-डॉ. गौतम पंगू

एक तरुण जोडपं फिरायला बाहेर पडतं. त्यांना पिझा खायची इच्छा होते. ते एका रेस्टॉरण्टमध्ये जातात. तिथल्या मेन्यूमध्ये असलेल्या पिझाच्या प्रकारांतला कोणताच प्रकार त्यांना पसंत पडत नाही. त्यांना एका विशिष्ट तर्‍हेचाच पिझा खायचा असतो. मग ते त्यांना हवी तशी क्रस्ट, हवं तेवढं चीझ आणि हवी ती टॉपिंग्ज वापरून बनवलेल्या ‘कस्टम पिझा’ची ऑर्डर देतात. अगदी सहज घडू शकेल असा हा प्रसंग आहे.  आता कल्पना करा, तेच जोडपं एका फर्टिलिटी क्लिनिकमध्ये जातं. नवरा तिथल्या डॉक्टरांना सांगतो,  ‘तुम्ही माझं स्पर्म आणि हिच्या गर्भाशयातलं एग घ्या आणि त्यापासून आम्हाला एक बाळ बनवून द्या. पण आम्हाला साधंसुधं बाळ नको. खास बाळ हवंय:  बाकीच्या बाळांपेक्षा अधिक निरोगी, अधिक हुशार, अधिक देखणं. तेव्हा जन्माआधीच त्याच्या जीन्समध्ये तसे बदल करून ते बाळ जन्माला आणा’.
 तिथले डॉक्टर त्यांचं स्पर्म आणि एग घेतात, त्या जोडप्याला हव्या तशा ‘कस्टम बाळा’ची ऑर्डर घेतात आणि प्रयोगशाळेत जाऊन कामाला लागतात.
- ही फॅण्टसी वाटतेय? नाही! हीच आहे ‘डिझायनर बेबीज’ किंवा ‘जेनेटिकली मॉडिफाइड बेबीज’ची संकल्पना. एखादा विशिष्ट गुणधर्म बाळामध्ये उतरण्यासाठी जन्माआधीच ज्या बाळाचे जीन्स निवडले अथवा बदलले जातात असं बाळ. मागच्या काही दशकांत जैवतंत्रज्ञानात झालेल्या अफाट आणि वेगवान प्रगतीमुळं ही एखाद्या विज्ञानकथेतली वाटेल अशी कल्पना आता वास्तवात उतरू लागली आहे. 1978 साली इंग्लंडमध्ये पहिली ‘टेस्ट ट्यूब बेबी’ जन्माला आली आणि तेव्हापासून ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन’चं (आयव्हीएफ :- म्हणजे स्त्रीचं एग आणि पुरुषाचं स्पर्म यांचा शरीराबाहेर, प्रयोगशाळेत केलेला संयोग) तंत्र झपाट्यानं विकसित झालं. मग काही काळानं एग आणि स्पर्म यांच्या संयोगातून प्रयोगशाळेत तयार झालेला भ्रूण (ीेु18) स्त्रीच्या गर्भाशयात प्रेग्नन्सीसाठी घालण्याआधी त्याचं जेनेटिक टेस्टिंग करण्याच्या पद्धती सुरू झाल्या. यामुळं बाळाकडं आईवडिलांकडून कुठले अनुवंशिक आजार जाण्याचा धोका असेल तर तो आधीच लक्षात यायला लागला आणि असे ‘सदोष’ भ्रूण बाजूला करता येऊ लागले.
पण एकदा आयव्हीएफ तंत्रज्ञानानं प्रयोगशाळेत बाळं ‘निर्माण’ करता येतात हे लक्षात आल्यावर माणूस या ज्ञानाच्या कक्षा निर्भयपणे विस्तारत गेला आणि त्यातूनच त्यानं स्वत:ला असा प्रश्न विचारायला सुरुवात केली की नुसत्या टेस्टिंगवर न थांबता भ्रूण परत आईच्या गर्भाशयात घालण्याआधी त्यात हवे ते जेनेटिक बदल करता आले तर? 2012 मध्ये एखाद्या सजीव पेशीमधला डीएनए चक्क ‘एडिट’ करण्यासाठी शास्रज्ञांनी उफकरढफ (उच्चार ‘ क्रिस्पर’) नावाचं तंत्नज्ञान शोधून काढलं. ‘ क्रिस्पर’ तंत्रज्ञान वापरून इच्छित पेशींमधल्या डीएनएचा फक्त हवा तेवढाच तुकडा कापता येतो किंवा हवं तिथं नवा तुकडा घालता येतो.जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये प्रचंड क्रांती घडवून आणणारा हा शोध होता. कोणत्याही सजीवाच्या जगण्याचं, वाढीचं आणि पुनरुत्पादनाचं मूळ त्याच्या डीएनएमध्ये असतं. या डीएनएमध्येच हवा तो बदल करता येण्याची अभूतपूर्व क्षमता  क्रिस्परमुळं मिळाली.क्रिस्पर तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग समोर येऊ लागले. यामध्ये जैविक इंधन (बायोफ्युएल) निर्माण करण्यासाठी आवश्यक असणा-या वनस्पतींमध्ये जेनेटिक बदल करून त्याचं उत्पादन वाढवणं,  मलेरियाच्या डासांचा डीएनए बदलून मलेरियाचा समूळ नायनाट करणं, पिकांच्या बीजामध्ये जेनेटिक बदल करून त्यांचं उत्पादन वाढवणं, त्यांची चव-रंग-रूप बदलणं, मुद्दाम दुष्काळी भागातही वाढतील अशी बीजं बनवणं अशा अनेक गोष्टींवर काम सुरू झालं. ज्या रोगांचा उगम आपल्या डीएनएमध्ये आहे अशा रोगांवर क्रिस्पर पद्धत वापरून नवनवीन उपचार शोधणा-या अनेक कंपन्या सुरू झाल्या. त्या कंपन्यांना त्यांच्या उपचारपद्धतीची उपयुक्तता तपासून पाहण्यासाठी माणसांवर वैद्यकीय चाचण्या करायची परवानगीही मिळाली.

