Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळाला सहा महिने स्तनपान करणाऱ्या आईसाठी आणि बाळासाठीही बाबानं करायला हव्याच १० गोष्टी

बाळाला सहा महिने स्तनपान करणाऱ्या आईसाठी आणि बाळासाठीही बाबानं करायला हव्याच १० गोष्टी

World Breastfeeding Week 2025 : स्तनपान सप्ताह विशेष भाग २: बाळाला दूध पाजण्यापलिकडे बाळाचा बाबा सगळं करु शकतो, बाळासाठी करणंही आवश्यक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2025 08:10 IST2025-08-02T08:01:44+5:302025-08-02T08:10:01+5:30

World Breastfeeding Week 2025 : स्तनपान सप्ताह विशेष भाग २: बाळाला दूध पाजण्यापलिकडे बाळाचा बाबा सगळं करु शकतो, बाळासाठी करणंही आवश्यक आहे.

world-breastfeeding-week-2025 father supporting breastfeeding journey, how can father support breastfeeding | बाळाला सहा महिने स्तनपान करणाऱ्या आईसाठी आणि बाळासाठीही बाबानं करायला हव्याच १० गोष्टी

बाळाला सहा महिने स्तनपान करणाऱ्या आईसाठी आणि बाळासाठीही बाबानं करायला हव्याच १० गोष्टी

Highlightsबाळाला स्तनपान देणे हे काम घरामध्ये फक्त त्याची आईच करू शकते. पण बाकी सर्व घरकाम घरातले अन्य सदस्यही करू शकतात. घरकाम, स्वयंपाक, सफाई, मोठ्या मुलांची आवराआवरी- अभ्यास ही कामे बाबाने स्वत:च्या हाती घेतली तर आईला मोकळा वेळ मिळतो.

ओजस सु.वि. (स्तनपान सल्लागार)
स्तनपान म्हणजे केवळ आईच्या दुधाने बाळाचे पोट भरणे एवढेच नाही  तर त्याला अनेक आयाम असतात- जे बाळाच्या शारीरिरक, बौद्धिक, मानसिक विकासासाठी महत्वाचे असतात. यामध्ये आई आणि बाळ महत्वाच्या भूमिकेत असतात. पण कुटुंब, परिवार आणि मुख्य म्हणजे बाळाचे बाबा हे ही सहाय्यक भूमिका बजावू शकतात.  स्तनपानाचा प्रवास आई आणि बाळाचं नातं घट्ट करतो. बाळाची आईशी जवळीक निर्माण होते. दोघांमध्ये एक विशेष बंध निर्माण होतो. यासुंदर प्रवासात बाळाचा बाबाही सहभागी होऊ शकतो. खरतर ’प्रत्यक्ष दूध पाजणे’ हे वगळता बाबा सर्वप्रकारे बाळाच्या वाढीमध्ये सहभागी होण्याचा आनंद उपभोगू शकतात.

स्तनपानातच्या प्रवासात बाबा कशाप्रकारे सामील होऊ शकतो?

 

१. बाळाला कांगारू केयर देऊन-
 छोट्या बाळाला छातीवर धरल्याचा बाळाच्या मानसिक वाढीवर, वजन वाढण्यावर चांगला परिणाम होतो. बाबा उघड्या छातीवर बाळाला धरून कांगारू केयर देऊ शकतात. विशेषत: कमी वजनाच्या व प्रीटर्म बाळांसाठी कांगारू केयर खूप फायद्याचे आहे.

२. विविध स्तनपान तंत्रे शिकून-
 बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात आईची स्थिती नाजूक असते. विशेषत: सिझेरियन झालेल्या आईला तर पहिले एक दोन दिवस आडवे झोपून राहावे लागते.  तिला वेदनाही जास्त असतात. अशावेळी आई झोपलेली असतानाही बाळाला योग्य त्या पोज़िशनमध्ये धरून स्तनपान कसे करता येईल हे बाळाच्या बाबाने प्रसूतीपूर्वीच शिकून घेणे लाभदायक असते.  

 

३. स्तनाग्रावर वेदना/ चिरलेले स्तनाग्र / स्तनदाह अशा त्रासांमध्ये वेळेवर वैद्यकीय मदत घेऊन.
स्तनपान करताना आईला स्तनाग्रात वेदना होत असतील; किंवा स्तनाग्रावर बाळाने चावल्याने चिरा पडल्या असतील तर स्तनात जंतूसंसर्ग होऊन स्तनदाह होण्याचा धोका असतो. हे आईच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. स्तनपान करताना स्तनात दुखणे नैसर्गिक नाही. तसे असल्यास बाळाच्या बाबाने पुढाकार घेऊन आईला लवकरात लवकर स्तनपान सल्लागारांकडे घेऊन जावे. गरज पडल्यास वैद्यकीय मदत घ्यावी. 

