Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळ सतत दूध मागतं, रडतं आणि आई आजारी, स्तनपान करणाऱ्या आईची काळजी कोण घेणार?

बाळ सतत दूध मागतं, रडतं आणि आई आजारी, स्तनपान करणाऱ्या आईची काळजी कोण घेणार?

World Breastfeeding Week 2025: जागतिक स्तनपान सप्ताह विशेष ५ : बाळासाठी घरातल्या सर्वांनीच एक टीम होऊन राहावं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2025 13:38 IST2025-08-06T13:36:11+5:302025-08-06T13:38:05+5:30

World Breastfeeding Week 2025: जागतिक स्तनपान सप्ताह विशेष ५ : बाळासाठी घरातल्या सर्वांनीच एक टीम होऊन राहावं!

World Breastfeeding Week 2025: tired mother and breastfeeding problems, how to deal it? | बाळ सतत दूध मागतं, रडतं आणि आई आजारी, स्तनपान करणाऱ्या आईची काळजी कोण घेणार?

बाळ सतत दूध मागतं, रडतं आणि आई आजारी, स्तनपान करणाऱ्या आईची काळजी कोण घेणार?

Highlights बाळ मुख्यत्वे वरचा आहार घेत असेल तरी त्याच्या प्रथिने, कॅल्शियम, ‘व्हिटॅमिन ए’, ‘बी १२’, ‘व्हिटॅमिन सी’ आणि मुख्य म्हणजे रोगप्रतिकारशक्तीच्या गरजांसाठी बाळ आईच्या दुधावर अवलंबून असतं.

ओजस सु. वि. (स्तनपान सल्लागार)

काही महिन्यांपूर्वी एक चुणचुणीत पंचविशीतली आई तिच्या सोळा-सतरा महिन्यांच्या मुलीसह क्लिनिकवर आली. मुलगी वयाच्या मानाने ठीकठाक होती; पण आई मात्र दिसायला सडपातळ, गाल आत गेलेले, डोळे खोल गेलेले, थकलेली, अशक्त.
ती म्हणाली, मला डॉक्टरांनी स्तनपान बंद करायला सांगितलंय, काय करू?
खरंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार बाळाला सुरुवातीचे सहा महिने फक्त आईचं दूध पाजावं. सहा महिने ते एक वर्षापर्यंत बाळ हळूहळू वरचं खात असेल तरी आईचं दूध हाच बाळसाठी मुख्य आहार असतो. त्यानंतर बाळ मुख्यत्वे वरचा आहार घेत असेल तरी त्याच्या प्रथिने, कॅल्शियम, ‘व्हिटॅमिन ए’, ‘बी १२’, ‘व्हिटॅमिन सी’ आणि मुख्य म्हणजे रोगप्रतिकारशक्तीच्या गरजांसाठी बाळ आईच्या दुधावर अवलंबून असतं. त्यामुळे किमान दोन वर्षांपर्यंत स्तनपान करावं. त्यानंतर हळूहळू स्तनपान बंद करावं, अशी शिफारस आहे.


बायोकेमिकली विचार करता आईचं दूधही बाळासोबत वाढत असतं. एक वर्षानंतर बहुतांश बाळं वरचं अन्न व्यवस्थित पचवू शकतात; पण त्या काळात येणाऱ्या दुधात बाळाच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी, मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त आणि गरजेची अशी जैवरसायने असतात. जी नवनवीन ठिकाणी जाणाऱ्या, नवीन गोष्टी शिकणाऱ्या बाळांना गरजेची असतात. विशेषत: आपल्यासारख्या स्वछतेच्या बाबतीत, प्रदूषणाच्या बाबतीत आव्हानात्मक देशात बाळांना २-३ वर्षांपर्यंत ॲलर्जी, दमा, डायरिया अशा आजारांपासून वाचवण्याचं काम स्तनपान करते.
या पार्श्वभूमीवर मी त्या आईला विचारलं, “का बंद करायला सांगितलं आहे स्तनपान?”
तिने सांगितलं, “मला अधूनमधून चक्कर येते. बीपी खूप कमी होतं. बाळ सतत दूध मागतं. शक्ती पुरत नाही.”

 

असं का होतं?

स्तनपान करत असलेल्या आईचं आरोग्यही अतिशय महत्त्वाचं. बोलण्यातून लक्षात आलं की, तिचं हिमोग्लोबिनही खूप कमी आहे. मी तिचा दिनक्रम आणि आहार विचारला. ते ऐकून मलाच चक्कर आली! ती पहाटे साडेपाचला उठून तिच्या नवऱ्याचा डबा करून त्यांना गरम नाश्ता देते. मग सात वर्षांच्या मुलाला उठवून त्याला तयार करून अंघोळ घालून, डबा तयार करून ‘स्कूल बस’ला सोडते. मग घरातली भांडी घासून, घर झाडून-पुसून, कपडे धुऊन, बाळाचे करून, स्वतःची अंघोळ- देवपूजा करून मगच जेवते. पहिला घास खायला दुपारचा एक तरी वाजतो. तोपर्यंत छोटीने तीन- चार वेळा तरी दूध मागितलेलं असतं. तिचा वरचा आहारही असतोच. दिवसभर ती कामातच असते. एक मिनीट फुरसत नाही. आहारही नीट नाही. बराच काळ वरण-पोळीचा कालाच खाल्लेला. त्यातून मी पैसे कमवत नाही म्हणजे ‘काहीच करत नाही’ असा अपराधभाव! खरंतर माझ्या मते, ती कमी ऊर्जेत अफाट काम करणारी अनेक हातांची मल्टीटास्कर ‘सुपरमॉम’च होती!
या दिनचर्येमध्ये बाळ ‘सततच’ दूध मागतं, अशी तिची तक्रार होती.
असं बऱ्याचदा झाल्याने अनेक ‘सुपरमॉम’ गंभीर आजारी पडून सलाइनवर जातात, हे मी हॉस्पिटल्समधे पाहिलं आहे.

