lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > एवढ्यात बाळ नको, काही वर्षे थांबू!- हा निर्णय घेताना डॉक्टरांचा सल्ला का आवश्यक?

एवढ्यात बाळ नको, काही वर्षे थांबू!- हा निर्णय घेताना डॉक्टरांचा सल्ला का आवश्यक?

ज्या महिलांना पीसओएसचा (PCOS ) त्रास आहे किंवा थायरॉइड, स्थूलता अशा समस्या आहे त्या महिलांनी गरोदरपणासाठी खूप उशीर करु नये. कारण या समस्यांमधे गर्भ राहाण्यात अडथळे येतात. त्यामुळे उशीरा बाळ होऊ देण्याचा निर्णय घेताना आपली आणि जोडीदाराची सर्व तपासणी करुन मगच निर्णय घ्यावा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 02:20 PM2021-07-30T14:20:26+5:302021-07-30T19:03:12+5:30

ज्या महिलांना पीसओएसचा (PCOS ) त्रास आहे किंवा थायरॉइड, स्थूलता अशा समस्या आहे त्या महिलांनी गरोदरपणासाठी खूप उशीर करु नये. कारण या समस्यांमधे गर्भ राहाण्यात अडथळे येतात. त्यामुळे उशीरा बाळ होऊ देण्याचा निर्णय घेताना आपली आणि जोडीदाराची सर्व तपासणी करुन मगच निर्णय घ्यावा.

Why do you need a doctor's advice when making decision about late pregnancy? | एवढ्यात बाळ नको, काही वर्षे थांबू!- हा निर्णय घेताना डॉक्टरांचा सल्ला का आवश्यक?

एवढ्यात बाळ नको, काही वर्षे थांबू!- हा निर्णय घेताना डॉक्टरांचा सल्ला का आवश्यक?

Highlightsस्त्री जेव्हा गरोदर राहाते तेव्हा ती यासाठी मानसिकरित्या किती तयार आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. लेट प्रेगनन्सीबाबत स्त्रियांनी आपल्या फिटनेसकडेही तितकंच गांभिर्यानं पाहायला हवं. कारण स्त्री जर शारीरिकदृष्ट्या फिट असेल तर ती चांगली आई होवू शकते. निरोगी , सुदृढ आणि आनंदी गरोदरपणासाठी गरोदर राहाण्याचा निर्णय घेताना तीन महिने आधी ‘प्री कन्सेप्शन’ म्हणजे डॉक्टरांशी भेटून समुपदेशन करुन घ्यावं.

पस्तीशी, अगदी चाळीशीही उलटून गेल्यावर बाळ हवं असं वाटणं किंवा तसा निर्णय घेणं गैर नाही, मात्र काही गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. उशिरा बाळ होऊ देण्याचा निर्णय  पुरेशा आणि शास्त्रीय माहितीवर आधारित घ्यायला हवा. महत्त्वाचं म्हणजे, ज्या महिलांना पीसीओएसचा (PCOS ) त्रास आहे किंवा थायरॉइड, स्थूलता अशा समस्या आहे त्या महिलांनी गरोदरपणासाठी खूप उशीर करु नये. कारण या समस्यांमधे गर्भ राहाण्यात अडथळे येतात. त्यामुळे लवकर तिशीच्या आत बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला तर परिणाम पटकन दिसण्याची शक्यता वाढते. पण जर अशा स्त्रियांनी उशीरा चान्स घेतला तर मात्र गर्भात जनुकीय दोष येण्याची शक्यता वाढते. वेळेआधीच बाळांतपण त्यामुळे बाळाची वाढ नीट न होणं अशा समस्या या स्त्रियांमधे येऊ शकतात. पण धोका जरी असला तरी तो अशा समस्या असणाऱ्या सर्वच स्त्रियांना असतो असं नाही, मात्र तरीही आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक, असं सांगतात नाशिकस्थित स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि किशोरवयीन मुलामुलींसाठी स्पेशल क्लिनिक चालवणार्‍या डॉ. गौरी करंदीकर..

