दिवसभर उत्साही राहण्यासाठी आपल्याला दिवसाची सुरुवात निरोगी आहाराने करणे खूप महत्वाचे आहे. योग्य आहार आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. याने दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. मन आणि शरीर संतुलित राहते. मात्र, त्या आहारात ड्रायफ्रूट्सचा समावेश असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्याला अनेक आहार तज्ज्ञांद्वारे ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्लाही दिला जातो. परंतु, हे ड्रायफ्रूट्स कशा पद्धतीने खायचे याची माहिती आपल्याला नसते.
यासंदर्भात पोषणतज्ज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की, "ड्रायफ्रूट्स हे पोषक तत्वांचे पॉवर हाऊस आहे. याचे सेवन प्रत्येक ऋतूत करावे. ड्रायफ्रुट्सचे नियमित सेवन केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते. भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाणे अधिक फायदेशीर आहे, कारण आपल्या आरोग्यासाठी अनेक पौष्टिक घटक देतात. भिजवलेले ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने त्यातील फायटिक ऍसिडचे प्रमाण कमी होते आणि ते पचायला सोपे होते. पिस्ते, काजू, खजूर त्यांच्या मूळ स्वरूपात खाणे कधीही चांगले. पण मनुका, बदाम यांसारखे ड्रायफ्रूट्स भिजवून खाऊ शकतात."
भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाण्याचे फायदे
आपण अनेकदा भिजवलेले बदाम खातो. बदामाच्या सालीमध्ये टॅनिन असते जे पोषक तत्वांचे शोषण रोखते. भिजवून खाल्ल्यास त्याची साल वेगळी होते. त्यामुळे बदाम भिजवलेले खावे असा सल्ला दिला जातो.
मनुके सहसा थेट खाल्ले जातात, परंतु जर तुम्ही ते भिजवून खाल्ले तर त्यात असलेले हानिकारक प्रिझर्वेटिव्ह निघून जातात आणि तुमच्या आरोग्याला त्रास होत नाही.
अक्रोड आणि बदाम हे उष्ण असतात. त्यामुळे उन्हाळ्यात नुकसान होऊ शकते. पाण्यात भिजवल्याने त्याची उष्णता पाण्यात विरघळते.
अनेक ड्रायफ्रूट्स काही दिवस भिजवून ठेवल्यास त्यांना अंकुर फुटू लागतात, त्यामुळे या गोष्टींचे पोषणमूल्य वाढते.