Lokmat Sakhi >Health >Pregnancy > स्तनपान करताना छातीत गाठी झाल्या-ताप आला-सतत रडू येतं? आईचं आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांची मदत घ्या..

स्तनपान करताना छातीत गाठी झाल्या-ताप आला-सतत रडू येतं? आईचं आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांची मदत घ्या..

World Breastfeeding Week 2025: जागतिक स्तनपान सप्ताह विशेष ६ : बाळाला दूध पाजताना आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 17:06 IST2025-08-07T17:05:41+5:302025-08-07T17:06:42+5:30

World Breastfeeding Week 2025: जागतिक स्तनपान सप्ताह विशेष ६ : बाळाला दूध पाजताना आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

World Breastfeeding Week 2025: how take care of breastfeeding mothers health, what are the problems | स्तनपान करताना छातीत गाठी झाल्या-ताप आला-सतत रडू येतं? आईचं आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांची मदत घ्या..

स्तनपान करताना छातीत गाठी झाल्या-ताप आला-सतत रडू येतं? आईचं आरोग्य धोक्यात, तज्ज्ञांची मदत घ्या..

Highlightsस्तनपान सल्लागारांना संपर्क करून आपले प्रश्न समजून घेऊन थोड्या उपचाराने स्तनपान सुरुळीत करता येते.

ओजस सु. वि. (स्तनपान सल्लागार)

बाळ जन्मल्यानंतर ते पुरेसे मोठे होईपर्यंत स्तनपान करणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्तनपानाचा प्रवास आई आणि बाळासाठी आनंददायी असायला हवी. जर स्तनपानाच्या प्रवासामध्ये आई किंवा बाळाला ताण येत असेल तर त्याचा स्वीकार करून त्यावर उपचार करायला हवा. आईने या प्रक्रियेतील शारीरिक किंवा मानसिक दुखणे अंगावर काढले तर त्याचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि नात्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो.  स्तनपान देणाऱ्या आईने आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. 

 

स्तनपान करताना आईला काय त्रास होऊ शकतात?

१. स्तनपान करताना आईला स्तनाग्रात किंवा स्तनात वेदना होतात. 
“स्तनपान करताना दुखतेच” असा काहींचा गैरसमज असतो. स्तनाग्रात दुखणे याचा अर्थ बाळाची स्तनावरची पकड योग्य नाही. आणि बाळ पुरेसे दूध ओढत नाहीये. त्यामुळे आई आणि बाळाला दोघांनाही त्याचा तोटाच आहे. दुखल्यामुळे आईला स्तनपान नकोसे वाटते. या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नये. हे दुखणे वाढू शकते. काहीवेळा स्तनात जंतूसंसर्गही होऊ शकतो. स्तनपान सल्लागारांकडून या दुखण्यामागची कारणे समजून घेऊन, त्यावर उपचार केल्यास स्तनपान आनंददायी होऊ शकते. 

२. आईची पाठ व कंबर दुखणे. 
 दूध पाजताना चुकीच्या पद्धतीने बसल्यास आईला पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होतो. यामुळे स्तनपान करणे नकोसे वाटते. हा त्रास पुढे अनेक काळ राहू शकतो. स्तनपान करताना पाठीला आधार घेऊन बसायला हवे. स्तनपान करण्याच्या सुरक्षित बैठक व्यवस्था (ब्रेस्टफिडिंग पोजिशन्स) शिकून घेऊन आपल्याला साजेशी पद्धती निवडायला हवी. यासाठी स्तनपान सल्लागार मदत करू शकतात. 


  
३. आईला स्तनात गाठी किंवा संसर्ग 
 स्तन लाल दिसत आहे. ताप येत आहे.- हे स्तनदाह किंवा स्तनात जंतुसंसर्ग झाल्याचे लक्षण असू शकते. तत्काळ डॉक्टरकडे जावे. व स्तनपान सल्लागारांना संपर्क साधावा. स्तनदाह किंवा स्तनात जंतुसंसर्ग झालेला असताना औषधोपचार चालू ठेवून स्तनपान करत राहणे सुरक्षित आणि गरजेचे आहे.  

४. आईला थकवा येतो. निराश वाटते. 
आईचे वजन झपाट्याने कमी होते. आईचे आरोग्य खालावते. 
याची अनेक कारणे असू शकतात. स्तनपान सल्लागार, डॉक्टर व समुपदेशकांच्या मदतीने आईचा आहार, आईची मानसिकता, आईवर येणारे ताण, आईचे सर्वांगीण आरोग्य यावर काम करून स्तनपानाचा प्रवास आईसाठीही समाधानकारक करता येतो.  

५. आईला अतिरिक्त दूध येते व त्यामुळे स्तन सुजतात.  
काहीवेळा आईला बाळाच्या गरजेहून खूपच जास्त दूध येते. स्तनातून दूध गळणे, स्तन सुजणे याचा त्रास होतो. अतिरिक्त दूध असणे आईसाठी त्रासाचे तर असतेच पण बाळालाही दूध पिताना ठसका लागणे, उलटी होणे असे त्रास झाल्याने बाळ स्तनपान नाकारू शकते. अतिरिक्त दुधावर उपचार करण्यासाठी आहारात बदल करणे, स्तनपानाच्या पद्धती बदलणे, असे काही उपचार गरजेचे असतात.  


 
६. आईला दूध कमी किंवा अजिबात येत नाही. बाळ पुन्हापुन्हा दूध मागते.
आईला कमी दूध येत असल्यास अनेकदा दूध वाढवणाऱ्या गोळ्या किंवा पावडरी दिल्या जातात. परंतु तेवढा उपचार पुरेसा नसतो. अनेकदा स्तनपान देण्याच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागतो. बाळ स्तनपानाची मागणी का करते आहे समजून घ्यावे लागते व त्यानुसार उपाय करावे लागतात. यासाठी स्तनपान सल्लागारांची मदत घ्यावी. 

७. आईला कामावर जायला सुरुवात करायची आहे.  
आई कामावर जायचे आहे किंवा दोन वर्षांच्या आधी आई पुन्हा गरोदर आहे, अशावेळी बाळाला स्तनपान करणे बंद केल्यास बाळाच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. आईच्या बदललेल्या भूमिकांमध्येही आई बाळाला स्तनपान करणे चालू ठेवू शकते. यासाठी स्तनपान सल्लागारच्या मदतीने योग्य ते नियोजन करता येते.  
  
८. बाळ स्तनपान नाकारते- स्तनपान करताना रडते
बाळाचे वजन पुरेसे वाढत नाही, बाळ स्तनपानापेक्षा बाटलीने दूध पिण्यास प्राधान्य देते- असे असताना स्तनपान न देण्याविषयी परस्परविरोधी सल्ले मिळतात. बाळाला पुरेसे, योग्य आणि आनंददायी स्तनपान करायचे आहे पण नक्की कसे ते कळत नाहीये- असे असताना स्तनपान सल्लागारांना संपर्क करून आपले प्रश्न समजून घेऊन थोड्या उपचाराने स्तनपान सुरुळीत करता येते.

https://www.instagram.com/themilkyway_ojas/

http://linktr.ee/ojas.sv.lc

contact: 94035 79416

 

Web Title: World Breastfeeding Week 2025: how take care of breastfeeding mothers health, what are the problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.