Constipation remedy: थंडीला सुरूवात झाली की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही डोकं वर काढतात. या दिवसांमध्ये इम्यूनिटी कमजोर होते. अशात वायरल इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. त्यासोबतच पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. कारण पचनक्रिया कमजोर होते. बऱ्याच लोकांना या दिवसात बद्धकोष्ठतेची म्हणजे पोट साफ न होण्याची समस्याही होते. काहीही खाल्लं तरी पोट फुगलेलं राहतं. बद्धकोष्ठतेची समस्या झाली तर ना काही खाण्याचं मन होत ना काही काम करण्याचं. तुम्हाला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर आज आम्ही तुम्हाला एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहोत.
हिवाळ्यात बद्धकोष्ठतेची समस्या होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे या दिवसांमध्ये पुरेसं पाणी न पिणे. त्याशिवाय कोणतीही फिजिकल अॅक्टिविटी न करणे हे सुद्धा या समस्येचं एक मोठं कारण आहे. जर आहारात फायबर कमी, तेलकट, मसालेदार पदार्थांचं अधिक सेवन, तणाव, गर्भावस्था, काही औषधांचं सेवन करत असाल तेव्हाही बद्धकोष्ठतेची समस्या होते.
राजस्थानचे आयुर्वेदिक वैद्य जगदीश सुमन यांच्यानुसार, बद्धकोष्ठतेची समस्या कुणालाही होऊ शकते. ही समस्या दूर करण्यासाठी एक सोपा आयुर्वेदिक उपाय आहे. ज्यासाठी तुम्हाला 100 ग्रॅम गुलकंद, 100 ग्रॅम छोटे बादाम आणि 100 ग्रॅम बडीशेपची गरज भासेल. यापासून बनवलेल्या पावडरने तुमची पोट साफ न होण्याची समस्या सहजपणे दूर होऊ शकते.
कसं तयार कराल पावडर?
गुलकंद, बदाम आणि बडीशेप बारीक करून पावडर तयार करा. बडीशेप पावडर बनवण्याआधी थोडी भाजून घ्याल. हे पावडर एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवा.
कसा कराल वापर?
हे पावडर रोज सकाळी खावं. वयस्क लोकांनी दोन चमचे पावडर खाणं पुरेसं आहे. तर लहान मुलांना केवळ अर्धा चमचा पावडर द्यावे. हे पावडर कोणत्याही वयाच्या व्यक्तीला दिलं जाऊ शकतं. फक्त वयानुसार याचं प्रमाण कमी जास्त राहतं.
बद्धकोष्ठता दूर करण्याचे इतर उपाय
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा, फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, पपई, पेरू, ब्रोकली, ओट्सचं सेवन करा. दिवसभर भरपूर पाणी प्या. रोज थोडा वेळ व्यायाम करा किंवा पायी चला. या गोष्टींनी ही समस्या दूर होण्यास मदत मिळेल.