर, तो बोगस आहे, हे समजून उमजूनदेखील, त्याच्याकडे जाण्यात आर्थिक शहाणपण वाटतं. यावर उपाय म्हणजे अनावश्यक तपासण्या करणं डॉक्टरनी थांबवणं आवश्यक वाटतं.
अनावश्यक रोगांची भीती 
‘सोकॉल्ड मोठय़ा डिग्रीच्या डॉक्टरांकडे गेलो तर ते घाबरवतात’ असं सामान्य माणूस सांगत असतो. काहीअंशी ते खरंही आहे. (मालवणी भाषेत सांगायचं तर चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला)    ‘साध्या साध्या गाठीला मोठी मोठी फायब्रोमायलोमा, हिमॅटिक सिस्ट, बिनाइन एनलार्जमेण्ट अशी नावं दिली की, मोठा रोग डेव्हलप करता येतो. जेवढा रोग मोठा, तेवढी बिलं जास्ती’, असंही सामान्य माणसाला वाटत असतं. वाढलेले रोग म्हणजे  भविष्यातला जीवनातील आनंद संपला म्हणूनच समजा ! त्यापेक्षा अज्ञानात सुख असतं. रोगाचे नाव कळून रोज मरण्यापेक्षा रोगाचं नाव न शोधता, उर्वरित जीवनाचा आनंद घ्यायला बोगस डॉक्टर शिकवतात, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जातो, असेही काही रुग्ण म्हणतात. बोगस डॉक्टर घाबरवत नाहीत. ते केवळ धनच लुटतील; पण अतिज्ञानी डॉक्टर धन तर लुटतीलच त्याबरोबर जीवनातील आनंद लुटतात आणि शरीरात नवीन रोगांची उत्पत्ती करतात.
अशा भानगडी हव्यातच कशाला, असं सामान्य माणसाला वाटलं तर त्यात चूक ते काय? रोगाला नाव देण्यापेक्षा रोगाची लक्षणं कमी होणं, त्याचा रुग्णावर दिसणारा परिणाम कमी करणं जास्त महत्त्वाचं असतं. आरोग्याची ही चावी बोगस डॉक्टरना बरोबर समजलेली असते. पेशण्ट कोणत्या मानसिकतेत आहे, त्यानुसार आपली शब्दरचना बदलवीत, तो रुग्णाला आपल्याचकडे परतपरत यायला भाग पाडतो. हे त्याचं व्यावसायिक कौशल्य आहे. हे कौशल्य अधिकृत डॉक्टरांनी शिकून घेतलं तर त्यांच्याकडील रु ग्णसंख्या वाढायलापण मदतच होईल.
कट प्रॅक्टिस 
अनधिकृत डॉक्टरांकडे कट प्रॅक्टिस नसते. जो काही फायदा होईल, तो स्वत:चा स्वत:लाच. त्यामुळे एकाकडूनच जास्ती पैसा न घेता, थोडे थोडे पैसे ब-याच जणांकडून घेतले की फायदा जास्त होतो, हे आर्थिक गणित अनधिकृत म्हणजे बोगस डॉक्टरांना बरोबर समजलेलं असतं. हे अधिकृत डॉक्टरांना समजेल तो सुदिन.
कट प्रॅक्टिस ही खरं तर वैद्यकीय व्यवसायाला लागलेली कीडच आहे. ही जेवढी लवकर नष्ट होईल तेवढं आरोग्य चांगलं. कारण रुग्णाकडून घेतलेल्या पैशात जास्ती वाटेकरी होतात. लुटला जातो, तो सामान्य रुग्ण. ज्या तपासण्या शंभर दोनशे रुपयात होतात, त्याच तपासण्यांना सहाशे सातशे रुपये अधिक द्यावे लागतात. हा नाहकभुर्दंड  रु ग्णाला सोसावा लागतो. सरकारनं यात लक्ष घालणं आवश्यक आहे. कोणाकडून किती फी आकारावी, याचे कोणतेही नियम ठरलेले नाहीत. अमुक डॉक्टरनं अमुक फी घ्यावी, अमुक तपासणीला एवढंच शुल्क घेण्यात यावं, असे नियम केले तरी त्यात पळवाटा ठेवल्या जातातच. शेवटी तपासणी करणा-याची नीतिमत्ता सुधारणंच आवश्यक. व्यवसाय करावा, पण कोणाच्या जिवाशी खेळून नको. आयुष्यभर काडी काडी करून मिळवलेले पैसे, नसलेल्या रोगासाठी, अनावश्यक तपासण्या करून, अनावश्यक शस्रक्रिया करायला आणि भविष्यातील नवीन रोगांची सुरुवात करून देणारी औषधं घेण्यासाठी दिले गेले की वाईट वाटते. 
प्रसिद्धीचं वलय 
बोगस डॉक्टरांनी स्वत:भोवती प्रसिद्धीचे वलय तयार करून घेतलेलं असतं. काहीजण तर स्वत:साठी खास अंगरक्षक घेऊनच फिरत असतात. व्हॉट्सअँप, यू टय़ुब फेसबुक अशा प्रसिद्धीमाध्यमातून स्वत:चं असं खास वलय तयार करतात की त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं, त्यांच्या बोलण्यानं,  त्यांच्यावर विश्वास ठेवावासा वाटतो.  आणि यातून नंतर रु ग्णांच्या जिवाशी खेळ सुरू होतो.
एकदा बोगस डॉक्टरनं दिलेली औषधं सुरू केली तर ती औषधं आता बंद नको करूया, त्यांना काय वाटेल, म्हणून रुग्ण पुन: त्यांच्याकडे खेचले जातात. एकतर त्यांची भीती वाटत असते, किंवा खूप आपुलकी निर्माण करून ठेवल्यानं भावनिकरीत्या रुग्णाला बांधून ठेवलं जातं. 
अशा अनेक कारणांमुळे बोगस डॉक्टरांचा धंदा निमूटपणो; पण तेजीत चालत असतो.

(लेखक आयुर्वेदाचार्य आहेत.)

drsuvinay@gmail.com
                                                                                                                                                                   

Web Title:  If the patient suffers unbearable medical expenditure... only patient himself is responsibel.... How? the patient himself is responsible .. How is he?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.