 


जन्माआधी बाळाचा डीएनए बदलण्यासाठी क्रिस्परचा वापर करणं वैध ठरवावं का, या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाला याखेरीज अजून अनेक पैलू आहेत.  असं समजा ही प्रक्रि या सुरक्षितरीत्या, बाळाला आणि पुढच्या पिढय़ांना कोणताही धोका उद्भवणार नाही अशा प्रकारे करता येऊ लागली, तर त्याला परवानगी द्यावी का? जन्माआधी आपल्या बाळाचा डीएनए बदलून त्याला आनुवंशिक रोगांतून जन्मत:च मुक्त करावं असं पालकांना वाटलं तर त्यात काय चूक आहे? 
- पण वैद्यकीय नीतितज्ज्ञांना अशी भीती वाटते की, माणसाची हाव त्याला तिथंच थांबू देणार नाही. क्रिस्परचा वापर करून होणार्‍या बाळाचा डीएनए वेगवेगळ्या प्रकारे बदलता येऊ शकेल. त्यामुळं जर या तंत्नज्ञानात अजून प्रगती झाली आणि आपण अशा वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या की आम्हांला निळ्या डोळ्यांचं बाळ द्या, लांब केसांचं बाळ द्या, देखणं बाळ द्या, बुद्धिमान बाळ द्या, शक्तिशाली बाळ द्या आणि क्रिस्पर वापरून माणसांचा अक्षरश: ‘मागणी तसा पुरवठा’ चालू झाला तर? आधीच आपला समाज वर्ण, जात, रंग, देश, पैसा यांचा आधार घेऊन केल्या जाणा-या भेदभावानं पोखरला आहे. 
त्यात ज्यांना हे तंत्नज्ञान उपलब्ध आहे आणि त्याचा वापर परवडणारा आहे त्यांची ‘डिझायनर’ मुलं आणि बाकीच्यांची ‘कॉमन’ मुलं यांच्यातल्या फरकामुळं समाजातली विषमता, अन्याय आणि  त्यातून उद्भवणारा संघर्ष यांना अजून खतपाणी मिळालं तर? शिवाय या तंत्र ज्ञानाची मालकी जर एखाद्या मोठय़ा कंपनीच्या किंवा एखाद्या देशाच्या हातात गेली आणि आपल्या फायद्यासाठी आणि मोनोपॉलीसाठी त्यांनी हवे तसे ‘सुपर ह्युमन’ तयार करायचा सपाटा लावला तर? 
- आणि या धोक्यांचा विचार करता  क्रिस्परचे इतर अनेक फायदे असले तरी होणा-या बाळाचा डीएनए कृत्रिमरीत्या बदलण्यासाठी त्याचा वापर करण्याआधी अतिशय गंभीर विचार करायची गरज आहे, असा स्पष्ट इशारा नीतितज्ज्ञांनी दिला आहे. नाहीतर आपल्या विकासाला कारणीभूत ठरलेलं हे तंत्रज्ञान कधीतरी आपल्याच नाशाचंही कारण होईल, हे निश्चित !