 

आईची अशी स्थिती झाली की, लगेच त्याचं खापर दूध पिणाऱ्या मुलांवर फोडलं जातं; पण बाळाचं दूध लवकर थांबवलं की, बाळाच्या मानसिकतेवर, मेंदू विकासावर, रोगप्रतिकारशक्तीवर दुष्परिणाम होतो. खरंतर आई बाळाला दूध देते तेव्हा तेच एक मोठं काम करत असते- एक माणूस घडवण्याचं.
याचा अर्थ आईला आजारी पडू द्यायचं का? तर मुळीच नाही. आईच्या या आजाराचे औषध घरातच सापडते. परिवारातल्या सदस्यांनी तिला मदत केली, कुणी मदतनीस मदतीला घेतली तर तिला फुरसत, आराम मिळेल. वेळच्या वेळी जेवता येईल.
घरात फक्त एकच काम असं की, ते ‘ती’च करू शकते, अन्य कोणीच करू शकत नाही. ते एकच काम म्हणजे बाळाला दूध पाजणे. आणि बाळासोबत वेळ घालवणे!
स्वत:ची काळजी घेत बाळाला सुयोग्य स्तनपान करणं शक्य आहे; पण ते एका व्यक्तीचं काम नाही. संपूर्ण परिवारानेच यासाठी एक टीम बनलं पाहिजे. आईला पुरेशी विश्रांती आणि पोषण मिळेल, याची खात्री केली पाहिजे.
आपल्या आरोग्याची हेळसांड करत सर्वांच्या (स्वतःच्याही!) अवास्तव अपेक्षा पुरवून ‘सुपरमॉम’ होता येत नाही. तर त्या-त्या टप्प्यातले प्राधान्यक्रम ठरवून त्यावर ठाम राहात स्वतःला आणि सर्वांना प्रेम आणि सन्मान देत काळजी घेणारी आई नक्कीच ‘सुपर वूमन’ असते.

बाळ सतत दूध का मागते?
१. एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याला आईचा वेळ हवा असतो. ‘केवळ दूध पितानाच आईचे पूर्ण लक्ष मला मिळते’ किंवा ‘आई माझ्यासोबत बसते’ हे बाळाला कळत असते. मग ते जेवण नाकारते, झोपेत भूक लागून रात्रभर दूध मागत आईला जागे ठेवते.
२. एक वर्षानंतर ‘आधी जेवण, मगच स्तनपान’ हे धोरण अवलंबून, स्तनपानाच्या ठराविक (दोन-तीन) वेळा ठरवून त्यावर आईला ठाम राहावे लागते. बाळाशी खेळत, गप्पा मारत, त्याला कुरवाळून त्याच्या सोबत राहिल्यास बाळ रमते आणि त्याचा हट्टीपणा, कांगावा कमी होतो. बाकीच्या वाढी आणि विकासातही फायदा होतो.
३. मला भेटलेली ही आई सर्वांसाठी प्रेमाने झिजत होती, आपली प्रत्येक चोख भूमिका बजावत होती, सर्वांकडे लक्ष देत होती- फक्त एका व्यक्तीकडे ती दुर्लक्ष करत होती- तिच्या स्वत:कडे. तिच्या आहारात काही सोपे बदल सुचवले. काम करता करता तोंडात टाकता येईल असे पदार्थ कधी खायचे, ते लिहून दिले. छोट्या विश्रांतीच्या वेळा सुचवल्या. बाळासोबत खेळत वेळ घालवणं; कुशीत घेऊन झोपणं, हे बाळाच्या बौद्धिक आणि मानसिक वाढीसाठी किती गरजेचं आहे, हे बोललो. प्रश्न असा सुटू शकतो.

लक्षात ठेवा ३ गोष्टी
१. दुर्लक्ष करू नका स्तनाग्रात किंवा स्तनात वेदना, आईची पाठ व कंबर दुखणे,आईला स्तनात गाठी किंवा संसर्ग होत आहे. ताप येत असेल तर डॉक्टरांकडे जा.
२. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आईला थकवा येतो. निराश वाटते. रडू येते, वजन झपाट्याने कमी होते. आईचे आरोग्य खालावते. दुर्लक्ष करू नक
३. दूध कमी किंवा जास्त. आईला दूध कमी किंवा अजिबात येत नाही. बाळ पुन्हापुन्हा दूध मागते. आईला कामावर रुजू व्हायचे आहे. तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

https://www.instagram.com/themilkyway_ojas/

http://linktr.ee/ojas.sv.lc

contact: 94035 79416

 

Web Title: World Breastfeeding Week 2025: tired mother and breastfeeding problems, how to deal it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.