छायाचित्र:- गुगल 

बाळाचा निर्णय घेताना..

1. स्त्री जेव्हा गरोदर राहाते तेव्हा ती यासाठी मानसिकरित्या किती तयार आहे हे देखील खूप महत्त्वाचं आहे. करिअरसाठी झटणारी एखादी स्त्री जर केवळ कुटुंबाच्या दबावामुळे गरोदर होत असेल तर अशा स्रियांसाठी ते त्रासदायक ठरतं. कारण गरोदरपण, बाळाची वाढ आणि पालकत्त्व या सर्वांवरच त्याचा परिणाम होतो. अशा परिस्थितीत मग प्रसूतीनंतर नैराश्य ज्याला पोस्टपार्टेम डिप्रेशन म्हटलं जातं ते येण्याची शक्यता असते. गरोदरपणात, प्रसूतीनंतर शरीर मनात होणाऱ्या बदलांशी जुळवून घेता न येणं, कुटुंबाचा आधार नसणं या सगळ्या बाबींचा विचार गरोदर राहाण्याचा निर्णय घेताना खूप महत्त्वाचा असतो. कारण आईची मानसिकता गर्भाच्या वाढीवर परिणाम करते. म्हणूनच मानसिकरित्या आई होण्याची तयारी असणं किंबहुना नवरा आणि बायको दोघांचीही आई बाबा होण्याची तयारी असणं हे खूप महत्त्वाचं आहे. करिअर झालं, घर झालं, गाडी झाली मग आता मूल अशा दृष्टीनं गरोदरपणाकडे पाहून चालत नाही. कारण तुम्ही एक व्यक्ती घडवण्याची, एक पिढी घडवण्याची ही संधी असते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आई होण्यासाठी स्त्री किती सक्षम आहे ही बाब खूप महत्त्वाची होते.

2. काही अपरिहार्य कारणांमुळे जर गरोदर होण्यास उशीर होणार असेल तर आपल्याला काही वैद्यकीय समस्या नाहीत ना याची आधी खात्री करुन घ्यायला हवी. कारण नंतर जेव्हा मूल हवं असतं तेव्हा कधी कधी काहींना वेळेआधीच रजोनिवृत्ती येते किंवा ताणाशी संबंधित काही समस्या यायला लागतात. त्यामुळे अशा काही समस्या नाहीयेत ना याची खातरजमा करुन घेणं आवश्यक ठरतं.

3. काही विशिष्ट कारणांसाठी आपण मूल होणं हे पुढे ढकलत असू तर आपण काय आणि किती रिस्क घेतोय याबाबत वैद्यकीय सल्ला घेऊन मग लेट प्रेगनन्सीबाबत काही निर्णय घेणं योग्य ठरतं. त्यामुळे आई होणाऱ्या स्त्रीला आपण उशीरा चान्स घेतो आहोत यात धोका नाहीये याची खात्री होते किंवा काय प्रकारच्या समस्या निर्माण होवू शकतात , त्याला कसं सामोरं जाता येईल याचा अंदाज येतो. याला ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ म्हणतात. म्हणजे उशीरा मूल होवू देणं ही रिस्क असेल तर किमान समजून उमजून घेतलेली कॅलक्युलेटेड रिस्क तरी असावी. म्हणून लेट प्रेगनन्सीमधे शारीरिक क्षमता यासोबतच मानसिक तयारी असणं , डॉक्टरांशी सल्लामसलत या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

छायाचित्र:- गुगल 

4. लेट प्रेगन्सीबाबत अनेक कारणं असू शकतात. काही गंभीर आजारपणं यामुळे स्त्रियांना बाळ होण्यासाठी वाट पहावीच लागते. उदा. स्त्रीला जर कर्करोग झालेला असेल तर उपचाराच्या कालावधीत गरोदरपण शक्यच नसतं. अशावेळेस त्या स्त्रीनं आपल्या डॉक्टरांशी केमोथेरेपी किंवा उपचाराच्या आधी गरोदरपण किंवा कर्करोग बरा झाल्यानंतर त्याचा आपल्या जननक्षमतेवर काय परिणाम होईल याबाबत सविस्तर बोलून त्यांच्या सल्ल्यानं एग फ्रिजींगसारखे पर्याय निवडायला हवेत. म्हणजेच अशा परिस्थीतीत लेट प्रेगन्सी असली तरी ते सर्व डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि त्यांच्या देखरेखीखाली होत असतं.

