Home and House: - What's the difference? | होम आणि हाऊस :- काय फरक आहे यात?
होम आणि हाऊस :- काय फरक आहे यात?

 
-   शुभांगी जगताप गबाले

  उब देणारं, सावली धरणारं हक्काचं घर एकदा सुटलं की पुढे फक्त निवारा मिळत जातो. आसर्‍याची सोय करणारा निवारा. कसलंही जोडलेपण हाताशी न लागू देणा-या अनोळखी मुलखात अपार पोरकं वाटायला लावणारा हा निवारा.  नव्या जगातल्या नव्या रीतींसोबत नवनव्या तडजोडी केवळ शिकवत राहतो. घरदार गमावून बसलेले निर्वासित मग आपलं मागे राहिलेलं जग उराशी घट्ट धरून ठेवत या निवा-यामध्येच तात्पुरतं घरपण शोधत राहतात. 
असायलम क्लेम स्वीकारला गेला की निर्वासितांना तिथल्या सरकारतर्फे रितसर सवलती मिळू लागतात. केवळ युकेबाबत बोलायचं तर त्यामध्ये घर वा राहण्याची व्यवस्था ही प्रमुख सवलत असते; जी रेफ्युजी व्यक्तीची मुख्य निकड असते.  शेअरिंग वा सेपरेट हाऊस, फ्लॅट, होस्टेल अथवा बेड नि ब्रेकफास्ट अशा कोणत्याही स्वरूपात ही सोय केली जाते. हे घर कुठल्या भागात, कशा पद्धतीचं, किती दिवसांकरता असा कोणताही चॉइस या लोकांना अर्थातच नसतो. यात दडलेल्या अनेक किचकट गुंतावळी हाताळण्याकरता होम ऑफिसनं त्या त्या ठिकाणचा एक मॅनेजर नियुक्त केलेला असतो. होम ऑफिस अन निर्वासितांमधील तोच मुख्य दुवा असतो. 
 घर  हा तसंही निर्वासितपण भोगणार्‍यांच्या मनातला एक हळवा, दुखरा, खदखदणारा कोपरा. जीवाच्या भीतीनं सोडावं लागलेलं घर, मायेच्या माणसांना घेऊन मागे उरलेलं घर, हल्ल्यात जमीनदोस्त झालेलं घर, जुलूम-जबरदस्तीनं जिथून घालवून दिलं गेलं ते घर, असह्य भवतालाचा सामना करत उभं असलेलं घर. आपापल्या घराच्या पडझडीची अशी  कैक हताश स्वगतं मागे टाकत रेफ्युजी माणूस हद्दींच्या आतबाहेर वाटेल त्या तजविजी स्वीकारत, मिळेल त्या निवार्‍याशी जुळवून घेत राहतो. 
निव्वळ बहाई अस्मितेपायी सौदी अरेबिया कायमचं सोडावं लागलेलं एक इराणी जोडपं दोनेक वर्षांपूर्वी इथं युकेला आलं अन रेफ्युजी स्टेटस त्यांना तत्काळ मिळूनही गेलं. त्यांच्या घरी मैत्रीपोटी होत राहणारं खाणंपिणं, गप्पागोष्टी म्हणजे त्यांची खास पर्शियन तहजीब भरभरून अनुभवत रहाणंच असतं केव्हाही. 
वयाची पन्नाशी पार होईस्तोवर सौदी अरेबियातल्या मातीशी एकजीव झालेलं आयुष्य अचानक गुंडाळून तिथून निघावं लागलं याचा धक्का हे जोडपं अजूनही  पुरतं पचवू शकलेलं नाही. जबरदस्तीनं विकावं लागलेलं अरेबिक भूमीतलं झाडाझुडपांनी लगडलेलं आपलं तीन मजली घर त्यांना काही करता विसरताच येत नाही. ही मैत्रीण आपल्या त्या घराच्या, भोवताली तिनं जीव लावून वाढवलेल्या झाडांबद्दलच्या, आसपासच्या रस्त्यांच्या आठवणी पुन्हा पुन्हा सांगत राहते.  ‘कष्टानं व्यवसाय वाढवत, एक एक पैसा जोडत आम्ही ते घर बांधलं होतं. संसाराच्या, मुलं मोठी होतानाच्या असंख्य आठवणी त्या घराशी जुळलेल्या आहेत. ते घर विकावं लागणार, इथून कायमचं जावं लागणार हे जेव्हा समजलं तेव्हा झालेली तगमग आजही संपलेली नाही तशी. कित्येक रात्नी आम्ही झोपलोच नाही त्या ताणात. दोघानांही ब्लड प्रेशरचा आजार याच ताणातून उद्भवला.’   घर हातातून निसटताना झालेली तडफड आजही या मैत्रीणीच्या डोळ्यात बोलताबोलता साकळून येते. 
