how to make delicious traditional Batata vada? | बटाटावडय़ाचा ‘पचका वडा’ होतो? मग उत्तम बटाटेवडे करण्याचं एक शास्त्र असतं, ते वाचा.

बटाटावडय़ाचा ‘पचका वडा’ होतो? मग उत्तम बटाटेवडे करण्याचं एक शास्त्र असतं, ते वाचा.

ठळक मुद्देबटाटावडा आवडतोच, तर तो उत्तमही जमायला हवा.

-सखी ऑनलाइन टीम

बटाटेवडे, भजी हे पदार्थ कुणाला आवडत नाहीत? मात्र अनेकदा वाटतं की घरी बाहेरसारखे खुसखुशीत बटाटेवडे होत नाहीत. बटाटाभजीही छान टप्पोरी, हलकी, होत नाहीत. एकतर दडस होतात नाहीतर मऊ. तर हे असं का होत असेल? बटाटेवडय़ाचा असा ‘पचका वडा’ होऊ नये म्हणून काय करता येईल?  खुसखुशीतपणा, प्रमाणशीर जाडीचं आवरण हे उत्तम बटाटेवडे आणि भजींचं मुख्य लक्षण आहे.  पण  अनेकदा नेमकं  हेच जमत नाही. कधी वडय़ांचं आवरण मऊ होतं तर कधी खुसखुशीत नसतं. तर  काही ठिकाणी ते इतकं जाड असतं की आतर्पयत शिजलेलंच नसतं आणि वडा खाताना  याची नुसती पिठुळ चव लागते. वडय़ाचं सारण महत्त्वाचं असतंच पण आवरणही तितकंच महत्वाचं असतं.
भज्यांची परिस्थिती अशीच असते. आपण घरी वांगी, बटाटे, केळी यांची भजी करतो तेव्हाही आवरण मऊ तरी पडतं, पिठुळ तरी होतं नाही तर इतकं पातळ होतं की त्याची चवच लागत नाही.  भजी आणि वडे यांच्यासाठी पीठ भिजवताना आणि तळताना काही गोष्टींची पथ्यं पाळली तर आपल्या हातचे बटाटेवडे आणि भजी आपलीच नजर लागावी इतके खुसखुशीत  खमंग आणि सोनेरी रंगाची होतात. 
ते तसे व्हायचे तर या काही गोष्टी करुन पहा. मुळात या तळणाचं शास्त्र समजून घ्या, ते समजलं की जमलाच वडा!  

भजी आणि वडे करताना चुकतं कुठे?


*  भजी किंवा बटाटेवडे करताना डाळीचं पीठ भिजवताना त्यात पाणी जास्त झालं तर पीठ पातळ होऊन वडय़ांवर पातळ थर येतो. डाळीच्या पिठात प्रथिनं असतात जी अमिनो आम्लांची बनलेली असतात आणि काबरेहायड्रेटस असतात ज्याचे रेणु हे ग्लुकोजच्या रेणुंचे बनलेले असतात. आपण उच्च तापमानाला बटाटेवडा तेलात तळण्यासाठी सोडतो तेव्हा अमिनो आम्लं आणि साखर यांची रासायनिक अभिक्रिया होऊन खमंग वासाचे रेणु हवेत सोडले जातात आणि वडय़ाला सोनेरी रंग येतो. या अभिक्रियेला  ‘मायलार रिअ‍ॅक्शन’ असं म्हणतात. पातळ पिठात पीठ कमी आणि पाणी जास्त झाल्यानं सोनेरी रंग येण्यासाठी लागणारी अमिनो अ‍ॅसिड्स आणि साखर हे घटक कमी पडतात. त्यामुळे वडय़ाला सोनेरी रंग येत नाही आणि नुसतं सारण खाल्यासारखं वाटतं.


* पिठामध्ये पाणी कमी झाल्यास भजी, वडय़ांवरचा पिठाचा थर जाड होतो. अशा वडय़ांना, भज्यांना उत्तम सोनेरी रंग येतो, पण पिठाचा थर जाड असल्यानं पिठामधील पाण्याची वाफ तेलाला आत शिरू देत नाही. त्यामुळे वडे कुरकुरीत, खुसखुशीत होत नाहीत. कित्येक वेळा पीठ आतर्पयत शिजलेलं नसतं.


* आपण पीठात तेलाचं मोहन घालतो की सोडा यावरही बरंच काही अवलंबून असतं. वडे/भज्यांच्या पिठातं थोडं गरम तेल (मोहन) घातल्यास उच्च तापमानामुळे ते पिठात आतर्पयत शिरू शकतं. त्यामुळे  पिठाचे कण चिकटून न राहता थोडे सुटे सुटे होतात. पिठाला येणारा चिवटपणा जातो. त्याचं पृष्ठभागीय क्षेत्रफळ वाढतं. अशा आवरणात तेल लवकर आत शिरू शकतं आणि त्यामुळे बाहेरचं आवरण कुरकुरीत व्हायला मदत होते. 
पिठामध्ये फक्त बेकिंग सोडा घातल्यास उच्च तापमानाला कार्बन डाय ऑक्साइड तयार होऊन आवरण फुगतं. ज्या छिद्रांमधून वायू बाहेर येतो त्यातून तेल भराभर आत शिरतं. वडे कुरकुरीत होतात पण ते तेलही पितात. थोडय़ा वेळानंतर फुगलेल्या आवरणात शोषल्या गेलेल्या वाफेनं आवरण मऊ पडतं.


*  उत्तम पीठ भिजवायचं तर  एक मध्यम वाटी भरून घेतलेल्या पिठात त्याच वाटीनं एक वाटी पाणी, 1 चमचा गरम तेल  आणि चिमूटभर सोडा घातल्यास आवरण कुरकुरीत, सोनेरी, बेताचं जाड होतं आणि वडे,/भजी तेलकट होत नाही.


*  कमी तापमानाच्या तेलात वडे तळले गेले तर आतल्या वाफेचा दाब कमी असल्यानं ती बाहेर येते आणि त्यामुळे खूप तेल आत शिरतं म्हणजेच वडे तेल पितात. भज्यांच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. म्हणूनच व्यवस्थित गरम झालेल्या तेलातच भजी आणि वडे तळावेत. 

Web Title: how to make delicious traditional Batata vada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.