--------------------------------------
जगातल्या पहिल्या ‘जेनेटिकली मॉडिफाइड’
बाळांची वादग्रस्त गोष्ट

 

2018 मध्ये अशी एक घटना घडली की, ज्यामुळं क्रिस्परशी संबंधित विज्ञान जगतात प्रचंड खळबळ उडाली. 25 नोव्हेंबर 2018 रोजी हे जियांक्वी नावाच्या अवघ्या 35 वर्षांच्या चिनी शास्रज्ञानं यू ट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला. त्यात त्यानं सांगितलं की, क्रिस्पर वापरून त्यानं जगातली पहिली ‘जेनेटिकली मॉडिफाइड’ बाळं बनवली आहेत.
 एचआयव्ही पॉझिटिव्ह पुरु ष आणि एचआयव्ही निगेटिव्ह स्त्री यांच्यापासून बनलेले भ्रूण त्यानं प्रयोगशाळेत जेनेटिकली अशा प्रकारे बदलले की, त्यापासून जन्मलेल्या बाळांमध्ये जन्मत:च एचआयव्हीला प्रतिकार करणारी जीन असेल. असे बदललेले भ्रूण त्यानं पुन्हा आईच्या गर्भाशयात घातले आणि त्यापासून लुलू आणि  नाना या दोन जुळ्या मुली जन्माला आल्या.
 जियांक्वीनं ही घोषणा केल्यावर त्याच्यावर जगभरातल्या, अगदी चीनमधल्यासुद्धा शास्त्रज्ञांनी आणि वैद्यकीय नीतितज्ज्ञांनी टीकेची प्रचंड झोड उठवली. त्याच्या विद्यापीठानं त्याला नोकरीवरून काढून टाकलं. चीन सरकारनं त्याचे संशोधन करायचे सगळे हक्क काढून घेतले आणि त्याला चक्क नजरकैदेत ठेवलं !
जियांक्वीनं असा काय गुन्हा केला होता? तर या जेनेटिकली मॉडिफाइड बाळांना जन्म देऊन त्यानं वैद्यकीय संशोधनामधल्या कधीही ओलांडल्या न गेलेल्या लक्ष्मणरेषेचं उल्लंघन केलं होतं.

 


 क्रिस्परची प्रौढ माणसांवर चाचणी घेणं निषिद्ध राहिलं नसलं तरी अजून जन्मालाही न आलेल्या बाळाच्या भ्रूणावर किंवा गर्भावर सुरक्षितपणे असे प्रयोग करण्याइतकं ज्ञान आणि कौशल्य अजून आपल्याकडं नाही असं शास्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळं एचआयव्हीपासून त्या मुलींचं रक्षण करायच्या प्रयत्नात जियांक्वीनं लुलू आणि नाना यांच्या प्रकृतीला अजून एखादा गंभीर धोका निर्माण केला असल्याची शक्यता आहे.
शिवाय त्यानं हा प्रयोग करताना पुरेशी पारदर्शकता ठेवली होती का, योग्य कंट्रोल्स वापरले होते का, आणि हा प्रयोग ज्या जोडप्यावर केला त्यांना पुढच्या परिणामांची स्पष्ट कल्पना दिली होती का, याची समाधानकारक उत्तरं तो देऊ शकला नाही. 
 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या माणसावर आणि एखाद्या न जन्मलेल्या बाळाच्या भ्रूणावर क्रिस्पर वापरण्यामध्ये फार मोठा फरक आहे. माणसावरच्या प्रयोगाचा परिणाम फक्त त्याच्यापुरता र्मयादित राहतो; पण एखाद्या भ्रूणाचा डीएनए बदलला तर ते बदल त्या भ्रूणापासून जन्मलेल्या बाळापुरतेच र्मयादित न राहता त्या बाळाच्या पुढच्या पिढय़ांच्या डीएनएमध्येही जातात. याला Germline editingअसं शास्त्रीय नाव आहे. त्यामुळं जियांक्वीनं फक्त लुलू आणि नानाचंच नव्हे, तर त्यांच्या पुढच्या पिढय़ांचं आयुष्यही धोक्यात टाकलं. 
विशेष म्हणजे एचआयव्ही इन्फेक्शन आयुष्यभर आटोक्यात ठेवू शकणारी भरपूर औषधं सध्या उपलब्ध आहेत, त्यामुळं त्या मुलींचं फक्त एचआयव्हीपासून रक्षण करण्यासाठी इतकी बेजबाबदार आणि असुरक्षित पावलं उचलायची त्याला काय गरज होती, असाही सवाल वैज्ञानिक वर्तुळात उठला. 

(केमिकल इंजिनिअर असलेले लेखक अमेरिकेतील प्रख्यात फार्मा कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.) 
gautam.pangu@gmail.com

Web Title: The idea of 'designer babies' is not fantacy... Technology and science makes it real

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.