  ‘इथे युकेला येऊन असायलम क्लेम केल्यानंतर मधल्या प्रोसेसिंगच्या, स्टेटसची वाट बघण्याच्या काळात होम ऑफिसकडून जे घर मिळालं ते अर्थातच अगदी लहान अन अजिबात मेण्टेन नसलेलं. रंग उडालेलं, कार्पेट खराब असलेलं, सिंक चोक झालेलं ते घर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खूप अस्वस्थ झालो होतो . अशा घरात राहाण्याची वेळ आपल्यावर येईल असं चुकूनही मनात आलं नव्हतं कधी. हे घर पाहून सौदीतल्या आमच्या घराची आठवण अजूनच तीव्र व्हायची. पण या देशानं निदान डोक्यावर छप्पर दिलं हे काय कमी आहे. त्यामुळे आता या नव्या जगण्याशी तडजोड करण्याशिवाय पर्यायच नाही आमच्याकडे. कितीही भयंकर समस्या येवोत आयुष्यात पण स्वत:चं घर गमावण्याची वेळ कुणावर येऊ नये. स्टेटस मिळाल्यावर मात्न काहीसं जास्ती भाडं असलेलं, चांगल्या स्थितीतलं अन भागातलं घर आम्ही निवडलं.’  अर्थात, पर्शिअन टच देऊन कमालीचं देखण करून टाकलेल्या या युकेतल्या घरात अजूनही हे जोडपं मनापासून रमलेलंच नाही खरंतर. 
अशीच एक इराकची मैत्रीण तिच्या घराबद्दल अगदी हळवेपणानं बोलत असते. तिच्या देशातल्या लोकांच्या मानवी हक्कांसाठी लढणारी, तिथल्या बायांच्या प्रश्नांवर तळमळीनं बोलणारी ही मैत्रीण याच कारणांपायी गेली सहा-सात वर्ष झाली इथं एक्साईलमध्ये जगतीये. तिसेक वर्षांपूर्वी पेटलेल्या इराक-इराण युद्धात पडझड सोसलेलं तिचं घर, त्या दिवसात सुकून-जळून गेलेली त्याभोवतीची गच्च हिरवी बाग हे सारं तिच्या आठवणीत अजूनही ताजं आहे. वडील चित्रकार. कायम कॅनव्हास रंगवत राहणारे.  त्यामुळे त्यांनी चितारलेली चित्रं घरभर भिंतीवर कुठे कुठे टांगलेली आहेत जी तिच्या घराविषयीच्या आठवणींशी  घट्ट जोडलेली आहेत.  ‘सात वर्ष होऊन गेली मी माझं घर पाहिलं नाहीये. माझ्या कुटुंबाला भेटले नाहीये. त्या आठवणीत मी रडून घेते कितीदातरी. एक्साईलमध्ये जगणं म्हणजे फक्त अस्थिरता भोगत जगणं आहे. एका जागेतून दुस-या जागी होम ऑफिसच्या र्मजीनुसार तुम्हाला तुमचं सामान घेऊन फिरावं लागतं. त्यांच्या एका लेटरसरशी जिथे असाल तिथून निघावं लागतं. सहा वर्षात चार-पाच वेळा मला घर, शहर बदलायला सांगितलं गेलं. अर्थात ही घरं म्हणजे होस्टेलवजा शेअरिंग हाऊसेस. चार-पाच जणांना एकत्रित रहायला दिलेली. जेमतेम आडवं व्हायला जागा असलेली. वेगळ्या देश-संस्कृतीच्या अनोळखी व्यक्तींसोबत रहावं लागणं सोप नाही. तो एक निराळाच झगडा असतो. कुठे किती काळ रहावं लागणार माहीत नसतं. ही अनिश्चितता असह्य होते अनेकदा. सतत बदलाव्या लागणा-या  या जागा घरासारख्या असतात केवळ, घर नाही.’  होम आणि हाऊस या शब्दातल्या फरकाची बारीक रेघ ही मैत्रीण बोलताबोलता अशी ठळक करून ठेवते.

(उर्वरित भाग पुढच्या पंधरवाड्यात)

( लेखिका इंग्लंडमध्ये वास्तव्याला असून निर्वासितांसाठीसाठी काम करणार्‍या संस्थेशी संलग्न आहेत. ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिध्द होईल) 

shubhangip.2087@gmail.com


 

Web Title: Home and House: - What's the difference?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.