४. आईला मानसिक आधार
अनेकदा आईची मानसिक चिडचिड होते. आईला सारखे रडू येते. कदाचित ते प्रसूती नंतर येणारे नैराश्य (पोस्ट पार्टम डिप्रेशन) ही मानसिक स्थिती असू शकते. अशावेळी या स्थितीकडे दुर्लक्ष न करता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. बाबाने कोणताही संकोच न करता आईला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जावे.

५. आई स्तनपान करत असताना तिला तहान लागल्यास पाणी देऊन. 
 स्तनदा मातेने पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. विशेषत: दूध पाजत असताना आईला खूप घाम येतो आणि तहान लागते. त्यावेळी बाळाच्या बाबाने ग्लासभर थंड पाणी दिले तर आईची तहान भागतेच, तिला पुरेसे हायड्रेशन मिळण्याची शाश्वती होते; शिवाय सोबतीच्या खात्रीने मनालाही थंडावा मिळतो.

६. आईला पुरेसा आराम मिळतो याची काळजी घेऊन. 
प्रसूतीनंतर पहिले काही आठवडे इस्पितळात किंवा घरी येणाऱ्या भेटायला येणारे पाहुणे अनेकदा बाळाला आजारपण देण्याचे निमित्त होऊ शकतो तसेच सततच्या पाहुण्यांमुळे आईची विश्रांती होत नाही. अशावेळी पाहुण्यांना बाबाने भेटून, आई आणि बाळाला पुरेशी विश्रांती घेऊ द्यावी. तसेच सुरुवातीचे काही महिने बाळ छोटी छोटी झोप घेते. अशावेळी आईची झोप रात्री पूर्ण होत नाही. अशावेळी ' बाळ झोपले की आईने झोपावे' हे तत्व पाळले तर आईची विश्रांती होते आणि तिच्या दुधावरही त्याचा चांगला परिणाम होतो. सकाळच्या वेळात, दुपारच्या वेळात बाळ झोपले की आईला पुरेशी विश्रांती मिळते आहे, याची काळजी बाळाच्या बाबाने घ्यावी.

 
७. आईला थोडा वेळ बाळापासून दूर राहता येईल असा वेळ देऊन
स्तनदा माता २४-७ ऑन ड्यूटी असते. त्याचा तिच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषत: अन्यथा वर्किंग वुमन असेल, तर चोवीस तास मातृत्वचा मानसिक ताण येऊ शकतो. अशावेळी पुरेसे स्तनपान झाल्यानंतर आईला बाळापासून थोडीशी सुट्टी देऊन, बाळाला थोडा वेळ सांभाळण्याची जबाबदारी बाबाने घेऊन आईला तिच्या आवडीचे काम करण्याची मुभा द्यावी. 


८. आईला आत्मविश्वास देऊन की ती आपल्या बाळाला पुरेशी व उत्तम स्तनपान देत आहे!
 आपण बाळाला पुरे पडतोय की नाही याविषयी आईला कायम सेल्फ डाऊट असतो. अशावेळी बाबाने आईच्या पाठीवर हात ठेवून तिला आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. 


९. घरकामात हातभार लावून, ती जबाबदारी तिच्या खांद्यावरून हलकी करून...
बाळाला स्तनपान देणे हे काम घरामध्ये फक्त त्याची आईच करू शकते. पण बाकी सर्व घरकाम घरातले अन्य सदस्यही करू शकतात. घरकाम, स्वयंपाक, सफाई, मोठ्या मुलांची आवराआवरी- अभ्यास ही कामे बाबाने स्वत:च्या हाती घेतली तर आईला मोकळा वेळ मिळतो आणि छोट्या बाळाच्या वाढीवर, स्तनपानावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

१०. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – आईला स्तनपान सल्लागारांकडे नेताना, डॉक्टरांकडे औषधोपचार करत असताना, तिच्या आरोग्यविषयक कारणांमुळे आई पुरेसे स्तनपान देऊ शकत नसेल तर तिला कमी न लेखता, तिच्यावर स्तनपान करण्याचा दबाव न टाकता तिचा सन्मान राखणं. आहे त्या परिस्थितीत आपण बाळाला कशाप्रकारे स्तनपानाचे फायदे देऊ शकतो याचा प्रयत्न करणं बाबाच्या हाती आहे.

https://www.instagram.com/themilkyway_ojas/
http://linktr.ee/ojas.sv.lc

contact: 94035 79416

 

Web Title: world-breastfeeding-week-2025 father supporting breastfeeding journey, how can father support breastfeeding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.