5. लेट प्रेगनन्सीबाबत स्त्रियांनी आपल्या फिटनेसकडेही तितकंच गांभिर्यानं पाहायला हवं. कारण स्त्री जर शारीरिकदृष्ट्या फिट असेल तर ती चांगली आई होवू शकते. गरोदरपणात शारीरिक, मानसिक या बाजूसोबतच सामाजिक बाजूही असते. गरोदरपण ही एक सामाजिक जबाबदारीही असते. म्हणजे आपण एक मूल जन्माला घालून पुढची पिढी तयार करत असतो. तेव्हा आपण शारीरिक आणि मानसिकरित्या जर सुदृढ असू तर जन्माला येणाऱ्या मुलात मानसिक समस्या, जनुकीय दोष किंवा वर्तणूक विकृती नसेल याची शक्यता बळावते. आपण जेव्हा मूल जन्माला घालणार आहोत तेव्हा त्याचं पुढे कसं संगोपन करणार आहोत याचा विचार स्त्रीसोबत पुरुषांनीही करायला हवा. फिटनेस महत्त्वाचा शिवाय संगोपनाचा सूक्ष्म विचारही महत्त्वाचा. बाळ चांगलं जगावं म्हणून स्त्री आणि तिचा जोडीदार आरोग्याची कशी काळजी घेता, स्वत:च्या शारीरिक मानसिक आरोग्याचा कसा विचार करता हे देखील महत्त्वाचं होवून बसतं. अनेक पालक असतात जे गरोदरपणात धूम्रपान, मद्यपान करतात या सगळ्या गोष्टीचा गर्भावर परिणाम होतो. त्यामुळे पुढे भविष्यात त्या मुलांमधे वर्तणूक समस्या निर्माण होवू शकतात. त्यामुळे गरोदर होण्याचा निर्णय घेताना या सवयींचाही विचार व्हायला हवा.

6. गरोदरपण आणि मूल झाल्यानंतर आपल्या सामाजिक आयुष्यावरही परिणाम होतो. त्यामुळे मग कधी कधी स्त्रियांना आपल्याला सामाजिक आयुष्य जगताना तडजोड करावी लागतेय, मन मारावं लागतंय असं नकारात्मक वाटू शकतं. त्यामुळे मूल झाल्यावर आपल्या सामाजिक आयुष्यावर काय मर्यादा येणार आहेत आणि आपण त्यावर काय मार्ग काढणार आहोत याचा विचारही करायला हवा.

छायाचित्र:- गुगल 

हे देखील आवश्यकच..

निरोगी , सुदृढ आणि आनंदी गरोदरपणासाठी गरोदर राहाण्याचा निर्णय घेताना तीन महिने आधी ‘प्री कन्सेप्शन’ म्हणजे डॉक्टरांशी भेटून समुपदेशन करुन घ्यावं. या समुपदेशनात आई बाबा होणाऱ्या स्त्री पुरुषांना त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं मिळतात, काही शारीरिक दोष असतील तर त्यावरचे उपाय सूचवले जातात. तसेच गरोदरपणासाठी काय तयारी हवी, गरोदर झाल्यावर कोणकोणते बदल होतात, काय समस्या येवू शकतात, कशी काळजी घ्यायला हवी याचं सविस्तर मार्गदर्शन होत असल्यानं त्याचा फायदा आई बाबा होणाऱ्या स्त्री पुरुषांची शारीरिक आणि मानसिक तयारी होण्यास होतो.

Web Title: Why do you need a doctor's advice when making decision about late pregnancy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.