डॉ. किशोर अतनूरकर (स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि समुपदेशक)
लग्नाच्या वेळी मुलीचं वय किमान १८ वर्ष असायला हवं, असा आपल्या देशात कायदा असला, तरी आजही ग्रामीण भागात १८ वर्षांपेक्षा कमी वयात मुलींची लग्नं होत असतात. कमी वयात लग्न करू नये; पण झालंच, तर ठीक आहे; निदान गर्भधारणेची तरी घाई करू नये, हेदेखील त्या जोडप्यांना कळत नाही. कसलं गर्भधारणापूर्व समुपदेशन अन् कसलं काय! पुढचा मागचा विचार न करता त्या जोडप्यांचं लैंगिक जीवन सुरू होतं. बऱ्याचदा लग्नानंतर काही महिन्यांतच गर्भ राहतो. समजा नाही राहिला, तर मुलीचे आई-वडील, ‘लग्न होऊन सहा महिने झाले; अजून गर्भधारणा का राहात नाही. काहीतरी इलाज करा’, असं म्हणत मुलीला डॉक्टरकडे घेऊन येतात, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, वयाच्या १५ ते १९ वर्ष या कालावधीत मुलीला गर्भधारणा राहिल्यास ती जोखमीची ठरू शकते.
गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं?
वयाच्या २० ते ३० या वर्षांत स्त्रियांनी गर्भ राहू दिल्यास फार उत्तम. जसजसं वय ३० वर्षांपेक्षा जास्त वाढतं, तसतशी गर्भधारणेच्या बाबतीत आईची आणि बाळाची जोखीम वाढते. वयाच्या ३५ ते ४० या वर्षांत ती जोखीम सर्वाधिक असते, याचं भान ठेवत असताना आपल्या करिअरला महत्त्व देणाऱ्या मुलींचा कोणत्या गोष्टीला प्राथमिकता द्यावी, याबद्दल गोंधळ उडू शकतो. या गोष्टींमध्ये वाढणारं वय, करिअरमध्ये मिळणारी संधी, आर्थिक स्वावलंबन, मूलबाळ होण्याची आस यांचा समावेश होतो. ३५ ते ४० वर्ष या वयोगटातील गर्भधारणेसाठी इच्छुक असणाऱ्या महिलांना तंत्रज्ञानाची मदत (उदाहरणार्थ, टेस्ट ट्यूब बेबी किंवा अन्य) घ्यावी लागण्याची शक्यता जास्त असते.
मात्र, यासोबतच हे ही खरे की, निसर्गाचे सर्व नियम मानवातील गर्भधारणा आणि अपत्यजन्माच्या प्रक्रियेलाही लागू होतात. गर्भाची वाढ, आईची प्रकृती या आघाड्यांवर सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानकपणे काही गुंतागुंत होऊन, आईच्या किंवा बाळाच्या प्रकृतीचं नुकसान होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. हा निसर्गनियम मान्य करूनदेखील, नऊ महिन्यांच्या तपश्चर्येचा शेवट चांगला व्हावा, याकरिता गर्भधारणेपूर्वीचं समुपदेशन महत्त्वाचं असतं, हे जोडप्यांना समजणं आवश्यक आहे.
यामागची कल्पना अशी आहे की, गर्भधारणेसाठी इच्छुक आणि उत्सुक असलेल्या महिलेचं आरोग्य गर्भधारणेसाठी अनुकूल आहे किंवा नाही, याची तपासणी होऊन, ते अनुकूल नसल्यास योग्य ते उपचार केल्यानंतरच ‘चान्स’ घेण्याचं भान लोकांना असलं पाहिजे.
(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. MD OBGY, Ph D. Social Sciences, MS counseling & Psychotherapy)
atnurkarkishore@gmail.com
Mob : 9823125637